" ताई ,थकले बाई तुझे फोन घेऊन...सकाळपासून हा पंधरावा फोन होता. सगळ्यांचा एकच प्रश्न ," ताई कश्या आहेत ?आम्ही कधी येवू भेटायला..?," सगळ्यांना उत्तरं देऊन थकली बाई मी. आम्ही आजारी असतो तर आम्हाला साधं कुत्रही विचारत नाही. काय जादू केली आहे सर्वांवर...मला तरी कळू दे.."
" अगं जादू - फिदू काही नाही. मनानी जुळलेली माणसं आहेत ही. कुठलीही अपेक्षा न करता या सर्वांवर मनापासून प्रेम केले आहे याचे हे परिणाम."
ताई बोलत होती ते अगदी बरोबर होते. माणसांना जोडण्यासाठी पैशाचा वापर आपण कधीच करू शकत नाही. याची खरी प्रचिती आली ती करोना काळात.
घरातली लोकं जिथे वाळीत टाकली जात होती तिथे ताईने प्रेमाचा हात दिला. मनापासून सर्वांची मदत केली. जिथे कमी तिथे आम्ही असा विचार करून स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मनापासून सेवा केली होती.
पैशा शिवाय दुनिया चालत नाही, दाम करी काम हे सगळे वचन ताईच्या प्रेमळ व समजूतदार स्वभावासमोर फिके पडतात.
ताईने कधीच कोणाला पैशाची मदत केली नाही.
सर्वांच्या वेळेला धावून गेली, आपुलकीने विचारपूस केली ज्या गोष्टी पैशाने विकत घेता येत नाही त्या सर्व गोष्टी ताईने प्रेमाचा हात हातात घेऊन दिल्या.
काल ताईला रस्त्यात अचानक चक्कर आली. आजूबाजूच्या लोकांना ताईला हॉस्पिटल मध्ये दाखल केले. दवाखान्यात ओळख दाखवायला लोकं घाबरतात तिथे या लोकांनी दवाखान्याचे डीपॉझिठ भरून टाकले. ताईची तब्येत स्थिर झाल्यावर घरातल्या लोकांना फोन करून कळवले होते.
" ताई आज मला कळलं माणसं जोडण्यासाठी तोंडात साखर व खिशात पैसे असून चालत नाही. समोरच्या व्यक्तीच्या मनात जागा निर्माण करायची असेल तर मनाने मनाला जोडण्यासाठी एक प्रेमाचा धागा जोडावा लागतो. हा धागा दोघांचे मन जाणून घेत असतो.
तू सर्वांचे मन प्रेमाने जिंकली म्हणून ही सर्व लोकं आज तुझी प्रेमाने चौकशी करत आहेत. आपण म्हणतो चांगली माणसं नशिबाने मिळतात पण आज तुझ्याकडे बघून मला असे वाटते की, नशिबाने प्रेमाची माणसं मिळत नाहीत . प्रेम मिळवण्यासाठी अगोदर जिव्हाळा निर्माण करावा लागतो.प्रेमानेच प्रेमाला जिंकता येते.
प्रेम द्यावे , प्रेम घ्यावे प्रेमाचा करावा भरपूर साठा..आपल्या आयुष्यात येतील आनंदाच्या लाटा.."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment