" सौरभ, काय चाललंय तुझं..? भुवया का उंचावतोय...! उठ लवकर , कॉलेजला उशीर होतोय.."
आईचा आवाज कानावर पडताच सौरभ भानावर आला व काहीच न बोलता बाथरूममध्ये निघून गेला.
बाथरूममध्ये जाताच डोळे बंद केले एक चेहरा डोळ्यासमोर आणला व आरश्यात बघून परत डोळे मोठे केले,भुवया उंचावल्या व मान उजवीकडे वळवून पाहिली. कितीतरी वेळ त्याचे हेच उद्योग चालू होते.
बाहेरून आवाज आला," झोपला का रे..चल ये लवकर बाहेर..."
आईच्या आवाजाने सौरभ भानावर आला व अंगावर फक्त पाणी घेऊन अंघोळ आटोपली व कॉलेजला जायला निघाला . आज सकाळी उठल्यापासून त्याच्या कृत्रिम हालचाली चालू होत्या . डोक्यात काहातरी चालू होतं
" मी काहीतरी विचारतोय तुला, लक्ष कुठे आहे तुझं...घुम्यासारखा मान का हलवतो आहे.." सौरभचा मित्र यश ओरडून बोलला.
" कुठे काय काहीच नाही..बोल काय बोलत होता..." सौरभ भानावर येत बोलला.
" काही नाही..चल लवकर लेक्चर चालू होईल.."
यश सौरभला ओढतच घेऊन गेला.
आज सौरभचं लक्ष कश्यातच लागत नव्हतं.
कॉलेज मध्ये काय चालू आहे याच्याकडे त्याचं अजिबात लक्ष नव्हतं .
घरी जाऊन जेवण करून पटकन झोपून जावं व त्या भुवया उंचावणाऱ्या सुंदर मुलीला परत एकदा डोळे भरून पहावं असं वाटत होतं.
घरी पोहचायला त्यावेळी सात वाजले होते . आईने नाश्ता दिला तसा पटापट नाश्ता संपवला व आपल्या रूम मध्ये जावून डोळे बंद करून झोपला. झोपेची वेळ नव्हती त्यामुळे झोप येत नव्हती. झोप येण्यासाठी पुस्तक वाचत बसला पण झोप काही लागलीच नाही.
रात्री जेवण झालं, आज सौरभ कोणाशी काहीच बोलत नव्हता म्हणून बाबांनी आईला खुणेनेच विचारले. आईने पण मला नाही माहित असं खुणेनेच सांगून टाकले.
हात धुवून सौरभ झोपायला रूममध्ये गेला..डोळे बंद केले , अंधार केला तेंव्हा कुठे झोप लागली.
जिची इतक्या आतुरतेने वाट पाहत होता ती सप्नसुंदरी आली, भुवया उंचावल्या व सोबत येण्याची खूण केली..तिच्या सोबत जाण्यासाठी उठला तर कळलं..हे तर सप्न आहे...!
आता ही सप्नसुंदरी सतत स्वप्नात येत होती . काहीच बोलायची नाही फक्त भुवया उंचावत,चल अशी खूण करायची.. तिच्या सोबत जाण्यासाठी उठला की कळायचं, हे तर स्वप्न आहे.
सौरभचे काहीतरी बिनसले आहे हे आईच्या व त्याच्या मित्राच्या यशच्या लक्षात आले.
आईला काहीच सांगितलं नाही पण यशला मात्र आपल्या रोजच्या स्वप्नाबद्दल व सप्नसुंदरी बद्दल सौरभने सांगून टाकले .
" मेरे यार को तो प्यार हो गया.." यश असं म्हणत त्याला चिडवू लागला.
" अरे हो बाबा मी प्रेमात पडलो आहे तिच्या...पण आहे तरी कोण ही..काहीच बोलत नाही.. फक्त इशारे करते..कुठे शोधू हिला...??"
सौरभचा केविलवाणा चेहरा बघून,यशने त्याला ती मुलगी शोधून काढू असे वचन दिले.
दोघांनी मिळून सप्नसुंदरीचा शोध चालू केला . कॉलेज मधल्या प्रत्येक मुलीला दोघे निरखून पाहत होते .
दोघांच्या या उद्योगापायी त्यांच्यावर मुलींचा मार खाण्याची वेळ येवून गेली ..!!
सप्नसुंदरीची भेट कधी, कोठे व कशी झाली ते पाहूया पुढच्या भागात...
खूप छान.
उत्तर द्याहटवा