नेहाने घाई - घाईत पायात चपला चढवल्या , खांद्याला पर्स अडकवली व दुसऱ्या हाताने मुलाचा हात पकडला व खेचत - खेचत त्याला घेऊन चालली होती . नेहाची मैत्रीण सुधाने मधेच टोकलं ,' काय ग नेहा उशीर केलास , कार्यक्रम एव्हना चालू ही झाला असेल '.
' कितीही लवकर आवरायचं ठरवलं तरी जमतच नाही ग .. आणि हा कार्टा ड्रेस घालायला तयारच नाही म्हणतो कसा टोचतो हा ड्रेस , दाढी तर मी घालणारच नाही असा हट्ट धरून बसला होता . कसं तरी तयार केला याला '.
सुधा अजून काही प्रश्न विचारेल त्याच्या आधीच नेहा तिला बाय बोलली व झपाझप पाय टाकत कशी बशी कार्यक्रमाच्या जागी जाऊन पोहचली .
मुलाला आयोजकांच्या हाती देऊन स्वतःसाठी खास जागा शोधात होती जेणेंकरुनि मुलाचे फोटो , व्हिडीओ छान येतील . एवढा अट्टाहास तर त्याच्यासाठीच तर चालू आहे ना , कार्यक्रम कधी संपेल व स्टेटसला फोटो , व्हिडिओ कधी टाकेल याचीच तिला घाई झाली होती .
पहिल्याच रांगेत मध्यभागी अगदी जशी हवी तशी जागा होती पण नेमकं त्याच जागी एक आजी बाई बसल्या होत्या , आजीबाईना विनंती केली , दाटी - वाटीत जागा केली व घाम पुसत निश्वास सोडला . आजी कडे बघून बोलली ,' किती घाईत सर्व आवरून आले पण अजून यांची भाषणच चालू आहेत का ?
आजीचं सुंदर तेजपुंज रूप बघून नेहा हरखून गेली . साधारण आजी सत्तरीतल्या तरी असतील पण चेहरा किती तेजस्वी दिसत होता . पांढऱ्या रंगाची कडक इस्त्री केलेली साडी किती सुंदर दिसत होती . नेहाने स्वतःचा चेहऱ्यावरचा मेकअप व डिझायनर साडी सावरत हळूच आवाजात आजीला बोलली ,
' माझा मुलगा या नाटकात काम करतोय ," शिवाजी महाराजांच्या " मुख्य भूमिकेत आहे .'
आजीबाईने स्मित हास्य चेहऱ्यावर आणत बोलल्या ,' माझ्याही मुलाचा कार्यक्रम आहे म्हणूनच मी आली आहे .'
नेहाने मनोमन विचार केला , कुठलातरी छोटासा रोल असेल यांच्या मुलाचा . आजीबाई किती अभिमानाने स्टेज कडे पाहत आहेत , माझा मुलगा तर मुख्य भूमिकेत आहे असं मनातल्या मनात पुटपुटत स्वतःचीच नसलेली कॉलर टाइट केली .
'अहो हि भाषणं ऐकून काय होणार आहे , शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली , त्यांच्या लढाया हे सर्व तर इतिहासाच्या पुस्तकात आहेच ना .. मग आजच्या दिवशी परत तेच तेच ऐकायला कंटाळा येतो . जिजाऊने त्यांच्या साठी किती कष्ट घेतले ,संस्कार केले म्हणून तर ये एव्हढे मोठे झाले , पराक्रमी झाले .'
आजी बाई बोलल्या ,' अगं , पोरी जिजाऊने छान संस्कार केले ,खूप कष्ट केले पण शिवबाने त्याचे चीजच केले ना ... म्हणून तर एवढ्या वर्षानंतर त्यांचा जन्मोत्सव साजरा होतो .'
' मी पण माझ्या मुलावर छान संस्कार करतेय , खूप कष्ट घेतीय बघू काय दिवे लावतोय .. '
' काय करतेस मुलासाठी ?' आजी बाईने प्रश्न विचारला .
' अहो काय करते म्हणूंन काय विचारता .. त्याचा छान अभ्यास घेते , पहिला नंबर कधी चुकला नाही. डान्स क्लासला टाकलं आहे , पोहण्याच्या क्लासला जातो , स्पोर्ट्स मध्ये आहे . ऑल राऊंडर आहे माझा मुलगा . त्याचा थोडाही वेळ मी वाया जाऊ देत नाही . तो कधीच हारत नाही नेहमी प्रत्येक गोष्टीत अव्वल असतो .'
नेहा खूप अभिमानाने बोलत होती,
'बरं का आजी बाई हे सर्व मीच करते . घर , ऑफिस सांभाळून .. अगदी जिजाऊ सारखी एकटी .. '
हे सांगताना नेहाच्या डोळ्यात पाणी आलं .
आजीबाईनी कौतुकाची थाप नेहाच्या पाठीवर मारली ," शाब्बास मुली , मुलाची प्रगती छान करतेस , नक्कीच तो प्रगतीच्या शिखरावर पोहचेल . तो स्वतःसाठी , तुझ्यासाठी , तुझ्या कुटुंबासाठी सर्व काही करतो पण समाजासाठी तो काय करतो ?"
" समाजासाठी कशाला काय करायला हवं ..! तो तर किती लहान आहे यासाठी , समाजकार्य करायला थोडच त्याला राजकारणात जायचं आहे . त्याला तर खूप शिकून परदेशात जायचं आहे . खूप पैसे कमवायचं आहे ." समजावण्याच्या स्वरात नेहा बोलली . "
" तुझा मुलगा प्रगती करेल, बक्कळ पैसा कमवेल , कोट्याधीश होईल पण कोणाच्या लक्षात राहणार नाही , छत्रपती शिवाजी महाराजांसारखा "
"म्हणजे ?" नेहा रागानेच बोलली
" अगं मुली जिजाऊ ने मुलाची प्रगती तर पाहिलीच पण तुझ्या हुशारीचा उपयोग समाजाला कसा होईल याचे धडे मुलाला दिले . शिवबाला जिंकण्यासोबत हरायला शिकवले , हरण्यातला विजय काय असतो ते शिकवलं. गरजू व्यक्तींना मदत करायला , स्त्रियांचा सन्मान करायला शिकवले , म्हणूनच ते छत्रपती झाले . हे सर्व भाषण म्हणजे राजेंनी केलेल्या पराक्रमाची आरती आहे . आपल्या पुढील पिढीला त्यांच्या पासून प्रेरणा मिळावी हाच हेतू आहे . "
नेहा शांतपणे सर्व ऐकून घेत होती .
आजीबाईने नेहाच्या डोक्यावर हात ठेवला तशी नेहाची नजर आजीबाई च्या डोळ्यात गेली , आजीच्या हृदयातले भाव डोळ्यात दिसत होते. त्यांचा प्रत्येक शब्द तोंडातून नव्हे तर हृदयातून बाहेर येत होता .
" मुली , तुझ्या मुलाला खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज बनावाचे असेल तर लोकहितातून , समाजकार्यातून प्रगती करण्याचे संस्कार दे . त्याच्या ज्ञानाचा फायदा इतर मुलांना होऊ दे . परदेशात जाऊन पैसे कमावण्यापेक्षा आपल्याच देशात राहून माणुसकी कमवायला शिकवं. याच वयात हे शिक्षण देशील तर खऱ्या अर्थाने तू जिजावू होशील "
थोडावेळ शांततेत गेला तसा नेहानी प्रश्न विचारला ," आजी तुमचा मुलगा कुठे आहे ?"
आजीबाई नेहाकडे बघून हसल्या व अभिमानाने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याकडे बोट दाखवले ," हा बघ माझा मुलगा , याचा सोहळा पहायला मी इथे आली आहे."
नेहा शिवाजी महाराजां कडे असं पाहत होती जणू महाराजांकडे प्रथमच पाहत आहे . नेहाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला व तोंडातून शब्द बाहेर पडले .. " म्हणजे .. ?"
शेजारी , इकडे - तिकडे पाहते तर कोणीच नाही . मागे वळून पाहिलं तिथेही कोणी नाही , न राहवून बाजूच्या बाईला विचारलं " आजी कुठे गेल्या ?"
" कोण आजी ? तुम्हीच तर बसल्या आहेत माझ्या शेजारी . बडबड करू नका खाली बसा , मला माझ्या मुलाचा फोटो काढायचा आहे ." नेहाच्या अंगावर ओरडत बाई बोलल्या .
" म्हणजे .. जिजाऊ ... मी एवढा वेळ जिजाऊंसोबत बोलत होती .. जिजाऊ माझ्या बाजूला बसल्या होत्या .. !!
थोड्या वेळाकरात नेहा चक्रावून गेली , देवाने प्रगट होऊन दर्शन दिल्यावर जसे डोळे दिपून जावेत तशी नेहाची अवस्था झाली होती . जिजाऊंचा तो तेजस्वी चेहरा अजूनही तिच्या डोळ्या समोरून जात नव्हता. जिजाऊंच्या पायाची धूळ कपाळाला लावली. जिजाऊ सोबतचा सर्व संवाद आठवून नेहाच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला , याच प्रकाशात आपल्या मुलाला घेऊन जायचं आहे असा निश्चय करून मुलाला घेऊन नेहाने घर गाठले ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment