माझी आवडती अभिनेत्री किंवा अभिनेता असा विषय शाळेत असताना दिला होता त्यावेळी पण असाच प्रश्न पडला होता,माझा आवडता हिरो कोण..? पण खास एक चेहरा डोळ्यासमोर येत नव्हता व आजही येत नाही.
लहानपणी रविवारी लागणारे मराठी चित्रपट आम्ही बघत असू,हिंदी बद्दल एवढी जवळीक नव्हती. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे खूप आवडायचे त्यांचे विनोद, मारामारी हे आठवडा भर पुरवून पुरवून चर्चिला जायचा विषय असायचा.
काही चित्रपटामध्ये अशोक सराफने खलनायकाची भूमिका केली तेंव्हा पासून मात्र हा अभिनेता मनातून उतरला...!!!
वाइट वळणाला लागला म्हणून खूप राग आला होता.
हा अभिनय असतो ही समज त्यावेळी नव्हती.
थोडी मोठी झाल्यानंतर हिंदी चित्रपट बघण्याची आवड निर्माण झाली पण शनिवारी रात्री लागणारा चित्रपट उशिरा संपायचा त्यामुळे शेवट कधी पाहिल्याचे आठवत नाही. चांदणी चित्रपटातील ऋषी कपूर खूप आवडायचा . मैत्रिणींच्या गप्पा चालू असताना माझा आवडता हिरो ऋषी कपूर असं सांगताच सगळ्या हसायला लागल्या..त्या दिवशी ठरवलं आता आपला आवडता हिरो बदलला पाहिजे...!
सिनेमागृहामध्ये दिलजले हा चित्रपट पाहिला मग अजय देवगण आवडायला लागला.
चित्रपटात हिरो , हीरोइन फक्त अभिनय करतात त्यांचं वैयक्तिक आयुष्य खूप वेगळं असतं ही समज येत होती.
अमिताभ बच्चन, अजय देवगण खास आवडायला लागले कारण यांनी एकच लग्न केले आहे. बऱ्याच अभिनेत्याबद्दल वाचून अभिमानाने मान उंचावली तर काही अभिनेते कायमच मनातून उतरले.
दोन अभिनेते कायमच त्यांच्या कामामुळे मनात घर करून आहेत ते म्हणजे अमीर खान व अक्षय कुमार.
अमीर खानचे तारे जमी पर व थ्री इडियट हे चित्रपट मनात घर करून बसले आहेत. समाजाला दिशा देण्याचे महत्त्वाचे काम या चित्रपटातून केले आहे शिवाय पाणी फाउंडेशन मध्ये केलेली कामगिरी पाहून माझ्या मनात मानाचे स्थान पटकावले आहे.
अक्षय कुमारची या क्षेत्रातली सुरूवात खूप प्रेरणादायी वाटते. समाजासाठी त्यांनी हाती घेतलेले कार्य पाहून आपल्या भारतीय कलाकाराबद्दल विशेष अभिमान वाटतो.
आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचे फोटो कधी पुस्तकात ठेवले नाही पण आवडणाऱ्या त्यांच्या प्रेरणादायी गोष्टी मनात साठवून लहानाची मोठी झाली.
समाजाचे प्रेरणास्थान असणारे ,आजही सामाजासाठी प्रबोधनाचे कार्य करणारे चंदेरी दुनियेतील कलाकार माझे फेवरेट आहेत
#माझी आवडती अभिनेत्री किंवा अभिनेता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment