" आरती काय चाललंय तुझं ..? फोन कडे एकटक बघणाऱ्या आरतीला आकाशने रागातच विचारले.
" कुठे काय ..काहीच नाही.."
स्वतःला सावरत आरती बोलली
" हल्ली एकटीच बसलेली असतेस, शून्यात नजर लावून.. एवढा काय विचार करतेस..? अशी एकटी बसू नको.. वेडी होशील ....कश्यातरी मन गुंतव तुझं , अभिषेक छान सेट्टेल झाला आहे तिथे . त्याच्या कामात तो बिझी आहे, वेळ मिळाला की करेल फोन.." समजवण्याचा स्वरात आकाश बोलला.
हल्ली नवऱ्याच्या बोलण्याचा आरतीला खूप राग यायचा. विचार करू नको म्हटलं तर डोक्यात विचार यायचे थांबतात का.. भुतासारखी दिवसभर घरी बसून असते. हा मुलगा फोन करत नाही , केला तर उचलत नाही. सारखी काळजी लागून राहते. दिवसभर सतत त्याचेच विचार मनात येतात. मन चींती ते वैरी न चिंती म्हणतात ते अगदी खरं आहे. मनात धडकी भरते.
कश्यात मन रमवायच ठरवलं तर या वयात करणार ती काय..कोण देईल नोकरी मला....
अभिषेक लहान असताना नोकरी करून घर सांभाळलं असतं तर अशी वेळच आली नसती असा विचार डोक्यात यायचा पण दुसऱ्याच क्षणी असं वाटायचं जे होतं ते चांगल्यासाठीच होतं..
त्यावेळी नोकरी सोडली नसती तर माझा मुलगा इतकी प्रगती करूच शकला नसता.
एक दिवस विचाराच्या तंद्रीत जाताना आरतीच्या गाडीचा धक्का एका मुलाला लागला. मुलाच्या पायाला जबर मार लागला होता,मुलाला आपल्या गाडीत बसवून दवाखान्यात घेऊन गेली. प्रार्थमिक उपचार केले व त्याच्या आई - वडिलांना फोन केला.
मुलाचे आई -बाबा धावतच आले. मुलाची आई म्हणजे आरतीची बाल मैत्रिण निघाली.
आरतीने दोघांची माफी मागितली पण उषाचे मिस्टर नाराजीने बोलली," अहो, हा मुलगा नेहमी नशेत असतो. नेहमी कोणाच्यातरी गाडीच्या खाली तो येतच असतो .... आईचे लाड बाकी काय.."
उषाने नाराजीचे आरतीला आपल्या मुलाची कहाणी सांगितली,"माझा एकुलता एक मुलगा वाइट संगतीत लागून पार वाया गेला ग.." असं म्हणत ढसाढसा रडू लागली.
"अगं रडू नकोस काहीतरी मार्ग नक्की निघेल..काळजी करू नकोस मी आहे तुझ्या सोबत." आरतीने उषाला समजावले .
दोघींनी एकमेकींचे नंबर घेतले . भेटी गाठी वाढल्या. मुलाला दोघी मिळून व्यसन मुक्ती केंद्रात घेऊन गेल्या. सतत केंद्रात गेल्यामुळे तिथल्या तरुण मुलांच्या समस्या, त्यांची होणारी मानसिक चिडचिड याचा सखोल अभ्यास केला. मानसिक शास्त्राचा आधार घेत मुलांना व्यसनातून बाहेर काढण्याची उपयुक्त पद्धत आरतीने शोधून काढली. ही पद्धत इतकी प्रभावी ठरली की, उषाचा मुलगा तर व्यसनमुक्त झाला पण त्याच्या सोबत त्याचे चार मित्र पण सुधारले.
मुळातच हुषार असलेल्या आरतीने स्वतःचं एक मोठं व्यसन मुक्ती केंद्र उभारले. वर्षभरात हजारांहून जास्त मुलं व्यसनमुक्त झाली व आनंदी जीवन जगू लागली होती.
आज जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारतर्फे तिला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता.
वर्तमानपत्रातील ही बातमी वाचून आरतीला आपल्या आयुष्यात झालेला बदल लक्षात आला.
मुलगा परदेशात गेला त्यावेळी असं वाटलं की, आपल्या आयुष्याचे अंतिम ध्येय संपले. मुलगा मोठा झाला , कमवता झाला , आपण सगळ्या जबाबदारीतून मुक्त झालो, आता फक्त त्याच्या फोनची, येण्याची वाट बघायची ...
मी माझं जीवन असच व्यतित केलं असतं तर कदाचित मी काहीच करू शकले नसते .
आजचा हा सोनेरी दिवस बघायला मिळाला त्यामागे किती घटना एकमेकांवर अवलंबून होत्या..
मुलगा परदेशात गेला म्हणून निराश होते, या निराशेतून अपघात झाला, अपघातात नेमका उषाचा व्यसनी मुलगा भेटला..त्याला मदतीचा हात देतादेता या व्यसनमुक्ती कार्यात स्वतःला झोकून घेतलं व त्याचे फळ आज डोळ्यासमोर उभे आहे. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हे काही खोटे नाही...
आरती आज इतकी खूष होती की , बाजूला फोन वाजत आहे याचेही तिला भान नव्हते.
" आई, किती वेळ लावलास फोन उचलायला..कशी आहेस..? सॉरी,माझा नंबर बदलला हे सांगायला मला वेळच मिळाला नाही. रागावली नाहीस ना.." अभिषेक दिलगीर होऊन बोलला.
" नाही रे बाळा, तुझ्यावर कश्याला रागवेन..! बरं झालं फोन केला नाही त्यानिमित्ताने तुझ्या प्रेमातून मी बाहेर आले. तुझ्या विरहामुळे वाट चुकलेल्या हजारो मुलांची आई होण्याचे भाग्य मला लाभले." आरतीने तिला मिळणार असणाऱ्या पुरस्काराची बातमी मुलाला सांगितली.
मुलगा खूप खुश झाला व बोलला ," आई , बाबा म्हणतात ना "जे होतं ते चांगल्यासाठीच होतं " ते अगदी खरं आहे बघ.."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment