या कथेचा पहिला भाग नक्की वाचा..
" अगं आजी पण ही वही तर भरलेली आहे , तुझ्या अपघातानंतर तू घरीच बसलीस ना....?मग या वहीचा तुला काहीच उपयोग झाला नसेल..." नकारात्मक मान डोलवत नाराजीने सौरभ बोलला.
" या वही ने माझी खरी साथ दिली ती माझ्या पडत्या काळात, सुरुवातीला या वहिने मला छोटी छोटी आव्हाने दिली. पायांनी नाही पण मनाने या वहिने मला उभे केले. एखादं मोठं आव्हानं लिहायचं व त्या अनुषंगाने छोटी आव्हाने लिहायचे,पूर्ण झाली टिक मार्क करायचे.
या काळात मला लिखानाची आवड निर्माण झाली. आपली एखादी कथा वर्तमानपत्रात प्रकाशित व्हावी अशी इच्छा या वहीत लिहून काढली. माझ्या दहा कथा परत आल्या पण अकरावी कथा प्रकाशित झाली. या कथेला भरभरून प्रतिसाद मिळाला . याच्या पुढे जाऊन वर्तमानपत्रातील एक सदर लिहण्याची ईच्छा मनात बाळगली व ती लिहून काढली. चमत्कार झाला व मला तशी संधी मिळाली. लिहण्यात व वाचनात माझा पायाचा त्रास मी विसरून गेले.
ही माझी जादूचीच वही आहे असं वाटायला लागलं. अशक्य गोष्टी शक्य होत होत्या. मला सुरूवातीला डॉक्टरांनी सांगितलं होतं की, तुम्ही तुमच्या पायांनी कधी चालूच शकणार नाही पण मी जिद्द सोडली नाही ,माझ्या पायाने गावातल्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाण्याची इच्छा लिहून काढली. मनाने खंबीर झाले, व्यायाम केला, डॉक्टरांनी सांगितलेली सर्व पथ्य पाळली व सहा महिन्यात बाप्पाच्या दर्शनाला स्वतःच्या पायाने जाऊन आले.
मनात राहिलेल्या सुप्त इच्छा आता बाहेर पडत
होत्या. समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे हा विचार स्वस्थ बसू देत नव्हता. आपलं स्वतःचं एक संस्कार केंद्र असावं अशी इच्छा लिहून काढली. एका वर्षात ही पण इच्छा पूर्ण झाली दोन मुलांपासून चालू केलेलं हे केंद्र आज हजारो मुलांना घेऊन पुढे चाललं आहे. या वहिने मला न रडता पुढे जाण्याची शिकवण दिली. मागच्या दोन वर्षात माझ्या विस्मृती मुळे ही वही कुठे ठेवली तेच आठवत नव्हतं. तू ती वही शोधून काढली, आभारी आहे बाळा.."असं म्हणत नातवाचा हात हातात घेतला.
" आजी, पण या दोन इच्छा आहेत त्याच्या समोर ती टिक केलीच नाही. आता या दोन्हीं इच्छा मी पूर्ण करतो"
" नाही रे .. काहीतरीच काय..आता कसं शक्य आहे .. मी धड उभी राहू शकत नाही आणि स्टेज वरती नाचणार आहे का..!! " हसतच आजी बोलली.
" आजी, तू तुझ्या जेष्ठनागरिक मंडळाच्या स्नेहसंमेलनात सोलो डान्स करणार आहेस व तुझी दुसरी इच्छा म्हणजे तुझं स्वतःचं पुस्तक प्रदर्शित पण होणार आहे. त्या दोन्ही बकेट लिस्ट समोर टिक करण्यासाठी पेन तयार ठेव.." असं म्हणतं आजीचा आशिर्वाद घेउन सौरभ बाहेर पडला.
जेष्ठनागरिक मंडळाच्या स्नेहसंमेलनात आजीने हातवारे व चेहऱ्यावरचे भाव बदलत सुंदर सोलो डान्स केला. हा डान्स बघून सर्वांनी तोंडात बोट घातले.
प्रत्येकाच्या आयुष्यात बकेट लिस्ट खूप महत्त्वाची असते. इच्छा बाळगल्याशिवाय माणूस कधीच पुढे जात नाही. याच वेळोवेळी बदलणाऱ्या इच्छा वही मध्ये लिहून काढायच्या म्हणजे आपली बकेट लिस्ट तयार होते. सौरभने आजीच्या वहीचे रूपांतर एका प्रेरणादायी पुस्तकात केलं. पुस्तकाला भरघोस प्रतिसाद मिळाला व पुस्तकाला नाव दिले
"याला बकेट लिस्ट म्हणतात..."
#बकेट लिस्ट
जिद्दीची कहाणी
उत्तर द्याहटवा2 रा भाग पण मस्तच
उत्तर द्याहटवाबरेच काही शिकण्ासारखे आहे ह्या कथेतून
खूप छान अप्रतिम.
उत्तर द्याहटवाKhupch chan
उत्तर द्याहटवा