मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

शनिवार, २३ जुलै, २०२२

श्रावण महिना.

 ‘श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे’

मराठी महिन्यांपैकी एक महत्वाचा महिना म्हणजे श्रावण महिना. श्रावण महिन्यालाच सणांचा महिना असेही म्हणतात. याची आपण सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतो. विशेषता स्त्रियांच्या आवडीचा आणि हवाहवासा वाटणारा हा श्रावण महिना याची सर्व स्त्रिया व मुली आतुरतेने वाट पाहत असतात. कारण याच महिन्यात आपल्या भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे बरेच सण असतात. त्यामुळे स्त्रियांना नटायला मिळते, हौसमौज करायला मिळते.

असा हा श्रावण महिना खूप फसवा असतो. ऊन पडले आहे असे म्हणता म्हणता पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागतात. श्रावणातील हा ऊनपावसाचा खेळ पाहून मन हरवून जाते. अवचित कधीतरी सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मंगल तोरण आकाशाला एक वेगळीच शोभा आणते. तसेच हा श्रावण पक्ष्यांचा राजा मोर यास डौलदार पिसारा फुलवून नृत्य करण्यास आव्हान करतो. पावसाच्या सरी कोसळू लागल्या की मोराला थुई थुई नाचायला प्रोत्साहन चढते. अशातच पिसारा फुलवून नाचताना त्याची छबी कॅमेरामध्ये टिपतानाचा अनुभव हा खूपच अविस्मरणीय असतो.

श्रावणमास म्हणजे व्रतवैकल्यांचा आणि सणावारांचा महिना. श्रावणातील सोमवारांचे खूप माहात्म्य आहे यादिवशी बऱ्याच लोकांचा उपवास असतो. मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. तसेच शनिवारी मारुतीची आराधना केली जाते. या श्रावणात माणूस आपल्या उपकारकर्त्या निसर्गबांधवांनाही विसरत नाही. म्हणून तर उंदरांपासून पिकांचे संरक्षण करणाऱ्या नागांची नागपंचमीला पूजा केली जाते.  नापंचमीनंतर येणारी राखीपौर्णिमा म्हणजे स्त्रियांच्या माहेरचा जिव्हाळा सासरघरी येण्याचा दिवस. यादिवशी सकाळपासून घरादारात चकरा सुरु होतात. भावाची आतुरतेने वाट पाहिली जाते. भावाला साखरभात खायला घालायचा असतोच पण आईकडून डब्यात येणार्‍या ओल्या नारळाच्या करंज्यांचीही वाट पाहिली जाते! नाजूक रेशमाच्या धाग्याने सगळे बंध बांधून ठेवलेले असतात. , श्रावणात मनाच्या सांदी कोपर्‍यात उत्साहाचे नवे ऋतू फुलत असतात. बहुतेक सगळ्या सणांमध्ये आणि अंगीकारल्या जाणार्‍या व्रतवैकल्यामध्ये येणार्‍या संकटांमधून निर्भीड आणि यशस्वीपणे बाहेर येण्यासाठी शक्ती मिळवण्याची प्रेरणा मिळते. संसारातील सुख-दुःखांचा सारीपाट मांडला असताना मन मोकळं करून सख्यांना समजून घेण्याचे हक्काचे क्षण हा महिना देऊन जातो.

श्रावणातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून या दिवशी स्त्रीपुरुष भाविक उपवास करतात आणि कृष्ण जन्माचा सोहळा साजरा करतात. श्रावणातील नवमीला बालगोपाल गोपाळकाला, दहीहंडी साजरी करतात. त्यानंतर येतो तो बैलपोळा. यालाच श्रावणी पोळा असेही म्हणतात. शेतकरी आपल्या बैलांच्या गळ्यात घुंगराच्या माळा घालतात त्यांची सजावट करतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलाची पूजा करतात त्यांना नैवेद्य दाखवतात आणि सर्व गावकरी मिळून या बैलांची गावामध्ये मिरवणूक काढतात.

पुराणातील सावित्री, सीता, द्रौपदी, अहिल्या आणि तारामती या सगळ्यांचा वारसा जपण्याची ही परंपरा... 'उतू नको मातू नको, घेतला वसा टाकू नको' असं म्हणत स्वतःला खंबीर बनवण्याचा हा एक निखळ मार्ग. गेल्या अनेक वर्षांपासून आपण या परंपरा पाळत आलो आहोत. नवचैतन्य निर्माण करणार्‍याया सणांना आजही तितकंच महत्त्व दिलं जातं. पुराणांशी आणि परंपरेशी घट्ट नातं बांधून घेणार्‍या स्त्रियांना बळ प्राप्त करून देणारं हे विश्व. काळानुरूप सणवार साजरे करण्याच्या पद्धती बदलत असल्या तरी त्यांचं महत्त्व तसुभरही कमी झालेलं नाही. पावसाच्या सरींबरोबर मनाच्या कोंदणातील भाव व्यक्त करण्याचा आजी आणि माय-मावशांनी दिलेला वारसा आपण आजही जतन करून ठेवला आहे. या महिन्याला पावसाची खूप सुंदर साथ असते. या हलक्या सरींबरोबर मन उल्हासित झालं नाही तरच नवल. स्त्रियांच्या भावविश्वात पावसाचं स्थान अनन्यसाधारण आहे. पावसाच्या सरींबरोबर गाण्यांच्या सप्तसुरांमधून मन मोकळं करण्याची हातोटी असल्यामुळे पाऊस, सणवार आणि गाणी हे समीकरण श्रावणात पक्क झालं आहे. नागपंचमी, मंगळागौरीला रात्री जागरण करण्याची प्रथा आहे. रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा यासारखे खेळ खेळताना पारंपरिक गाण्यांची आठवण होणं तितकंच स्वाभाविक. पूर्वीच्या स्त्रियांना बाहेर पडण्याची संधी मिळत नसे. आजच्या स्त्रिया नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडू लागल्या आहेत. पण घरातील व्याप सांभाळून ऑफिसिमधील कामांचा ढीग संपवताना स्वतःसाठी वेळ काढणं आजच्या स्त्रीलाही शक्य होत नाही. म्हणजे एकूणच कायतर मैत्रिणींना एकत्र येण्यासाठी संधी, निमित्त हवं असतं. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template