तुम्ही खूप शूर, वीर, धाडसी कथा वाचल्या असतील . मी आज जी कथा सांगणार आहे ती सत्य कथा आहे . एकाच वेळी आलेल्या कठीण प्रसंगाला धीराने मार्ग काढनाऱ्या माझ्या मैत्रिणीची कथा . ती आज सर्वांसमोर प्रेरणा म्हणून उभी आहे .
लॉक डाऊनचा काळ होता. सर्वजण घरी बसून सुट्टीचा आनंद उपभोगत होते पण अचानक कोरोनाचा विषाणू माझ्या मैत्रिणी सोबत पाहुणा म्हणून आला . एक - दोन दिवसातच लक्षणं दिसायला लागली . सर्दी-खोकला ,श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून कोरोनाची चाचणी केली . लक्षण दिसताच तिने स्वतःला बंदिस्त करून घेतलं व मुलींची रवानगी माहेरी केली . लक्षणांप्रमाणे तिचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले . आपली मुलगी कोविड पॉजिटीव्ह आहे हे कळताच तिच्या बाबांना धक्का बसला व त्यांचे डोळे बंद झाले ... बोलता येत होतं, शुद्धीत होते पण डोळेच उघडेनात ...माहेरी आई व बाबा दोघेच राहतात . बाबांच्या अश्या अवस्थेत त्याना दवाखान्यात दाखल करणे गरजेचे होते . ती स्वतः पॉजिटीव्ह त्यामुळे बाबाकडे जाऊ शकत नव्हती पण फोन करून तिने सर्व जुळवाजुळव करून घेतली व बाबांना दवाखान्यात दाखल करून घेतलं . इकडे तिच्या सासरी तिच्या सासूबाई व सासऱ्याना ताप भरला . मिस्टरांना पण कणकण वाटतच होती म्हणून सर्वांची टेस्ट करून घेतली तर सर्वांचेच रिपोर्ट पॉजिटीव्ह आले. इकडे बाबांचे MRI चे रिपोर्ट आले , त्यांच्या मेंदू मध्ये रक्त स्त्राव झाला होता त्यामुळे त्यांचे डोळे बंद झाले आहेत असं कळलं. ऑपेरेशन ची काही गरज नाही पण डोळे उघडायला पाच - सहा महिने तरी जातील असे डॉक्टरनी सांगितलं . घरात सर्वांचेच रिपोर्ट पॉजिटीव्ह , बाबांची अशी अवस्था व तिला स्वतःला खूप अशक्तपणा होता तरी घरातलं वातावरण आनंदी ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होती.
बाबाना घरी आणलं तशी आईला कणकण वाटत होती म्हणून तिची व बाबांची टेस्ट करून घेतली तशी आईचे रिपोर्ट पॉजिटीव्ह आले व बाबांचे निगेटिव्ह ... !!
सर्वजण सासरी उपचार घेत होते पण सासऱ्याना व यजमानांना श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केले . या दरम्यान तिने स्वतःची काळजी घेत पूर्ण कुटुंबाला भक्कम आधार दिला . दुसऱ्याच दिवशी आईला श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून त्यांना पण तिकडेच ऍडमिट केले . बाबांच्या अशा अवस्थेत चोवीस तास त्यांची काळजी घेण्यासाठी कुणीतरी हवं होतं, पण अश्या अवस्थेत कुणीच तयार होत नव्हतं .
स्वामींची कृपेने एका ब्युरो मधून दोन शिफ्ट मध्ये काम करायला माणसे मिळाली .दोन - तीन दिवसात तिघांना डिस्चार्ज मिळाला . घरी आले म्हणून सर्वजण खुश होते रात्री अचानक यजमानांना श्वास घ्यायला त्रास होतं होता म्हणून परत ऍडमिट करणं गरजेचं होतं, आता ती स्वतः त्यांच्या सोबत जाऊन त्यांना ऍडमिट केलं. हॉस्पिटलच्या डीन सोबत बोलून चांगली ट्रीटमेंट देण्याची विनंती केली . घरी आली तरी तिचं पूर्ण लक्ष हॉस्पिटल मधेच होतं , दुसऱ्या दिवशी जाऊन ती यजमानांना भेटली त्यांची काळजी घेण्याची विनंती डीन पासून ते वार्डबॉय पर्यंत सर्वांना केली . ही सर्व जुळवाजुळव करून घरी पोहचताच सासऱ्यांची तब्येत बिघडली . सासऱ्याना घेऊन ती परत दवाखान्यात
गेली त्यांना ऍडमिट केलं . दोघांवरती योग्य उपचार झाले व ते सुखरूप घरी परतले .
या पंधरा दिवसात सगळी संकटं एकाच वेळी आ वासून उभी होती पण ती प्रत्येक संकटाला न घाबरता धीराने सामोरी गेली . स्वतःला खूप शारीरिक थकवा जाणवत असताना कुटुंबाला तिने दिलेला आधार लाख मोलाचा होता . कुटुंबावर कसलंही संकट आलं तर एक स्त्री भरभक्कम आधार देऊ शकते याचा आदर्श माझ्या या मैत्रिणीने घालून दिला आहे . सलाम तिच्या या शौर्याला ..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment