आटपाट नगर होतं तिथे एक पांडुरंगाची मनापासुन भक्ती करणारा खरा वारकरी होता त्याची ही कहाणी...
शुभदा नेहमी प्रमाणे ऑफिस मधून आली, हात पाय धुतले व सासू सासऱ्यांच्या खोलीत डोकावली , पण आज सासरे शून्यात नजर करून बसले होते तर सासूबाई डोळे पुसत होत्या.
" काय झालं आई.. बाबांना आज परत त्रास झालं का..?"
" नाही ग.. त्यांची ही अवस्था पाहवत नाही .."
" काही काळजी करू नका देव यातून नक्कीच मार्ग काढेल..."
असं म्हणत सासूबाईंच्या हातातला फोटो घेतला .
" आई , बाबा जवळ हा फोटो होता ना..का काढला तिथून.."
" अगं, उद्या आषाढी एकादशी, विठू माऊलीचा यांनी फोटो पाहिला तर.. कधीच वारी चुकवली नाही बाबांनी पण उद्या त्यांना उपास ही करणं जमणार नाही याचं खूप दुःख होतंय. चुकून त्यांना स्मरण झालं व एकादशी मोडल्याचं कळलं तर .."
" बाबांना उपास करू दे ना..त्यात काय हरकत आहे."
" अगं, पण त्यांना चार वेळा औषध घ्यायचं असतं.कसं शक्य आहे.. उपास म्हटलं की अजय चिडतो तुला तर माहितच आहे ना.."
" उपास केला म्हणजे उपाशी राहिलं पाहिजे असं थोडच आहे. सर्वजण जिभेचे लाड पुरवण्यासाठी उपास करतात पण या वर्षी आपण बाबांना गरज म्हणून पोटभर खायला देऊ. अजयला यातलं काही कळणार नाही , तुम्ही काही काळजी करू नका ..मी आहे ना.."
असं म्हणत सासुबाईना विश्वास दिला.
शुभदा एका खाजगी कंपनीत नोकरी करत होती त्यामुळे उद्याची सुट्टी तिला मिळणार नव्हती.
लग्न करून आल्यापासून तिने पाहिलं होतं की, आषाढी एकादशी म्हणजे घरी उत्सव असायला. घर विठुरायाच्या गजराने दुमदुमून निघायचं. विशेष सासऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहत असे. पांढराशुभ्र सदरा, खाली धोतर व कपाळाला टिळा या वेशातले तिचे सासरे आठवले व तिच्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले.
सहा महिन्यांपूर्वी अचानक सासऱ्यांची स्मृती गेली , आज अशी परिस्थिती होती की, समोरच्या आपल्या लोकांनाही ते ओळखत नव्हते. त्यांना होणारा त्रास बघवत नव्हता शेवटी सासूबाई बोलत होत्या, " सोड रे विठूराया माझ्या नवऱ्याला या त्रासातून."
शुभदा फोनच्या आवाजाने भानावर आली . बाबांच्या केअर टेकरचा फोन होता. उद्या सुट्टी मागत होता,त्याच्या आई बाबाना घेऊन मंदिरात जायचे होते . शुभदाने त्याला एक विनंती केली की, फक्त बाबांना आंघोळ घालून जा .. बाकीचं मी पाहून घेईन.
प्रथम शुभदाने बाबांच्या खाण्याचे वेळापत्रक तयार केले. असे खाद्य पदार्थ निवडले जेणे करून ते पचायला हलके असतील.
सासुबाईकडे उद्याच्या बाबांच्या खाण्याचे वेळापत्रक दिले व बाबांना घालायला पांढरा सदरा, धोतर व काळा टीका ठेऊन दिला.
ऑफिस सांभाळून, नवऱ्याला कळू न देता बाबांचं पोष्टिक खाण्याचं वेळापत्रक कसं सांभाळलं व विठूराया कसा त्यांच्यावर प्रसन्न झाला पाहू पुढच्या भागात..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment