" काम करून - करून हाडं झिजली माझी, कोणाला काही किंमत नाही, एकदा अंथरुणाला खिळली ना, मग जाग येईल माझ्या घरच्या लोकांना.." रागा रागात सुनिता बोलत होती..
बाजूलाच बसलेल्या आजीने शांतपणे ऐकून घेतले .
रोजची कामे व्यवस्थित,नीट नेटकी व वेळेत पार पाडायची हा सुनिताचा अट्टाहास असायचा . चाळिशी पर्यंत सगळं जमून गेलं पण आता चाळिशी उलटल्या नंतर मात्र शरीर साथ देत नव्हते. सततची चीड -चीड चालू असायची.
"या कामाच्या व्यापात मलाच काही तरी होईल , मी अंथरुणाला खिळून राहील"
असच सारखं बोलायची.
संध्याकाळी सगळी कामे आटोपल्यावर आजी नातीच्या पाठीवरून हात फिरवत बोलली," खूप थकते ग माझी राणी..."
" आजी ,माझाच संसार आहे , मला केलंच पाहिजे ना..!"
सुनिता बोलली.
" आता कसं शहाण्यासारखं बोलली. ही कामं तुझीच आहेत , तुलाच करायची आहेत मग एवढी चिडचिड कश्याला..
मी आज तुला एक जादू शिकवणार आहे . जादूच नाव आहे " स्वयंसूचना"
स्वतः स्वतःला सुचना देणं,
प्रचंड शक्तिशाली असलेल्या अंतर्मनावर आपण निश्चित केलेलं ध्येय कोरणं!
भलीही ती रोजची कामे असू देत.
येत्या पाच वर्षात, येत्या एक वर्षात, पुढच्या एका महिन्यात, पुढच्या एका आठवड्यात, आणि आज दिवस भर मी काय काय करणार आहे, याचं मनातल्या मनात पुन्हा पुन्हा रिव्हीजन करणे म्हणजे स्वयंसूचना!
स्वयंसुचनांमुळे कल्पना खोल अंतर्मनात झिरपतात, आणि नाटकीयरित्या सत्यातही उतरतात
अंतर्मनाची शक्ती प्रचंड असल्यामुळे तिथे रुजलेला प्रत्येक विचार मग तो चांगला असो की वाईट, खराच होतो.
आपले पूर्वज म्हणायचे, शुभ बोल नाऱ्या!..किंवा जिभेवर सरस्वती असते, आपण बोलु तसेच घडते, जिभेवरचे देवता तथास्तु म्हणते, वगैरे वगैरे
या सगळ्या अंधश्रद्धा नव्हत्या, ह्यामागे मनोविज्ञान आहे.
एखादी गोष्ट हजारो वेळा बोलली तर ती अंतर्मनात प्रक्षेपित होते, मग अशुभ कशाला बोलायचे?
"या कामाच्या व्यापात मलाच काही तरी होईल , मी अंथरुणाला खिळून राहील"
असं वाईट बोलुन विनाशाला आमंत्रण देण्यापेक्षा, स्वयंसूचना देऊन मनाला प्रसन्न कर.
" हल्ली मला कुठे काय ठेवलं ते आठवतच नाही, दिवसेंदिवस विसरभोळी होत चालली आहे मी"
असे बऱ्याच जनी बोलतात त्यामुळे हे शब्द मनावर कोरले जातात व विसराळूपणा वाढत जातो.
कधीही आपल्या तोंडातून वाइट शब्द काढू नको.
स्वयंसूचना देत जा व वेळेत कामं पूर्ण कर.. शुभ बोल ग नारी .."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment