आज आरतीला आकाश ठेंगणं झालं होतं, आनंद गगनात मावत नव्हता. नवऱ्याचा हात हातात घेऊन , डोळ्यातल्या आनंदाश्रू सह बोलली,"माझ्या आयुष्यात इतकी छान घटना घडू शकेलं असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं."
गालावर ओघळलेले आनंदाश्रू पुसत आकाशराव बोलले," मी तुला बोललो होतो ना , जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. आयुष्यात येणारे सुखाचे - दुःखाचे प्रसंग एक नवीन संधी म्हणून स्वीकारली की आयुष्याचे असे नंदनवन होते. चल....मला उशीर होतोय...संध्याकाळी सेलिब्रेशन करू.. मस्त कँडल लाईट डिनरला जाऊ तुझ्या आवडत्या ठिकाणी." असं म्हणत आकाश बाहेर पडला.
आकाश बाहेर पडताच आरतीने दरवाजा बंद केला व सोफ्यावर बसून वर्तमानपत्रातील ती बातमी परत परत वाचत होती. बातमी वाचताना मन दहा वर्षापूर्वी घडलेल्या घटनांचा वेध घेऊ लागलं...
अभिषेक आरतीचा एकुलता एक मुलगा. त्याच्या येण्याची चाहूल लागली तेंव्हापासून स्वतःच आयुष्य त्याच्या भोवती वेढून टाकलं.
आपला मुलगा चार चौघां सारखा नको तो असामान्य झाला पाहिजे म्हणून सर्व प्रयत्न केले.
गर्भात असताना गर्भ संस्कार केले. मुलाकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून चांगली सरकारी नोकरी सोडली. आपल्या तल्लख बुद्धीच्या मुलावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. अभिषेकच्या अभ्यासात, खेळात, वागण्या- बोलण्यात कसलीच कमी नव्हती.
मुलासोबत आईची वाहवा सगळीकडे होत होती.
आरतीला लोकांकडून होणाऱ्या प्रशांसेच विशेष कौतुक नव्हतं कारण तिने सर्व काही स्वतःच्या समाधानासाठी केलं होतं.
मुलाच्या बुद्धिमत्तेची चमक उच्च शिक्षणात दिसून आली, एका जर्मन कंपनीने गलेलठ्ठ पगाराची नोकरी त्याला देवू केली. आनंदाची बातमी घेऊन अभिषेक घरी आला तसा आरातीला खूप आनंद झाला पण दुसऱ्याचं क्षणी मनात चिंता व काळजी दाटून आली.
माझं बाळ माझ्यापासून दूर जाणार या विचारानेच अंगात ताप भरला. आईची ही अवस्था पाहून अभिषेक परदेशात न जाण्याचा निर्णय घेत होता.
आरतीच्या नवऱ्याने आकाशने तापाचे कारण जाणले व तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलले." आपल्या पिल्लाला आता पंख आले आहेत, तो त्याच्या बळावर उडू शकतो. ज्या साठी तू इतका अट्टाहास केलास आणि आता उडायची वेळ आली तर पंख छाटन्याचा विचार करतेस.."
नवऱ्याच्या बोलण्याचा घाव मनाला लागला, आरतीला रडू कोसळलं , रडत रडत बोलली," माझ्या बाळाचे पंख मीच कशाला छाटेल..? अहो माझ्या पोटचा गोळा आहे तो... माझ्यापासून दूर जाईल याचं दुःख तर आहे पण आई म्हणून खूप काळजी वाटते. त्या थंड देशात चालला आहे...तुम्हाला माहित आहे त्याला थंडी भरली की किती त्रास होतो. सर्दी खोकला झाला तर लवकर जात नाही. तिथे त्याची काळजी कोण घेईल...? आपण इथे छान ताजं खाऊ पण त्याला मात्र तिथे ब्रेड पावावर दिवस काढावे लागतील..
आपण मुलांना लहानाचं मोठं करतो, त्यांच्यावर संस्कार करतो, प्रसंगी आपले शिक्षण करिअर वरती पाणी सोडतो पण ज्या वेळी आपल्याला यांची गरज असते त्यावेळी मात्र ही पोरं आपल्याला टाटा बाय बाय करत कायमचे परदेशात निघून जातात... एकुलते एक मूल असणाऱ्या आई बाबा नी काय करायचं अशा वेळी..?"
आरती ढसा ढसा रडू लागली.
आकाशनी आरतीला थांबवलं नाही. मनभरे पर्यंत रडू दिलं. रडणं थांबताच तिला पाणी पाजलं व समजावत बोललं." तू आज पर्यंत जे अभिषेक साठी केलंस ते प्रत्येक आई आपल्या मुलासाठी करते,तू विशेष असं काही केलं नाहीस. तुझं कर्तव्य तू केलंस. आज आपला मुलगा पुढे जातोय तर जाऊ दे, कदाचित त्याच्या या दूर जान्यातून तुझ्या साठी देवांनी नवीन संधी तयार करून ठेवली असेल. जास्त विचार करू नको .जे होतं ते चांगल्यासाठीच होतं ..."
नवऱ्याच्या या बोलण्याचा आरतीला रागही आला व नवलही वाटलं. मुलाच्या परदेशात जाण्यानी माझं काय चांगलं होणार आहे...!!
आरतीच्या आयुष्यात जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे वचन खरं ठरेल का..? पाहूया पुढच्या भागात...
खरंच प्रत्येक घटना एकमेकांवर किती अवलंबून असतात. आपण मात्र मनाविरुद्ध घडलं की,नशिबाला दोष देतो.
#चांगल्यासाठीहोत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment