सुधाला मोत्याच्या दागिन्यांची भारी हौस, कोणाच्या गळ्यात मोत्याची माळ दिसली की, तशीच माळ तिच्याकडे आलीच म्हणून समजा...!
तिच्या या वेडाला नवरा त्रासून गेला होता. एके दिवशी सुधाने मोत्याचे दागिने स्वस्तात विकणारा व्यापारी शोधून काढला व पहिल्याच वेळी त्याच्याकडून पंधरा हजाराचे दागिने विकत घेतले.
वीस हजाराचे दागिने पंधरा हजारात दिले असे अभिमानाने सांगताच नवरोबाने मोत्याबद्दल शंका व्यक्त केली.." नक्की खरेच मोती आहेत ना.."
संशयाचं भूत सुधाला काही गप्प बसू देत नव्हतं . दुसऱ्याचं दिवशी सुधा आपल्या नेहमीच्या सोनारकडे गेली व त्याला मोत्याबद्दल विचारताच त्याने सांगितले हे तर साफ खोटे मोती आहेत, तुम्हाला त्यांनी फसवले आहे . हे ऐकताच सुधाच्या पायाखालची जमीन सरकली.
एवढ्या वर्षापासून मी मोती घेते पण कधीचं फसली नाही आत्ताच कशी फसली याचं तिला आश्चर्य वाटलं . काहीही करून त्या व्यापाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे असं मनाशी ठरवून एक प्लॅन तयार केला.
व्यापाऱ्याने दिलेलं कार्ड काढलं व फोन करून त्याला बोलावून घेतलं व सांगितलं मला अजून काही दागिने घ्यायचे आहेत तुम्ही आजच माझ्या घरी या.
ठरल्या प्रमाणे व्यापारी घरी आला. सुधा घरी एकटीच होती . हॉल मध्ये खूप पसारा आहे आपण आत मध्ये बसू म्हणजे सगळे दागिने व्यवस्थित बघता येतील असं सांगून त्याला आतल्या खोलीत घेऊन गेली. पाणी घेऊन येते असं सांगून बाहेर आली व खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केला.
सुधाची पहिली मोहीम फत्ते झाली. ग्राहक मंचात व पोलिसांना फोन लावला व सांगितलं एक भामटा व्यापारी मी घरात बंद करून ठेवला आहे त्याला ताबडतोब घेऊन जा. सुधाला स्वतःचाच खूप अभिमान वाटला, मला फसवतो काय..बस आता खडी फोडत असं बोलत बाहेरचा दरवाजा उघडला. दारात पोलीस व ग्राहक मंचाचे अधिकारी उभे होते. सुधाने रीतसर सर्व घटना सांगितल्या व व्यापाऱ्याला बंद केलेली खोली उघडली.
बंद खोलीतून सुप्रसिद्ध मोत्यांचे व्यापारी बाहेर आले. सुधाने तब्बल दोन तास त्यांना खोलीत बंद केले होते. व्यापाऱ्याने आपली बाजू मांडली व आपले मोती कसे खरे आहेत त्याची खात्री करून दिली. मोती खरे असल्याची शहानिशा झाली . संतापलेल्या व्यापाऱ्याने सुधा विरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा लावला . सुधा आता पुरती रडकुंडीला आली होती एवढ्यात नवरोबा ऑफिस मधून आले , झालेला प्रकार कथन करताच त्यांनी डोक्याला हात लावला,व मनाशीच बोलले ," करायला गेलो काय आणि झालं भलतंच."
बायकोच्या मोत्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर आळा बसावा व आपला खर्च कमी व्हावा म्हणून स्वतःच जावून नेहमीच्या सोनाराचे कान भरले होते,
पण आपली बायको असे काही करेल याची तिळमात्र शंका नसलेला नवरा तोंड दाबून बुक्क्यांचा मार खात अब्रू नुकसानीची किंमत चुकवत बसला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment