धुंदुरमास .... एक छान मराठी प्रथा !
( शास्त्रीय, शास्त्रोक्त, साहित्यिक आस्वाद )
आपल्या अनेक प्रथा, सण आणि त्या वेळचे आचरण व विधी यांची निसर्गाशी सांगड घातलेली आहे. प्रत्येकाच्या मागे शास्त्रीय कारणे असून ती सर्वांना समजणार नाहीत म्हणून त्याची सांगड धर्माशी घातलेली दिसते. आरोग्य, धर्म, सामाजिक एकोपा,परंपरा हे सगळे एकाचवेळी सहजपणे पाळले जाते. धुंदुरमास ही अशीच एक छान परंपरा आहे. या संबंधीचे अनेक पैलू आपण पाहूया.
१) धुंदुरमास या छान शब्दाची उत्पत्ती गंमतीदार आहे. धनु राशीत सूर्याने प्रवेश केला की त्या दिवसापासून मकर राशीत सूर्य प्रवेश करीपर्यंत म्हणजेच मकर संक्रांतीच्या भोगी या आदल्या दिवसापर्यंत, म्हणजे एक महिनाभर हा धुंदुरमास पाळला जातो. धनु राशीत सूर्यप्रवेश म्हणून खरेतर याचे नाव धनुर्मास आहे. या काळात पहाटेचा आहार घेणे महत्वाचे असते. मराठी भाषेत झुंजुमुंजू होणे म्हणजे पहाट होणे, उजाडणे आणि सूर्योदयाआधी दिशा उजळतात ती वेळ म्हणजे झुंजुमुंजू ! परंतु झुंझुरके म्हणजे त्याच्याही आधीची वेळ. काळोख तर आहेच पण उजेडही येऊ घातला आहे. त्यामुळे या संबंधातील नादमय शब्दांच्या मेळामुळे धनुर्मास म्हणण्याऐवजी धुंदुरमास, धुंधुरमास, झुंझुरमास असे म्हणतात. या महिन्याला असलेल्या धनुष्याच्या संदर्भामुळे चाप मास, कोदंड मास, कार्मुक मास, पंचांगात कुठेही उल्लेख नसल्याने शून्यमास अशी देखील नावे आहेत. दक्षिण भारतात कांही ठिकाणी हा उत्सव गोदा रंगनाथ कल्याण उत्सव म्हणून साजरा केला जातो.
२) हिंदू वर्ष हे त्रिमूर्ती दत्ताशी जोडलेले आहे. आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन हे चार महिने ब्रह्मदेवाचे म्हणजेच निर्मितीचे ! याच काळात नवीन पिके, फळे, भाज्या, फुले, धान्य निर्माण होते. पक्षी, प्राणी यांची नवीन प्रजा निर्माण होते. या काळात विश्वाचे पोषणकर्ते भगवान विष्णू मात्र निद्रा घेत असतात. नंतरचे कार्तिक, मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे भगवान विष्णूचे म्हणजे पालनपोषणाचे ! पालनकर्त्या विष्णूचे स्मरण व पूजा करून सृष्टीत निर्माण झालेल्या पदार्थांनी आपले पोषण करण्याचा हा महत्वाचा काळ आहे. म्हणून याच काळात धुंदुरमासाचे प्रयोजन अचूक आहे. फाल्गुन, चैत्र, वैशाख आणि ज्येष्ठ हे महिने भगवान शंकराचे ! प्रचंड उन्हाळा, जुने जाळून टाकणारी होळी, शेतांमधून जाळला जाणारा राब ( पालापाचोळा--गवत ), विविध ठिकाणी लागणारे वणवे ही सारी शिवाच्या तांडवाची रूपे ! नंतर घडणाऱ्या निर्मितीसाठी खूप आवश्यक असणारी !
३) आरोग्याच्या दृष्टीने हा काळ उपयुक्त असतो. सकाळी लवकर उठणे, सुप्रभाती प्रज्वलित होणारा जठराग्नी, वाढलेली पचनशक्ती आणि निसर्गाने विविध निर्मितीतून पुरविलेले लाड ही या काळाची वैशिष्ट्ये ! उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा या काळात अन्नपचन उत्तम होते. म्हणून शरीराला उत्तम आहाराचा दिलेला बूस्टर डोस पुढे पॉवर पॅकच ठरतो. अत्यंत पौष्टिक आणि उष्ण पदार्थांचा आहारात समावेश केला जातो.
४) निसर्ग हा गरीब श्रीमंत असा भेदभाव करीत नाही. अत्यंत महाग वस्तूंमध्ये जशी पोषणमूल्ये असतात तशीच स्वस्त मिळणाऱ्या पदार्थांमध्येही असतात. शेतात किंवा उघड्या जागी थंडीची मजा, शेकोटीची ऊब, कुटुंबातील सर्वांची सोबत हे सगळेच शरीराला आणि मनाला उभारी आणणारे असते. सर्व भाज्यांची एकत्रित लेकुरवाळी भाजी, भाकरी, वांग्याचे भरीत, लोणी, कांद्याची चटणी, मुगाची खिचडी हा आदर्श मेनू ! स्टार्टर्स म्हणून शेंगदाणे, गूळ, उसाचे करवे, रेवडी, कोवळे हरभरे असे पदार्थ तर पक्वान्न म्हणून तीळ लावलेली गुळाची पोळी व तूप आहेच. अधिक खमंग खायचे असेल तर गरमागरम पोपटी आहे. अगदी नगण्य वाटणाऱ्या पण अत्यंत दुर्मिळ खनिजे असलेल्या तिळाचे या काळात खूपच महत्व असते. हुरडा, हुरड्याचे थालीपीठ, खापरावरची पुरणपोळी हे पदार्थ सुद्धा लोकप्रिय आहेत. गुजराती पद्धतीचा उंधीयू, पोंक, अडदिया ( उडीद ) पाक, गुंदर ( डिंक ) पाक, सालेम ( कोहळा पाक ) पाक यांची शहरात तर गावाकडे उम्बाडीयुची रेलचेल असते. या सर्वांचा सूर्याला नैवेद्य अर्पण करून, भगवान विष्णूंचे स्मरण करून मग तो प्रसाद म्हणून खायचा.
५) अपरात्री भरपेट खाण्यापिण्याच्या पार्ट्या आपण नेहमीच पहातो. पण पहाटे भरपेट खाण्यापिण्याची, शास्त्रोक्त आणि शास्त्रीय आधार असलेली ही आपल्या संस्कृतीतील एकमेव पार्टी असावी.
पूर्वी हा धुंदुरमास घरोघरी साजरा केला जाई. आता आवड आहे पण सवड नाही. मग हे सगळे अगदी साग्रसंगीत आयते मिळाले तर ? याच विचाराने मुंबईतील शिवाजी पार्क, दादर येथील "आस्वाद " उपाहार गृहाच्या कल्पक मालकांनी म्हणजे श्री.सूर्यकांत व सौ.स्मिता सरजोशी यांनी धुंदुरमासाचे पुढील ३ रविवारी खास आयोजन केले आहे. रविवारी सकाळी ८ व ९ वाजता अशा दोन बॅचमध्ये शेकडो रसिक याची मजा घेतात. उपाहार गृहाच्या दारात प्रत्यक्ष सनईवादन, रांगोळी आणि मराठी संस्कृतीचे लेणे असलेल्या गावाकडील शेताची व दिवाळीतील किल्ल्याची प्रतिकृती पाहायला मिळते. यांत्रिक पद्धतीने फक्त हात हलवून कुर्निसात करणारा, १००% पुतळाच वाटावा अशा तऱ्हेने सलग ३ - ३।। तास उभे राहून स्वागत करणारे कलावंत श्री.चंद्रकांत इंदुरकर म्हणजे चमत्कारच आहे. आत शिरल्यावर मंत्रघोषात गुरुजी ( भटजी ) आपल्याला तीर्थप्रसाद देतात. तसेच गंध, फुल, हळदीकुंकू,अत्तर लावून स्वागत केले जाते. लग्नकार्यातील वऱ्हाडींसारखे फेटे बांधलेले सेवक अगदी आपुलकीने आपल्याला मध घातलेले चविष्ट गरम लिंबूसरबत देतात. नंतर येतो तो खास धुंदुरमास विशेष पदार्थांचा नजराणा ! स्टार्टर्स म्हणून गूळ - शेंगदाणे, उसाचे करवे, रेवडी, बोरे, कोवळे हरभरे, कुरमुरे, कुरडई यांचे बाउल्स व त्याच्या बाजूला गरमागरम आंबोळी, ज्वारीबाजरीचे खमंग थालीपीठ आणि लोणी, लिंबू लोणचे, लसूण चटणी, तीळयुक्त साटोरी, मऊभात-मेतकूट-साजूक तूप, खारकेची खीर ! तुम्ही खाण्याचा आस्वाद घेत असतांना, मंत्रपठण सुरूच असते. उपाहार गृहाचे मालक, मालकीणबाई यांच्यासह आस्वाद कुटुंब टीम प्रत्येकाची विचारपूस करतात. धार्मिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेली एक वेगळी खाद्यानुभूती लाभल्याचे समाधान मिळते. या महोत्सवाचे हे ५ वे वर्ष आहे. आस्वाद उपाहार गृहामध्ये अजून २, ९ व १६ जानेवारी २०२२ या तीन रविवारी हा ' धुंदुरमास आस्वाद ' घेता येईल !
धुंदुरमासाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
( हा लेख आणि फोटो शेअर केल्यास कृपया माझ्या नावासह शेअर करावेत ).
***** मकरंद करंदीकर. makarandsk@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment