निवांत वेळी जुन्या आठवणी उलगडून बघण्यात काही वेगळीच मज्जा असते . आनंदाचे क्षण कधी हृदयात ,कधी फोटो अल्बम मध्ये तर कधी अक्षरात पाहून मनाला उभारी येते व उत्साह वाढतो आज मी तुमच्यासमोर मॉरिशस या सहलीचं प्रवास वर्णन घेऊन आले आहे .
मॉरिशस हे फक्त एक पर्यटन स्थळ , एक सुंदर बेट म्हणून माझ्या लक्षात राहणार नसून त्यातून मिळालेल्या गोड आठवणींचा एक साठा हृदयात घर करून राहणार आहे .
" आम्ही मॉरिशस ला कार्यक्रम करायला जाणार आहोत तू येशील का ?" या वाक्यापासून मॉरिशस प्रकरणाला सुरुवात झाली . मॉरिशस म्हणजे परदेशात जाण्याची संधी ..हा तर माझ्या बकेट लिस्ट मधला एक भाग. हि संधी मला सोडायची नव्हती घरातील लोकांनी पण होकार दिला व चालू झालं मॉरिशस स्वप्न रंजन. सुरुवात झाली ती मॉरिशस आहे कुठे ,खंड कुठला , अगदी त्याचं स्पेलिंग काय? इंटरनेट वरती शोधा शोध चालू झाली .बरीचशी माहिती काढली.
मॉरिशस फक्त फिरायला जायच नाही तर कार्यक्रम करायला जायच आहे हे लक्षात ठेऊन भरपूर मेहनत घेतली . भरपूर म्हणजे नेमकी किती मेहनत घेतली ती प्रत्येकीने डोळ्यासमोर आणली तर "ते दोन महिने " दिसतील . परदेशात कार्यक्रम करायचा आहे हि भीती मनात होतीच . माझ्यामुळे कार्यक्रम खराब व्हायला नको म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो .तालीम रंगीत तालीम करता करता कार्यक्रम बसला पण कार्यक्रम होई पर्यंत मनात भीती होतीच .
२३ जानेवारी २०२० ची रात्र सर्वांच्या शुभेच्छा घेऊन प्रवासाला सुरुवात केली .दुसरे दिवशी सकाळी ६:४५ वाजता एअर मॉरिशस च विमान होतं.रात्र पूर्ण विमानतळावरती घालवली .
२४ जानेवारी ची सकाळ उजाडली वेळेत विमानात जाऊन बसलो . रात्रभर झोप झाली नव्हती त्यामुळे सर्वांचे डोळे पेंगले होते विमान चालू झालं तसं सर्वानी डोळे बंद केले मस्त एक डुलकी झाली डोळे उघडले तर लक्षात आले अजून आपण भारतातच आहोत .आमचं विमान दोन तास उशीर झालं होतं . देव जणू आमची परीक्षाच घेत आहे कारण त्याच दिवशी संध्याकाळी आमचा कार्यक्रम होता .घड्याळाचे काटे बघत डोक्यात वेळेचं गणित प्रत्येक जण घालत होता. कसे बसे मॉरिशस विमानतळ गाठलं सर्व औपचारिकता पूर्ण करून बाहेर पडलो .
गेली दोन महिने ज्या मॉरिशस ची स्वप्न पाहत होतो त्या स्वप्न नगरीत अखेर पाऊल ठेवलं. नजरेत बघून हृदयात प्रत्येक गोष्ट साठवायची होती . हि माझी पहिलीच परदेशवारी त्यामुळे मी सतत वेगळेपण शोधात होते . विमानतळावरून हॉटेल मध्ये पोहचेपर्यंत वेगळं असं काही दिसलंच नाही . मला तर माझ्या गावाला सोलापूर ला चालली आहे का असा भास झाला. आमच्या गावाला निदान रस्त्यावरती माणसे तरी दिसतात , शेतात काम करताना शेतकरी दिसतात पण इथे ते पण नाही .
दुपारी मस्त महाराष्टीयन पद्धतीचं जेवण जेवलो त्यानंतर आम्हाला कळलं कि सायक्लॉन आला आहे सगळी कडे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे आपला कार्यक्रम आज होऊ शकणार नाही हे एकताच आमचा हिरमोड झाला . प्रत्येक क्षण वसूल करण्याच्या विचाराने आम्ही आलो आणि हे काय झालं म्हणून आम्ही निराश झालो . आता काय करायचं असं सर्वांसमोर प्रश्न होता. आता एवढे कपडे आणले निदान फोटो तरी काढू म्हणून तयार झालो .आमच्या पेक्षा जास्त उत्साह जेष्ठ महिलांमध्ये आम्हाला बघायला मिळाला त्या बीच वरती गेल्या पण ..आयुष्यात पाहिलेंदा एवढा सुंदर समुद्र ,समुद्र किनारा पहिला आजही तो समुद्र ,वाऱ्याचा आवाज व आमचा उत्साह जशा चा तसा डोळ्यासमोर दिसतो .
हवामानाचा अंदाज घेऊन आम्हाला पुढचं प्लँनिंग ठरवायचं होतं देवाला सर्वानी मनोमन प्रार्थना केली व देवांनी आमची हाक ऐकली आणि आमच्या पर्यटनाला सुरुवात झाली .
२५ जानेवारी अख्खा दिवस आमचा वॉटर स्पोर्ट्स मध्ये गेला सुंदर स्वच्छ समुद्र व मैत्रिणींची साथ त्यामुळे खूप मज्जा येत होती . समुद्र खालचं चालणं , पाण्यावरती तरंगन व समुद्रावरती आकाशामध्ये उडणं ह्या तिन्ही गोष्टी आम्ही एकाच दिवशी अनुभवल्या . हा अनुभव संस्मरणीय व रोमांचकारक होतं. हे तिन्ही अनुभव तर घेतलेच पण पांढऱ्या शुभ्र वाळूवरून चालण्याचा अनुभव तर निराळाच होता.
त्याच दिवशी रात्री " सेगा डान्स " मॉरिशियन लोकांचा डान्स ठेवण्यात आला होता . तिथल्या मुलींनी जेमतेम १० मिनिटे डान्स केला आणि आमच्या उत्साही मैत्रिणींनी खूप सुंदर साथ दिली कि नंतर त्या डान्सर आहेत कि ह्या असा संभ्रम निर्माण झाला . खूप सुंदर डान्स झाले दिवसभराची मज्जा आठवून झोप कशी लागली कळलंच नाही
२६ जानेवारीचा दिवस उजाडला ज्या कारणासाठी आम्ही आलो तो म्हणजे " महाराष्ट्र संस्कृती दर्शन ' चा कार्यक्रम आम्हाला पाच वाजता करायचा होता . सकाळचा वेळ रिकामा होता म्हणून आम्ही मॉल मध्ये फिरून खरेदी करून आलो . आमच्या हॉटेल पासून कार्यक्रमाचे ठिकाण दोन तासाच्या अंतरावर होते त्याप्रमाणेतयारी करून दोन बस मध्ये विभागून निघालो . वळणावळणाचे रस्ते, पाऊस ,वारा ,निसर्ग सौंदर्य अनुभवत घेत निघालो एवढ्यात बसमधून धूर निघाला , बस AC होती त्यामुळे दरवाजे खिढाक्या बंद . कसे बसे दरवाजे उघडले आम्ही बाहेर आलो व देवाचे आभार मानले . दुसरी बस आम्हाला घ्यायला आली व आम्ही तिथे पोहचलो . तिथल्या लोकांचा उत्साह पाहूनआमचंही मन ताजतवानं झालं
. आलेल्या परिस्थितीवर मात करून सुंदर कार्यक्रम सादर केला . वार्षिक परीक्षा झाल्यानंतर जसा आनंद होतो तास आनंद आम्हाला झाला ज्याच्या साठी एव्हडा आटापिटा केला तो सफळ संपूर्ण झाला .२६ तारखेची रात्र सर्वानी शांत झोपून काढली .
२७ जानेवारीच्या दिवशी आम्ही दक्षिण मॉरिशस पाहायला गेलो . हा भाग म्हणजे तीर्थ क्षेत्रच . खूप उंच शंकराची, लक्ष्मीची मूर्ती पहिली . मॉरिशियन लोक आपला धर्म सांभाळणारी आहेत त्यांनी तिथे तेरावा ज्योतिर्लिंग स्थापन केलं आहे .दर्शन घेतलं, अभिषेक केला.त्याच दिवशी संध्याकाळी आम्ही "सेव्हन कलर सेंड " पहिली . ज्वालामुखी निघाल्यानंतर त्याचा एक तुकडा या जागेवर पडला व हि सात रंगाची माती येथे तयार झाली . बाजूला पूर्ण हिरवळ व ह्याच भागात सात रंगाची रांगोळी . येथे आताही जळाल्यासारखा वास येतो .त्याच्याच बाजूला मोठे मोठे कासव पाहायला मिळाले .
२८ जानेवारी उजाडला आमच्या निघण्याचा दिवस . चार दिवस कसे गेले कळलंच नाही आज आमचा परतीचा प्रवास चालू होणार होता . आमचा आणखी एक स्पॉट बघायचा राहून गेला होता तो आज पहिला . सुंदर उंच पांढऱ्या कमळाचं तळ आम्ही पाहिलं.अगदी विलोभनीय दृश्य होतं.त्याच्याच बाजूला वर्तुळाकार हिरवीगार तरंगणारी जाडसर पानं एक तळ्यत विहार करत होती या पानांची जाडी इतकी होती कि एक बाळ त्याच्यावरती बसू शकेल .मॉरिशसच निसर्ग सौंदर्य डोळ्यांनी बघत हृदयात साठवत आम्हाला निरोप घ्यायचा होता.
हे सर्व झालं तिथल्या निसर्गाचं. तिथल्या वातावरणामध्ये ,लोकांमध्ये मला भारतीय मातीचा वास आला . मॉरिशस हे बेट जरी सातासमुद्रापलीकडे असला तरी इंग्रजांनी आपल्या लोकांना कामासाठी ,फसवून घेऊन गेले भारतीयांनी किती कष्टात आपलं जीवन काढलं याचा दर्शन आम्हाला तिथे पाहायला मिळालं खूप वाईट वाटलं अशा परिस्थितीत सुद्धा ह्या लोकांनी आपली संस्कृती जपली याचा अभिमान वाटला. आजही प्रत्येकाच्या घरासमोर तुळस दिसली . आम्ही आपापसात मराठीत बोलत होतो तेंव्हा त्यांच्या डोळ्यात आपुलकी ,आदर दिसला .हि त्यांची तिथे सातवी पिढी तिथे चालू आहे तरी संस्कृतीजपण्याची धडपड दिसली . त्यांच्या शाळेत मराठी हा विषय शिकवलं जातो हे ऐकून आश्चर्यच वाटलं.महात्मा गांधीजींच्या नावावर तिथे संस्था चालू आहेत . आपल्या येथील कितीतरी नेत्यांचे फोटो पाहायला मिळाले . नरेंद्र मोदी बद्दलचा आदर त्यांच्या बोलण्यात दिसून आला .
मॉरिशस ची सहल आम्हाला खूप काही शिकवून गेली . आमचा ग्रुपचं इतका उत्साही , मदत करणारा होता कि आम्ही घराबाहेर असलो तरी काहीही त्रास झालं नाही .मी उर्मी ग्रुप चे व आमच्या सोबत असलेल्या सर्वांचे आभार मानते कि तुम्ही मला तुमच्या सोबत येण्याची संधी दिलीत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment