आज सोमवार म्हणून सकाळीच लवकर शंकराच्या मंदिरात गेले. खूप छान प्रसन्न वातावरण होतं. ओम नमः शिवाय चा जप चालू होता, भक्तजण भक्तीने पिंडाची पूजा करत होते.दुधाचा अभिषेक चालू होता. पांढर फुलं व बेल वाहून शंकराची पूजा केली व मंदिराच्या बाहेर आले. मंदिरातून बाहेर येण्याची अजिबात ईच्छा नव्हती पण घरची सगळी कामं वाट पाहत होती त्यामुळे निघावं लागलं.
घरातलं दूध संपलं होतं म्हणून जाताना दुधाची पिशवी घेण्यासाठी दुकानात गेले एवढ्यात एक सात -आठ वर्षाचा मुलगा धावत -धावत आला व माझ्या पुढे येऊन उभा राहिला," दूध दया" असं म्हणतं पैसे पुढे केले. दुकानदाराने काहीही न विचारता त्याला एक दुधाची छोटी पिशवी दिली.दुधाची एवढी लहान पिशवीपण मिळते याचं मला आश्चर्य वाटलं. त्या मुलाने हातात पिशवी घेतली व आनंदाने पिशवी कढे बघत खिशात हात टाकला. हा एवढा का खुश झाला ही बघण्याची माझी उत्सुकता वाढली म्हणून माझी दूधाची पिशवी घेऊन मी त्याच्याकडे बघत होते. तो इतका खुश होता की, मी त्याच्याकडे पाहतेय याचही त्याला देणं घेणं नव्हतं.
मला वाटलं हा खिशातून पिशवी काढत असेल पण याने तर एक सेफ्टी पिन काढली व पिशवीला टोचली. पिशवी लिक झाली एवढ्यात त्याने ती बाजू तोंडाला लावली व पिशवी दाबून दूध गटागट प्यायला लागला. एवढ्यात दुकानदार ओरडला," ये पोरा , दूध घरी घेऊन जा नाहीतर तुझ्या घरचे माझ्या नावानी ओरडतात फुटलेली पिशवी दिली..जा पळ.."
त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून दूध पिण्यात गुंग असणारा पोरगा भानावर आला व पळून गेला. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिली. खूप वाइट वाटलं ..
घरी आले , घरी सगळा पसारा तसाच पडला होता. मुलाला दूध प्यायला दिलेला ग्लास तिथेच टेबलावर पडला होता, ग्लासांत तळाशी दूध तसच होतं. ही त्याची नेहमीचच सवय..
मुलाने दूध प्यावे म्हणून वेगवेगळ्या प्रकारे त्याला रोज दूध देते कधी होर्लिक, बोर्नवीटा, वेलची युक्त पण आमचे साहेबजादे कधीच पुर्ण दूध पित नाहीत. रोज त्या राहिलेल्या दुधाची मला किंमत वाटली नाही पण आज त्या मुलाकडे बघून मला खरी दुधाची किंमत कळली.
आज दिवसभरात शंकराच्या पिंडीवर अभिषेक केलेलं दूध, माझ्या मुलाने ग्लासांत ठेवलेलं दूध व छोट्याशा दुधाच्या पिशवीला छिद्र पाडून प्यायलेल दूध या तिन्ही दुधाने मला संभ्रमात टाकलं.
खरी दुधाला किंमत कुठे मिळाली..
शंकराच्या पिंडीवर अभिषेक रुपात..?
चवदार केलेल्या दुधाच्या ग्लासात..?
की..
मनसोक्त दोन घोट आनंदाने थंडगार, कच्च पण चोरून प्यायलेल्या दूधात...?
#आजचाविषय - एक ग्लास दुधाचा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment