" आजोबा, तुमच्याजवळ काही नाणी, चाव्या असतील तर काढून ठेवा.."
एमआरआय करायला गेल्यावर तिथल्या असिस्टंटनी आजोबांची फाईल बघत सहज विचारलं.
आजोबा गोंधळून गेले, जानव्याला अडकावलेली चावी मुठीत गच्च पकडली व विनंतीच्या स्वरात बोलले " फक्त एकच चावी आहे , राहू द्या ना.. मी आतल्या खिशात टाकून देतो कोणाला दिसणार नाही ."
" अहो आजोबा असं चालणार नाही, ती मशीन आहे . चावी काढून त्या लॉकर मध्ये ठेवा, कोणीही घेणार नाही तुमची चावी."
आजोबांनी नाईलाजाने जानव्यासहित चावी माझ्या हाती दिली. एखादा अनमोल ठेवा विश्वासाने माझ्याकडे द्यावा असे भाव त्यांच्या डोळ्यात दिसत होते.
मी सांभाळून ठेवते तुमची चावी काही काळजी करू नका असे डोळ्यांनी व आजोबांचा हात हातात घेऊन सांगितलं.
पांढऱ्या शुभ्र जानव्ह्याला अडकावलेली चावी खुपचं रेखीव होती. आज पर्यंत कितीतरी चाव्या माझ्या हातात आल्या असतील पण या चावीची बातच काही वेगळी होती.
आजोबा बाहेर येईपर्यंत मी सतत त्या चाविकडे पाहत होते, आजोबांच्या कमरेला असलेली ही चावी कशाची असेल? काय असेल त्यात ?
माझा जन्म होण्याच्या अगोदर पासून ही चावी त्यांच्या जवळच होती, म्हणजे नक्कीच काहीतरी खास असेल यात. हा अनमोल ठेवा कुठे पडू नये म्हणून मी ती चावी रुमालात बांधून पर्स मध्ये ठेवून दिली.
अर्ध्या तासानंतर आजोबा बाहेर आले . बाहेर येता क्षणी चावी कुठे आहे असा हातवारे करून प्रश्र्न विचारला.पर्स मधून चावी काढून आजोबांच्या हातात ठेवली. चावी हातात घेताच त्यांचा चेहरा खुलला.
आजोबा तसे दिलदार स्वभावाचे होते. प्रत्येक गोष्ट इतरांना देण्यात व वाटण्यात त्यांना आनंद मिळायचा. नातवांच्या बाबतीत तर ते नेहमीच उदार असतं. आम्हा सर्वांना त्यांनी भरभरून दिलं पण ही चावी ते का देत नव्हते हे एक आमच्यासाठी गूढच होतं.
" आजोबा ही चावी कुठल्या कुलूपाची आहे?." असं विचारण्याचा प्रयत्न केला पण या प्रश्नाचं उत्तर आजोबा टाळायचे व कधी कधी तर ते चिडत असतं त्यामूळे "ती चावी" हा विषय आम्ही सोडूनच दिला.
दोन वर्षांपूर्वी आजोबा खूप आजारी पडले.हळू हळू त्यांची शक्ती कमी होत होती. अंथरुणावर खिळून होते . बोलणं बंद झालं . त्यांचे हाल पाहवत नव्हते , देवाने त्यांना आता सोडावे असच आम्हाला वाटत होते. आजोबा सतत हातानी काहीतरी चाचपडत असतं.
नेमकं आजोबांना काय हवं आहे हे कळतच नव्हतं.
माझी नजर खाटाच्या सांधित अडकून बसलेल्या जानव्ह्याकडे गेली. आजोबा नजरेनी कितीतरी दिवस आम्हाला सांगत होते पण ही साधी गोष्ट कळली नाही.
माझ्या डोक्यात प्रकाश पडला" अरे, आजोब ती चावी तर शोधत नसतील.."
आजोबांच्या हातात " ती चावी" दिली.
मुठीत चावी गच्च पकडून हृदयास लावली, डोळ्यातून आनंदाश्रू तरळले , दुसरा हात माझ्या हातात देत आजोबांनी शेवटचे डोळे मिटले..
आजोबांच्या कपाटात मला एक डायरी सापडली त्यात " चावीचं" गूढ सापडलं..
काय आहे चावीच गूढ पाहूया पुढच्या भागात..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment