काका - काकूच्या लग्नाचा पन्नासाव्वा वाढदिवस आहे म्हणून रिया काकाकडे आली होती.
रिया ने घरी प्रवेश करताच काकांचा आवाज कानावर आला,"मला तुमची ही वाढदिवसाची थेरं अजिबात आवडली नाहीत, मी काही कुठे येणार नाही, तुला जायचय तर तू जा.."
" जळल मेलं लक्षणं ते.. मुलं हौस करतात ते पण करून घेता येत नाही या माणसाला." काकू तावातावात बोलत होत्या.
रिया आल्याचं कळताच दोघे शांत झाले.
काकांचा स्वभाव व्यवहारी व काटकसरी होता तर काकू आयुष्याचा मनसोक्त आनंद घेणारी स्वच्छंदी बाई होती.
या वयात लग्नाचा वाढदिवस करणे म्हणजे "पैशाचा अपव्यय आहे, त्यापेक्षा बँकेत जमा करा तुमच्या भविष्यात कामाला येतील"
हा काकांचा विचार होता,त्याउलट काकूचं म्हणणं
" देवांनी सगळं भरभरून दिलं आहे तर घेऊ ना आनंद" हा काकूंचा विचार
" तुम्हा दोघांना हॉटेल मध्ये घेऊन येण्याची जबाबदारी मी घेतली आहे, चला काय मदत करू सांगा.."
रियाने असं म्हणताच दोघांनी एकमेकांकडे पाहिलं व काका आतल्या खोलीत निघून गेले..
" काय झालं काकू.."
" काही नाही ग, नेहमीचचं.. संध्याकाळी हॉटेल मध्ये येणार नाही म्हणतात.."
" अहो, पण सगळी तयारी झाली आहे, इव्हेंट पण ठेवला आहे, सगळ्यांना निमंत्रण पण केलं आहे." काळजीच्या स्वरात रिया बोलली
" काळजी करू नको , यांना मी पन्नास वर्षांपासून ओळखते, नाही म्हणतील पण माझं मन मोडणार नाहीत. हा घे कुर्ता , कालच नवीन आणला आहे त्यांना संध्याकाळी घालायला दे..नाहीतर येतील जुना तोच सदरा घालून.." रियाच्या हातात कुर्ता देत काकू बोलली.
रियाचा मोर्चा आता काकांकडे गेला , काका कपाटातला सदरा काढत बोलले," आज तू इथे आली म्हणून नाहीतर..."
खरंच काकांनी जुना सदरा काढला होता.
काकांचं बोलणं टाळत रिया बोलली," काका, हा कुर्ता घाला ना छान दिसेल तुम्हाला.."
"असे दहा कुर्ते माझ्याकडे पडून आहेत आता नवीन कशाला आणला..हे तुझ्या काकूचं काम असेल..मी नाही घालणार हा कुर्ता.."
रीयाच्या मोबाइल वरती तिच्या नवऱ्याचा कॉल आला म्हणून कुर्ता तिथेच ठेऊन बाहेर आली.
" मला तुझ्याशी बोलायचं नाही.. प्लिज मला कॉल करू नको.."असं म्हणत फोन कट केला.
" हे घे शेवयांची खीर, तुझ्या काकांना आवडते म्हणून केली होती." काकूंच्या आवाजाने रिया भानावर आली.
" काय ग.. जावई बापू येणार ना संध्याकाळी.."
" काकू , तू कुठली साडी .." काकूंच बोलणं टाळत रिया बोलली.
" मोरपिशी कलर यांना खूप आवडतो म्हणून ही पैठणी नेसणार आहे, मला मेकअप करून दे ..आणि हो छानसा आंबाडा घाल..मुली लग्नात घालतात तसा.."
काकूंचा उत्साह व काकांचा निरस स्वभाव काय विचित्र कॉम्बिनेशन आहे असा विचार करत रीयाने काकूंना छान तयार केलं. हॉटेल मध्ये जाण्याची वेळ आली पण काका येणार का वाढदिवस साजरा करायला... का, काकूंचा हिरमोड होईल .... मग वाढदिवस कसा साजरा होईल पाहूया पुढच्या भागात..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment