मेतकूट
मेतकूट हे नाव ज्यांना माहित आहे त्यांना वाचल्यानंतर नक्कीच गरम - गरम गिरगुट्या भात नजरे समोर आला असणार. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत आवडणारा व पचणारा हा पदार्थ आहे.मराठमोळ्या घरात हमखास खाल्ला जाणारा पदार्थ पण आधुनिक काळात थोडा दुर्लक्षित होत चालला आहे . हल्ली फ्राईड राईस , बिर्याणी ,पुलाव याचं एवढं प्रस्थ वाढला आहे कि,मेतकूट भात लोप होतो कि काय अशी भीती वाटते . असं व्हायला नको हा या लेखा मागचा उद्देश.
मेतकूट म्हणजे हरभरा डाळ , उडीद डाळ ,तांदूळ ,धने ,जिरे, हळद अजून बरेचसे जिन्नस एकत्र करून बनवलेली पावडर( याची रेसिपी गूगल वरतीमिळेल ).मेतकूट हा प्रकार आमच्याकडे खास करून श्रावण चालू व्हायच्या अगोदर व लग्न कार्य ठरल्यानंतर बनवला जातो. मराठवाड्यामध्ये घरी कार्य झाल्यानंतर पाहुणे मंडळीत मसाला-मेतकूट वाटण्याची पद्धत आहे. आपल्याकडे जे पदार्थ बनवतो त्यामागे आहारशास्त्राचा विचार तर करतोच पण त्यामागे संस्कार पण असतात.
मेतकुटामध्ये विविध प्रकार मिसळलेले असतातच पण हा पदार्थ दुसऱ्या पदार्थामध्ये मिसळून नवीन पदार्थ बनवला जातो . एकमेकांमध्ये मिसळून नवीन काहीतरी छान बनण्याचा संदेश मेतकूट आपल्याला देतं म्हणूनच कदाचित लग्न झाल्यानंतर वाटण्याची प्रथा असावी .सणासुदीच्या दिवशी, घरात अचानक पाहुणे आले तर ताटातली डावी बाजू सांभाळण्याचे काम मेतकूट करते. पाणीपुरी , शेवपुरी यांच्या सोबत जर मेतकूट लावलेले चुरमुरे ठेवले तर लोक हेच खायला प्राधान्य देतील येवढा हा पदार्थ चविष्ट असतो.
दोन मैत्रिणी , जावा-जावा , नणंद -भावजय यांचं खूप छान पटत असेल तर " दोघींचं मेतकूट छान जमलंय" अशी म्हण आपण बरेच वेळा ऐकली आहे. मिळून मिसळून राहण्याचा संदेश देणाऱ्या मेतकुटाची ओळख आपण आपल्या पुढच्या पिढीला करून देऊ या ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment