दबलेला आवाज
वणिताची आजची सरकारी कार्यालयातील ही दहावी फेरी होती , सर्व कागदपत्रे बरोबर होती तरी काम होत नाही हे पाहून तिला खूप चीड येत होती. आज हे काम होणं खूप महत्वाचं होतं पण याही वेळीं शब्दांपेक्षा डोळ्यातून अश्रूच आले .
या वेळी तिला आठवण आली ती तिच्या मैत्रिणीची ,बबिताची किती वेळा बोलत होती ,'अगं निदान जिथे लोकांचं चुकतं निदान तिथे तरी बोलत जा ,एवढा मवाळपणा बरा नाही, कधीतरी जहाल हो , लोकांसाठी नव्हे तर स्वतःसाठी तरी , तुझ्यातला हा आवाज असा दाबशील तर तो कधी बाहेर येणारच नाही. '
आज वनिताला जाणीव झाली कि तिचं बोलणं किती खरं होतं . हा आवाज वेळोवेळी बाहेर आला असता तर आज मी कुठल्या कुठे पोहचली असते . असा विचार करून तिला तिच्या आयुष्यातले कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर आले .
रोज बसने प्रवास करताना स्त्रियांसाठी जी राखीव सीट असते त्यावरती एखादा पुरुष बसला तरी त्याला उठवण्यासाठी कधी आवाज निघाला नाही , जाऊ दे वीस मिनिटांचा प्रवास म्हणून उभी रहायची . रस्त्यावरच्या रोडरोमियोचा त्रास नको म्हणून कधी मेकअप नाही केला कि कधी केस मोकळे सोडले . त्याच वेळी बोलली असती , कानाखाली आवाज काढला असता तर स्वतःच देखणं रूप पहायला तिला हि नक्कीच आवडला असतं . ऑफिस मधले कितीतरी प्रमोशन तिच्या इतर सहकार्यांना मिळाले पण स्वतः सगळी कामं करून मला का प्रमोशन दिलं नाही असा जाब कधी बॉसला विचारला नाही . त्यावेळी आवाज निघाला असता तर आज कुठल्या कुठे पोहचली असती . तिच्या या मवाळ स्वभावाचा फायदा बाहेरच्या लोकांनीच नव्हे तर तिच्या नातेवाईकांनी , घरातल्या लोकांनी पण घेतला होता .
मैत्रिणी सोबत पिकनिक ठरली कि सासूबाई आजारी पडायच्या किंवा पाहुणे हजर रहायचे . अशा वेळी नवऱ्याने घर सांभाळायची जबादारी घेतली नाही किंवा वनिताने सांगितले नाही कि , आज तुम्हाला घर सांभाळायचे आहे . तिच्या या स्वभावामुळे सगळ्यांमध्ये तिची खूप प्रशंसा व्हायची ,आदर्श गृहिणीचा सन्मान मिळायचा त्यामुळे ती हि सुखवायची .नोकरी करून मी उत्तम घर सांभाळू शकते याचा तिला अभिमान वाटायचा . नोकरी , घर , पाहुणे ,येणार जाणार यांचं करता करता खूप थकत होती . एका क्षणाला वाटत होतं कि मला हि थोडा बदल हवा आहे , आरामाची गरज आहे . समोरची व्यक्ती आपला गैरफायदा घेते याची जाणीव झाली तरी तोंडातून आवाज निघालाच नाही . असे कितीतरी प्रसंग होते कि तिची ईच्छा असतानाही आतला आवाज बाहेर आलाच नाही . जाऊ दे म्हणून मन मारत जगली .
आज तिला जाणीव होत होती कि आपल्यातला जहाल वाद इतका दबला गेला आहे कि माझी ईच्छा व गरज असतानाही तो बाहेर येत नाही .
मागचे सर्व प्रसंग आठवून वनिताने डोळे पुसले , पर्स मधून मोबाईल काढला मेल बॉक्स ओपन केला व रीतसर तक्रार वरच्या खात्याकडे केली . मेल सेंट झाला .
ऑफिस मधून एक व्यक्ती बाहेर आली ,' वनिता प्रधान , तुम्हाला सरानी बोलावलं आहे ,' असा आवाज दिला .
जो अधिकारी तिच्याकडे डोकं वर करून बघायला तयार नव्हता तोच वनिता आल्यावर उभा राहिला , वनिताला बसण्याची विनंती केली . वणिताचा चेहरा बघून तुम्ही तक्रार का केली हे बोलण्याचीही त्याची हिम्मत झाली नाही . पेपर वरती सह्या करून हसून बोलला ,' हे घ्या मॅडम , झालं तुमचं काम .'
ऑफिस मधून बाहेर पडताना वनिताचा चेहरा आनंदानी फुलाला होता , डोळ्यात अश्रू ऐवजी आत्मविश्वासाचे तेज झळकत होते .
अन्याया विरुद्ध लढण्यासाठी मला प्रत्येक वेळी वेगवेगळी शस्त्र काढावीच लागणार आहेत . माझा आवाज कधी आवाजातून , कधी लेखणीतून तर कधी गोडी गुलाबीने बाहेर पडलाच पाहिजे असा निश्यय करून नवीन आयुष्याला सुरुवात करण्यासाठी सज्ज झाली
तिच्या या एकंदर अनुभवावरून ती प्रत्येक स्त्रीला संदेश देते कि स्वतःमधला जहाल स्वभाव दाबून ठेऊ नका वेळोवेळी तो बाहेर काढा नाहीतर तो कधी दबला जाईल तो तुम्हालाही कळणार नाही ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment