महिला दिन..जय हो..
स्टेज वर उभ्या असलेल्या कमलाच्या डोळ्यातली चमक व चेहऱ्यावरचा आत्मविश्वास पाहून प्रियाला खूप समाधान वाटलं व ओठातून शब्द बाहेर पडले " जय हो.."
मागच्या वर्षी याच दिवशी कल्पना मनात रुजली याचं इतकं छान फळ मिळेल याची प्रिया ने कधी अपेक्षाच केली नव्हती.
आज 8 मार्च महिला दिन , माझा हक्काचा दिवस . काय बरं करायचं आज असा प्रश्न प्रियाला पडला होता . हळदी-कुंकू, बक्षीस वितरण, गेम्स, पार्टी , केक कापणे , डान्स करणे याचा तिला मनोमन खूप कंटाळा आला होता. काहीतरी नवीन करायचा होतं पण नेमकं काय करायचं तेच सुचत नव्हतं.
प्रियाच्या मनातली ही खंत तिच्या नवऱ्याने बरोबर ओळखली.
"महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. आज काय प्रॉग्रॅम आहे मॅडम ? " या आवाजाने प्रिया भानावर आली.
" अरे कार्यक्रम तर खूप आहेत पण काहीतरी वेगळं करण्याचा विचार आहे पण काय करायचं सुचतच नाही , सुचव ना तूच काहीतरी .. ?
' ओके , मॅडमला वेगळं करायचं आहे .. अगं , आपण मागच्या आठवड्यात सलमान खानचा सिनेमा पहिला होता ' जय हो ' असं काहीतरी कर ना .'
एखादी मौल्यवान गोष्ट सापडल्यावर जसा आनंद व्हावा तसा आनंद प्रियाला झाला ,लगेच चेहरा खुलला . आपल्याला नक्की काय करायचं आहे याची योजना डोक्यात तयार झाली .
" अरे हो ना मस्त आयडिया दिलीस तू .. चल आताच लागते कामाला ... "
महिला दिनी बायकोचा खुललेला चेहरा पाहून नवरोबा खुश होऊन ऑफिसला गेले .
शेजारच्या ब्लॉक मध्ये साधारण तिच्याच वयाची कमला राहत होती . कमला दिसायला सुंदर , चुणचुणीत , हुशार पण हल्ली निस्तेज ,उदास व गबाळी दिसत होती . हल्ली तिने प्रियाशी बोलणं सुद्धा कमी केलं होतं .
एका प्रख्यात डॉक्टरांकडे तिची ट्रीटमेंट चालू होती .
प्रियाने कमलाच्या दाराची बेल वाजवली एक सुंदर गुलाबाचा फुल देऊन महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या .. "आज महिला दिन आहे का.. अरे मी विसरलेच .. " स्वतःचा गाऊन मधला अवतार सांभाळत , केसाचा पिसारा ठीक करत प्रियाला पण तिने शुभेच्या दिल्या .
" आज दुपारी काय करतेस ? ये ना माझ्या घरी आपण वूमन'स डे सेलेब्रेट करू .."
" नाही ना , नाही जमणार ; खूप कामं आहेत तुम्ही करा सेलीब्रेट मला नाही जमणार , थँक यु बोलावल्याबद्दल "
" काहीही कारण मला चालणार नाही तुला यावंच लागेल .. "
प्रियाचं बोलणं ऐकून कमलाच्या सासूबाई बोलल्या ,' अगं जा ना ती बोलावते तर .'
सासूबाई व प्रिया समोर कमलाचा नाईलाज झाला .
' ठीक आहे येते मी दुपारी . ' नाखुशीने पण ओठावर खोटं स्मित हास्य आणत कमला बोलली .
दुपारचे दोन वाजले , अडीच वाजले पण कमलाचा काही पत्ता नाही ,आता येईल कि नाही अशीच शंका वाटू लागली एवढ्यात दाराची बेल वाजली . प्रियाचा चेहरा खुलला धावतच जाऊन दार उघडलं . छानसा ड्रेस घालून कमला दारात उभी होती .
प्रियाचा जीन्स टॉप मधला लुक कमलाला खूप आवडला ." किती सुंदर दिसतेस जीन्स मध्ये , मलाही खूप आवडते जीन्स टॉप घालायला पण हे बघ माझं पोट , कमीच होत नाही . "
" रोज थोडा व्यायाम करायचा जाईल बरोबर आत ." प्रिया हसून बोलली .
"मुलांचा डबा , मिस्टरांचा डबा कुठे वेळ मिळतो मला " नाराजीच्या स्वरात कमला बोलली .
"प्रिया , तुला कसा वेळ मिळतो हे सगळं करायला ? तुझ्याकडे तर मदतीला बाई पण नाही . तुझे स्टेटस चे फोटो , व्हिडिओ पाहते मी . किती मज्जा करता तुम्ही . मला हि खूप आवडतं हे सगळं पण मी खूप अडकली गेली आहे अजिबात वेळ मिळत नाही मला " घड्याळाकडे बघत कमला बोलली .
" अगं कमला , वेळ कधीच मिळत नसतो तो काढावा लागतो . मीही माझी घरातली सर्व कामं करते , घर नीटनेटकं ठेवते पण मी घराला व घरातल्या लोकांना वाहून घेतले नाही माझ एक स्वतंत्र अस्तित्व आहे याची त्यांना व मला स्वतःला नेहमी जाणीव करून देत असते . मला ज्या गोष्टी आवडतात त्या मी दिवसातून एक तास आवर्जून करते . "
" बरं जमत बाई तुला हे सगळं . "
" मलाच नाही तुला हि जमेल हे सगळं . तुझं किती नाव आहे सोसायटी मध्ये तू तर एक आदर्श आई ,सून , बायको व गृहिणी आहेस . तू इतकी गुंतलेली नाती प्रेमानी सांभाळू शकतेस तर स्वतःच आदर्श अस्तित्व नक्कीच निर्माण करू शकतेस ."
प्रियाच्या बोलण्याने कमला सुखावली
" दिवसातला फक्त एक तास मी स्वतःसाठी काढला तर मी पण तुझ्यासारखी होऊ शकेन ?"
" हो नक्कीच , करून तर बघ .. मी तर म्हणते आज पासूनच सुरुवात कर. " प्रियाने कमलाचा हात हातात घेतला व डोळ्यातून विश्वास दिला कि तू हे करू शकतेस .
सर्व मैत्रिणी एकत्र जमल्या गाणी , डान्स ,फोटो , हसणं - खिदळणं यात दोन तास कसे गेले कळलंच नाही . कमलाही सर्व मैत्रिणी मध्ये खूप रमली होती . कमलाचं हसता - हसता डोळ्यातलं पाणी प्रियाने बरोबर हेरलं.
कमलाला डॉक्टरांची नाही तर मैत्रिणीची गरज होती , स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची गरज होती हे प्रियाने ओळखून तिचा महिला दिनाचा संकल्प पूर्ण केला होता .
मागच्या एक वर्षात कमळामध्ये आमूलाग्र बदल झाला होता . व्यायाम करून छान बारीक झाली होती . जीन्स नाहीतर वन पीस पण आत्मविश्वासाने मिरवत होती .
आज महिला दिनानिमित्त व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण ती महिलांना देत होती .
टाळ्यांच्या आवाजाने प्रियाची तंद्री उडाली , कमला तिच्या बाजूला उभी राहून सांगत होती हीच माझी मैत्रीण जिच्या मुळे आज मी तुमच्या समोर उभी आहे .
" प्रिया , तुझे आभार कसे मानावे हेच मला कळत नाही . थँक यू व्हेरी मच . "
" कमला माझे आभार माणू नको फक्त एक संकल्प कर स्वतःचा आत्मविश्वास हरवलेल्या एका नारीला बाहेर काढ , तिला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव करून दे . आपण हि साखळी अशीच अखंड ठेवू म्हणजे आपली मैत्रीण खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा करू शकेल ."
म्हणूनच महिला दिन -- जय हो ..
Jai Ho 👌💐💐💐
उत्तर द्याहटवाKhup chan
उत्तर द्याहटवा