जून महिन्याचा शेवट व लग्न सराईचा शेवटचा मुहूर्त होता. माझ्या मावस बहिणीचे लग्न आटोपून आम्ही सोलापूर स्टेशन गाठले. रात्री पोटभर जेवण करून सिध्देश्वर गाडी मध्ये आरामात जाऊन बसलो. सकाळी मुंबईला पोहचून आमच्या नित्याच्या कामाला आम्ही लागणार होतो, सगळं कसं नियोजित होतं.
दिवसभराच्या दगदगीमुळे झोप कशी लागली ते कळलंच नाही.सकाळी पाच वाजता गाडी कर्जतला पोहचते त्यामुळे आलार्म सेट करून ठेवलाच होता.
मोबाइलच्या आवाजाने जाग आली, बॅग मध्ये शाल टाकली बाकी सामानाची आवराआवर केली व बाहेर स्टेशन कोणतं आहे पाहण्यासाठी डोकावले. बाहेर काळोख होता व मुसळधार पाऊस पडत होता. गाडी अगदी धीम्या गतीने पुढे जात होती. इतर प्रवाशांची चर्चा ऐकून कळलं की रेल्वे ट्रॅक वरती पाणी साचलं आहे त्यामुळे गाडी पुढे जात नाही. पाणी ओसरल्या शिवाय गाडी पुढे जाणे शक्य नव्हते.
सकाळी दहा वाजले तरी आम्ही त्याच ठिकाणी उभे होतो. जशी वेळ पुढे जात होती तशी भीतीने का भुकेने व्याकुळ झालो होतो. सकाळी लवकर पोहचणार म्हणून सोबत जेवण घेतलं नव्हतं. दुपारी 12 - 1 वाजता लग्नात मिळालेले चिवडा - लाडूचे पॅकेट काढले व सहप्रवाशासोबत खाऊन घेतले. बुढत्याला काठीचा आधार त्याप्रमाणे पोटाला थोडा आधार मिळाला.
प्रवास करताना नेहमी खायचे पदार्थ जवळ असावेत हा आईचा सल्ला आठवला पण त्याचा आता काहीच उपयोग नव्हता. प्रवासात अन्न वाया जाऊ नये म्हणून सोबत घेऊन आलो नाही अशी मनाची समजूत काढली.
संध्याकाळचे पाच वाजले त्यावेळी आमची गाडी कर्जत स्टेशनच्या जवळपास पोहचली होती.
तिथल्याच झोपड पट्टीतील लोकांनी पिठलं भात करून त्याचे छोटे पॅकेट बनवले व प्रत्येक डब्यात त्याचे वाटप करत होते.
पोटात भुकेने आग लागली होती म्हणून प्रत्येक जण हात पसरून जेवणाचे पॅकेट घेत होता. मीही माझा हात पुढे करून दोन पॅकेट घेतले त्यावेळी एक चेहरा ओळखीचा वाटला व नजर मला खुणावत होती . एक 10- 12 वर्षाची मुलगी हसून माझ्याकडे पाहत होती . माझ्या हातातले एक पॅकेट तिच्या हातात परत दिला व इतरांना वाटण्यासाठी हातानेच इशारा केला.
जेवणाचे महत्त्व शिकवणारी मुलगी मला नव्याने भेटली
अन्न हे पूर्ण ब्रह् आहे याचे संस्कार या छोट्या मुलीने करून दिले.असा हा अविस्मरणीय रेल्वे प्रवास .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment