" आजोबा तुमची चावी सांभाळून ठेवते " असं म्हणताच पिंडाला कावळा शिवला.
आजोबांच्या भावना या चावी मध्ये गुंतल्या गेल्या होत्या हे तर सर्वांना कळून चुकलं होतं पण ही चावी आहे कशाची हे गूढ मात्र अजूनही उकललेलं नव्हतं. आजोबांचं कपाट उघडले त्यावेळी एक डायरी सापडली . डायरीत एक पत्र दिसलं, पण हे तर आजोबांचं अक्षर नाही असं बोलतं पत्र वाचायला घेतलं.प्रिय अहो,
आज मी तुम्हाला एक गुपित सांगणार आहे जे मी तुमच्यापासून लपवून ठेवलं होतं.
आपण नवीन लग्न झाल्यावर आपल्या गावच्या जत्रेला गेलो होतो त्यावेळी मी तुमच्याकडून 10 रुपये मागितले होते त्यावेळी तुम्ही कुठलाही प्रश्न न विचारता मला पैसे दिले. मला त्या जत्रेत एक चावी दिसली, कुलूपा शिवाय असलेली चावी मला खूप आवडली ती चावी मी घरी आणली.
ती चावी सतत कमरेला मिरवताना मला श्रीमंतीचा भास होई . माझ्या मैत्रिणींना व आजूबाजूच्या लोकांना वाटे आपल्याकडे भली मोठ्ठी तिजोरी असेल.
आपलं लग्न झालं त्यावेळी तुमचा पगार खूप कमी होता ,त्यातून अर्धा पगार गावाला पाठवायचा असे त्यामुळे खूप कमी पैशातही आपला संसार सुखाने चालायचा कारण समाधानाची ही चावी माझ्या हाती होती. आपल्याला कधी कमीच पडणार नाही कारण तिजोरीची चावी माझ्या हाती आहे असा दृढ विश्वास माझ्याजवळ होता. आयुष्यभर या चावीने मला साथ दिली आपल्या घरी भरभराट झाली , भरपूर कपाट, तिजोऱ्या घरी आल्या पण या चावीची जागा कोणी घेऊच शकलं नाही.
ही समाधानाची चावी मी तुमच्या जानव्हायला बांधून ठेवली आहे तिचा प्रेमाने सांभाळ करा.
तुमचीच सुमन.
आजीचं हे पत्र वाचून खूप मोठं ऐवज मिळाल्याचं समाधान मिळालं.
डायरी मध्ये दुसरं पत्र मिळालं, हे अक्षर मात्र आजोबांचं होतं..
प्रिय बाळांनो,
माझ्या चावीचं गुपित शोधण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल हे मला माहीत होतं. मागच्या पानावर लिहिलेलंआजीचं पत्र तुम्ही वाचलाच असाल. ही समाधानाची चावी आयुष्यभर भरपूर पैसा कमवून दिली. आजी गेल्यानंतर या चावीने मला खूप साथ दिली ऐकटे पणाची कधीच जाणीव करून दिली नाही. माणसाजवळ पैसा, संपत्ती व आपली लोक असतील तरीही असमाधान असतं पण या चावीने मला आपल्या लोकांबरोबर प्रेमाने रहायला शिकवलं.
ही प्रेमाची व समाधानाची चावी जपून ठेवा, भावी आयुष्यात तुम्हाला याचा खूप उपयोग होईल.
तुमचेच आजोबा.
मानसोपचाराचा खूप मोठा उपाय या गूढ चावीने मिळवून दिला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment