" जे व्हायला नको होतं तेच झालं... मुलांना संसार म्हणजे भातुकलीचा खेळ वाटतो,मनात आला म्हणून मोडून टाकला. आपण किती भांडणं करायचो पण असा विचार कधी मनात आला नाही.." सुरेशराव डोक्याला हात लावून मीनाताईशी बोलत होते." मला वाटतं या सगळ्याला मीच जबाबदार आहे."
मान खाली घालून मीनाताई बोलल्या.
" अगं तू कशी जबाबदार असशील..? निखिलने त्याच्या आवडीच्या मुलीशी लग्न केले,लग्न झाल्यावर आपला त्रास नको म्हणून आपण त्यांचा वेगळा संसार मांडुन दिला . आपला व त्यांच्या संसाराचा प्रत्येक्षात कधी संबंध आला नाही. निकिताला कधी सासुरवास केला नाही . त्यांचा संसार मोडायला ते दोघेच जबाबदार आहेत."
रागारागात सुरेशराव बोलत होते.
" अहो, निकिता खूप चांगली मुलगी आहे. खूप समजूतदार आहे. आई बाबांची एकुलती एक मुलगी आहे पण कुठे कसं वागावं याचं भान तिला आहे. स्वावलंबी आहे. नोकरी करून घर पण छान सांभाळते,चूक आपल्याच मुलाची म्हणजे माझीच आहे." मीनाताई निकिताची बाजू घेऊन बोलत होत्या.
" आपला निखिल पण एकुलता एक आहे. मनमिळावू आहे,प्रेमळ आहे, कसलंच व्यसन नाही मग त्याची चूक कशी..?"सुरेशराव जणू जाबच विचारत होते.
" चूक एकट्या निखीलची नाही,चूक माझी आहे.
माझ्या मुलाला घरचीकामे तर नाहीच पण स्वतःची कामं स्वतः करावी असे संस्कार मी दिले नाही.
लहान असताना लहान आहे म्हणून तर शाळेत जाताना अभ्यास म्हणून प्रत्येक वस्तू त्याच्या हातात देत आले. आपल्याला एकच मुलगा म्हणून आपण कधी फालतू लाड केले नाही पण स्वतःची कामं स्वतः करावी अशी शिस्त लावली नाही. मागच्या आठवड्यात मी दोन दिवस तिकडे रहायला गेले त्याच वेळी मला लक्षात आले होते की यांची काहीतरी कुरबुर चालू आहे. मी दोघांचे बारीक निरीक्षण केले त्यावेळी मला जाणवले की, निखिलला निकिताने त्याचे काम केले नाही तर स्वतःचा कमीपणा वाटतो. साधी घरची बेल वाजली तर उघडायला पण तो उठत नाही.
निकिता मला सहज बोलून गेली की, तुम्ही तुमच्या मुलाला काहीच कसं शिकवलं नाही . त्याला साधा कुकर पण लावता येत नाही . मशीन लावायला सांगितली तर पाणी कसं चालू करायचं हे पण माहीत नाही . त्याला खूप कमीपणा वाटतो ही कामं करायला. आमच्या दोघांचं घर आहे तर काम मिळून करायला हवी ना. काही बोललं की राग येतो याला"
" अगं पण तूही नोकरी सांभाळून ही सगळी कामं करायची ना.."
" माझी गोष्ट वेगळी होती. मी बहिण भावंडात वाढलेली होती. हल्ली एकच मुलं असतं , भरभरून प्रेम देतो, शिक्षण देतो, पण हे सगळं देताना मी मात्र प्रत्येक गोष्ट हातात देऊन त्याचा आयतोबा करून ठेवला आहे. "
" बरोबर आहे तुझं आपण या गोष्टी क्षुल्लक मानतो पण त्या या थराला जातील याची आपल्याला काहीच कल्पना नव्हती."
कबुलीच्या स्वरात सुरेशराव बोलले
" मुलांना भविष्यात काही कमी पडू नये म्हणून पैसा, मालमत्ता जमवतो पण त्यांचा संसार टिकला नाही तर या गोष्टी काहीच कामाच्या नाहीत. वेळ आली तर स्वतः पुरतं तरी कामं करायला आलीच पाहिजे नाहीतर सूनबाई बोलते," तुमच्या मुलाला तुम्ही काहीच शिकवलं नाही का?"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment