सुयश आपल्या आजारी असलेल्या ताईला भेटायला तिच्या घरी गेला होता. भाऊजी हॉल मध्ये बसून टीव्ही बघत होते व ताई स्वयंपाक घरात काहीतरी करत होती. सुयश घरी जाताच भाऊजी ताडकन उठून बसले. ताईला आवाज देताच ताई बाहेर आली. " ताई, तू किती बारीक झाली आहेस .आराम करायचा ना..कश्याला कामं करतेस " ताई जवळ जात सुयश बोलला.
सुयशचं बोलणं ऐकून भाऊजी बोलले, " अरे, मी पण तिला तेच सांगतो,पण ऐकली तर शप्पथ."
भाऊजीच्या बोलण्यावर ताईने उपहासात्मक मान डोलावली. याचा अर्थ दोघांनाही कळला..
तुम्ही दोघं गप्पा मारत बसा मी तुमच्या साठी काहीतरी छान खायला बनवतो असं म्हणत भाऊजी कानाला हात लावतच स्वयंपाक घरात गेले. ताई हळूच कानात बोलली," घाबरले बघ तुला.."
ताईच बोलणं ऐकून सुयशला 15 वर्षा पूर्वीची आठवण जागी झाली ..
पंधरा वर्षांचा सुयश स्वतंत्र पणे विचार करायला लागला होता. रूढी परंपरा याच्या विरोधात होता . घरात ताईच लग्न ठरलं. लग्नाची तयारी चालू झाली. आई - बाबानी खर्चाचं गणित कागदावर मांडलं. साधारण पाच लाखाच्या घरात लग्नं चाललं होतं. खर्चाचा आकडा बघून सुयश बोलला ," आई - बाबा , मी मध्येच बोलणं योग्य नाही पण मला एक सुचवायचं आहे.. आपण ताईच लग्नं विधीवत न करता रजिस्टर करू व हाच पैसा आपण ताईच्या नावावर बँकेत ठेवू."
सुयशचं बोलणं ऐकून बाबा हसायला लागले, अरे बाळा अजून तू लहान आहेस , जिथे पैसा खर्च करावा लागतो तिथे करायचा. लग्न हा एक संस्कार आहे. आपल्या लग्नातल्या प्रत्येक विधीला विशिष्ट महत्त्व आहे. "
बाबांचं म्हणणं सुयशला पटलं नाही. बाबासमोर वाद घालण्याची हिम्मत त्याच्यात नव्हती.
घरात चालली लग्नाची खरेदी,प्रत्येक विधीसाठी लागणारं सामान आई व्यवस्थित बांधून ठेवत होती. या सर्व गोष्टी सुयशला पटतच नव्हत्या, पण काय करणार बिचारा नाईलाजाने मदत करत होता.
लग्नाचा दिवस उजाडला सकाळपासूनच विधी चालू झाल्या. आई बाबा विधी मध्ये गुंतले होते त्यामुळे हाच पाहुण्यांची सरबराई करत होता.
गुरुजींनी आवाज दिला" मुलीच्या भावाला बोलवा, कान पिळायचा आहे."
सुयश ताई जवळ स्टेज वर येऊन थांबला. गुरुजींनी सांगितलं, " भाऊजी जवळ ये उजव्या हातानी त्यांचा कानपिळ व त्यांना सांग माझ्या बहिणीची प्रेमानी काळजी घ्या नाहीतर गाठ माझ्याशी आहे."
सर्वजण हसायला लागले पण सुयशला हा पोरकटपणा वाटला. मनाशीच बोलला, ' असा कसा विधी आहे, मी त्यांचा कान पिळणार,ते मला घाबरणार व ताईला त्रास देणार नाही. आयुष्यभर ही कान पिळणी त्यांच्या लक्षात तरी राहील का..' मनाशीच हसला.
आज पंधरा वर्षानंतर त्याच्या त्या मिश्किल हसण्याची व कानपिळणीची आठवण आली. खरचं बाबा म्हणत होते ते बरोबर आहे, लग्न हा एक संस्कार आहे. हा संस्कार उभयतांना आयुष्यभर कामाला येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment