पोळा
आज सकाळपासूनच सुभानराव व्दिधा मनस्थितीत होते , उद्या वर्षातला सर्वात महत्वाचा व आवडता दिवस ज्या दिवसाची आपण वर्षभर वाट पाहतो तो दिवस साजरा करायचा नाही , हे त्यांच्या मनाला पटतच नव्हतं. आपल्या सुखात - दुःखात साथ देणाऱ्या मित्राचा हा दिवस , वर्षभर राबणाऱ्या आपल्या मित्राची कृतज्ञता व्यक्त करायचा दिवस आपण व्यर्थ जाऊ द्याचा नाही असं मनाशी ठरवून सुभानराव उठले , आपल्या पत्नीला राधाला सर्व तयारी करून ठेवायला सांगितली व उत्साहाने आपल्या सख्याला घेऊन यायला निघाले .
कोरोना विषाणूचा धोका प्राण्यांना होत नाही हे माहिती असतानाही त्यांनी आपल्या मुळे आपल्या सर्जा - राजाला धोका नको म्हणून स्वतः मास लावला व दोघांच्या तोंडाला मोरख्या बांधल्या , पाठीवरून हात फिरवत समजावण्याच्या स्वरात बोलले , कुठेही तोंड लावायचं नाही हं, सुरक्षित मी घेऊन जातो व सुरक्षित आणून सोडतो असा विश्वास देत सुभानराव दोघांना घेऊन गावाच्या दिशेने निघाले . गावातून या दोघांना घेऊन जाताना जो आनंद त्यांच्या चेहऱ्यावर होता तो शब्दातही व्यक्त होणार नाही .
घरा समोर येताच राधाबाईने भाकरीचा तुकडा ओवाळून ,पायावर पाणी टाकले व तिघांनी घरात प्रवेश केला.या दोन दिवसात आदरातिथ्यात काहीच कमी पडू द्याचं नाही असं दोघांनी ठरवलंच होतं. पोळ्याचा आदला दिवस म्हणजे 'खणमळण्या' या दिवशी खीर व खिचड्याचा नेवेद्य असतो तो दाखवला . या दोन दिवसात आमच्या कडून काही चूक झाली तर सांभाळून घ्या हं..! अशी विनंती करून दोघेही पुढच्या तयारीला लागले .
सर्जा - राज्याच्या जोडीला सजवायचे सर्व साहित्य काढून ठेवले ,दर वर्षी नवीन कासरा,शोभेच्या वस्तू हौशेने घेऊन येणारे सुभानराव या वर्षी जुन्याच वस्तू साफ करून वापरणार होते .बैलांच्या शिंगांपासून ते पायाच्या खुऱ्या पर्यंत सुंदर सजावट केली . घरी पूजा करायच्या अगोदर मारुतीच दर्शन करून आणल . घरी आल्यावर यथासांग पूजा केली व नवेद्य दाखवला . दर वर्षी वाजंत्रीसह होणारी पूजा शांततेत संपन्न झाली . संध्याकाळी बैल मिरवण्याची जी प्रथा असते ती तर प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचा व मनाचा क्षण असतो . आजच्या दिवशी मिरवणूक नाही म्हणून सुभानराव निराश होऊन बैलजोडीकडे बघत होते. या जोडीच्या नजरेत त्यांना समाधान दिसले जणू त्यांचे डोळे सांगत होते "या अशा काळात तुम्ही आम्हाला इतका मान दिला , आमचा सन्मान केला हेच खूप आहे आमच्या साठी . आम्हाला कधीच कुठल्या मिरवण्याची हौस नसते पण वर्षभरातील हा दिवस आमच्यासाठी मोलाचा असतो तो तुम्ही साजरा केला त्याबद्दल आभार , तुमच्या घरी सतत भरभराट होवो ." सुभानरावांना हा आवाज कानांनी नव्हे तर हृदयातून ऐकायला आला , त्यांनी लगेच सर्जा - राजाचे पाय धरले ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment