_*भोज्या-*_
_लेखिका- यशश्री रहाळकर._
आम्ही लहानपणी ' भोज्या ' नावाचा खेळ खेळत असू. कधी पारावर तर कधी मंदिराच्या सभागृहात. एकाद्या मजबूत खांबाला यात भोज्या असं म्हणतात. त्याला धावत जाऊन धरलं... की आपण सुरक्षित. साधारण असा खेळ होता.
आज अनेक वर्षांनंतर आयुष्याची एक गंमत लक्षात आलीये. आपल्याही कळत नकळत हाच खेळ प्रत्यक्ष आयुष्यातही आपण खेळत असतो. बरेचदा आपली सुरक्षितता आपल्यासाठी इतकी महत्वाची असते की 'भोज्या' चं दुःख आपल्याला उमगतच नाही.
एका जिवंत हाडामांसाच्या व्यक्तीला आपण आधाराचा खांब करतो, तेव्हा त्या खांबाच्या खांद्यावर पडणारा ताण आपल्या हृदयापर्यंत पोहोचूच न देता आपण आयुष्य जगत जातो. 'आधार देणं हे खांबाचं काम आहेच', असा सोयीस्कर अर्थ काढून मोकळे होतो.
थोडंस मन हळवं असलं ना की असे अनेक भोज्या तुम्हाला आजूबाजूला सहजी पाहायला मिळतील.
अगदी जवळच्या परिचित एका कुटुंबातील सासूबाई तरुण, निरोगी आणि स्वभावाने अगदी चटपटीत. नात झाली तसे त्यांनी संपूर्ण जबाबदारी स्वतःहून घेतली. सूनेची नोकरी अन मुलाच्या संसाराला मदत असा हेतू असावा.
आता नात जणू सासूबाईंची लेक असावी असे सारे घडू लागले. झोपण्यापासून दुखण्यापर्यंत सारे सासूबाई पाहत. "तिचे आजीशीच छान जमते!" म्हणत सुनबाई हात झटकून मोकळ्या झाल्या.
आता सासूबाई पुरत्या अडकल्या. वाढणाऱ्या नातीचे क्लास, शाळा व इतर पळापळीत त्यांना त्यांच्या मैत्रिणी, भिशी, भजन यांसाठी वेळ मिळेनासा झाला. कुरबुरी होऊ लागल्या, चिडचिड वाढली. हेतू काहीही असो, वा नसो त्यांचा भोज्या झाला होता. सूनबाई त्राग्याने उद्गारली, "स्वतःचेच नातवंड सांभाळत आहेत ना! कर्तव्यच आहे त्यांचं".
कर्तव्याच्या सीमारेषा कधीकधी परीघ ओलांडतात. ज्या व्यक्तीला गृहीत धरलं जातं त्या व्यक्तीची अवस्था बिकट होते.
कर्तव्याला आयुष्य वाहून घेणे ही अपेक्षा इतरांकडून वारंवार करतो आपण नाही ? मात्र आपल्या कर्तव्यांच्या बाबतीत मात्र " होईल तितकं झेपेल तितकं" अशी भाषा बदलत जाते.
एका पाच सहा भावंडांतील मोठया बहिणीकडे वृद्ध आई राहायला गेली. ताई अन आई पतीनिधनामुळे एकट्या पडलेल्या. तिलाही तेव्हा खरेतर आईचा आधार गरजेचा होता. दोघींचे आपापसांत उत्तम जमत असे. वर्षे उलटली. ताईचे वय सत्तर अन आईचे नव्वदीच्या घरात पोहोचले.
दरम्यान ताईचा लेक मोठा झाला, लग्न झाले. अनेक वर्षांनी, बऱ्याच उशीरा, वाट पाहून ताईला नातवंड झाले. आता ताईचे मन लांबच्या गावी असणाऱ्या नातवंडांकडे धाव घेऊ लागले. आईला तिथे नेणे शक्य नव्हते. प्रवास आणि वातावरण तिला झेपणार नव्हते. मात्र भावांनी एव्हाना ताईचा भोज्या केलेला होता.
'आता महिनाभर स्वतःच्या आईची सोय करायला कुणीही तयार नव्हते. तेव्हा ताईने आईला नेले ना! मग आता ती तिचीच जबाबदारी' अशी परस्पर सोयीची भूमिका बंधुरायांनी करून घेतली.
ताईची कर्तव्यात कसूर नव्हतीच, मात्र तात्पुरते तिच्या जागी खांब व्हायला कुणीही तयार नव्हते. प्रत्येकाला इथं मंदिराचा कळस व्हायचं असतं. झळाळणारा, दिमाखात उभा असणारा. मात्र खांब होणं नकोसं असतं.
बहुतांश गृहिणींच्या बाबतीत थोड्या फार फरकानं हे घडतांना दिसतं. घरातील जेष्ठ, मुले आणि पतीराज ह्यांच्या अनंत अपेक्षा निभावताना तिला दोन हात कमी पडतात. सरणाऱ्या वर्षांनंतर हळूहळू तिच्यावर अवलंबून असणारे कुटुंबीय तिला गृहीत धरू लागतात. तिचा भोज्या होतो. तिला तिचे स्वतःचे काही क्षण द्यावेत असे वाटेनासं होतं. घरात न सापडणाऱ्या गोष्टी, विविध असाईनमेंट, फाईल, औषधं वगैरे गोष्टींसाठी तिच्या नावाने शंख केला की ती बिचारी धावत पळत त्या शोधून पटकन हातात देते.
भोज्याला हात लावला... की आपण सुरक्षित. कर्तव्याच्या वारुवर स्वार झालेल्या माणसाच्या कानात महानतेचं वारं शिरतं. मग त्याला सगळ्यांचा उद्धार करणारा देवदूत व्हायची स्वप्ने पडू लागतात. याच जोशात व्यक्ती अनेक जबाबदाऱ्या उचलून घेत जाते. अन एक वेळ अशी येते की, त्याचा भोज्या होतो. आता त्याला हलता येणार नसते. घेतलेला भार पेलला नाही... तर मोडून पडावे लागते.
एका जिवलग मैत्रिणीला चार पाच नणंदा. सगळ्या आजूबाजूला हाकेच्या अंतरावर राहणाऱ्या. हीचा नवरा एकुलता एक भाऊ. कायम घरात एक नणंद रहायला. त्यांचे संसार त्यांचे प्रश्न.
हिचा जीव काऊन गेलेला. ही सगळ्यांचे मायेने करणारी. मात्र नणंदांची अपेक्षा 'वाढता वाढता वाढे...' होत गेलेली. प्रत्येक कामाला तिलाच बोलवायचं, राबवून घ्यायचं. पुढेपुढे अंगवळणी पडलेलं. या रगाड्यात स्वतःसाठी एक तास काढणे देखिल अवघड होत गेलं. आता वयाच्या तिशीत बीपी च्या गोळ्या घेण्याची वेळ तिच्यावर आली आहे. माझी लेक तिची खूप लाडकी. "हिला बहीण नसलेलाच मुलगा शोध गं!" ती आवर्जून सांगते.
एका प्रेमळ कर्तव्यदक्ष व्यक्तीचा पिटट्या पाडून त्याचा भोज्या केला... की प्रेम आटत जातं. उरतो तो फक्त नाईलाज.
एकत्र राहणारा मुलगा, गावातच दिलेली मुलगी, प्रेमळ जावई, सालस सून ह्या लोकांचा आपसूक भोज्या होत जातो. मूळात कर्तव्ये आनंदाने पार पाडणाऱ्या ह्या लोकांवर आईबाप आपला सगळाच भार टाकून सुरक्षित होतात. दुसरे न मोजणारे /लांब राहणारे/उर्मट अपत्य सुटून जाते. "तुला तर माहितीये तो काही करणार नाही" म्हणत भोज्याला हात लावला जातो. गिझर बिघडले बोलावं लेकीला, औषधे आणायला बोलावं लेकीला, बँकेत जायचे... बोलावं लेकीला... असे छोट्या मोठया गोष्टीत गावातल्या लेकीला बोलावून जेरीस आणले जाते. मुलाने आणि सुनेने प्रेमानं सांभाळलं, तरी त्याचे शब्दाने कौतुक न करता 'उलट हेच तर कर्तव्य आहे' असे गृहीत धरण्यात येते.
एकुलत्या एक अपत्यांची दैना तर विचारूच नका. त्यांनी कितीही प्रेमानं केलं, तरी "काय करेल नाईलाज" किंवा "दुसरं आहे का कुणी?" असे तिरकस टोमणे वाट्याला येतात. "सगळं डबोलं त्याचं/ तिचंच तर आहे ना!" म्हणत हिणवलं जातं. मात्र ते सो कॉल्ड डबोलं उपभोगायला व्यक्तीचे देहाचे झिजलेले अवयव साथ देणार आहेत का? हा विचार कोण करतं? खरंतर कर्तव्य प्रेमानं पार पाडणाऱ्या लेकरावर आणिक अधिकचा भार तरी किती टाकायचा?? ह्याचा विचार प्रत्येक आईवडीलांनी करायला हवा.
आजकाल आयुर्मान अफाट वाढले आहे. आपण ऐंशीच्या घरात असतांना आपले साठीचे मूल ? थकलेले असते हे सामंजस्याने लक्षात घ्यायला हवे.
आपण कलियुगात जगतो आहोत. इथं मोजकीच माणसं कर्तव्य ह्या शब्दाला खऱ्या अर्थानं जागतात. मात्र एकदा खांब होत आधार दिला... की सारंच त्याच्यावर सोपवून मोकळं होणं आणि स्वतः सुरक्षित होणं ही स्वार्थाची भूमिका त्या बिचाऱ्या खांबासाठी तरी बदलायलाच हवी.
कर्तव्य आनंदानं पार पाडणं, ही जरी खांबांची जबाबदारी असेल तरी मायेच्या छपरानं त्याला झाकून घेणं ही त्या खांबावर ओझं टाकणाऱ्या छताची जबाबदारी निश्चित आहे ना!
कर्तव्य पार पडणाऱ्या त्या खांबावर कौतुकाचा वज्रलेप चढवायला हवाच. अनेक लोक म्हणतात, "कौतुक वगैरे गोष्टींनी फक्त लहान मुलांना प्रेरणा मिळते." खरं सांगू, आयुष्यभर माणसाला दोन शब्द कौतुकाचे हवेच असतात. कौतुकानं ओझं कमी होत नाही... पण पेलणारे हात बळकट होत जातात.
_*©️यशश्री रहाळकर.*_
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment