" किती मेकअप करशील चल लवकर , उशीर होतोय.." सुधा आपल्या मैत्रिणीला मधुराला चिडून बोलली.
" तुला काय देवाने मेकअप करूनच पाठवलं आहे. तुला तयार होण्याची गरजच नाही. मला तुझ्या सोबत यायचं तर नीट तयार झालंच पाहिजे. माझ्या मैत्रिणीला शोभली पाहिजे ना.." मधुरा हसत हसत बोलून गेली.
" झालं तुझं चालू...अगं जशी आहेस तशी खूप छान आहेस तू आणि मला तशीच आवडतेस. चल लवकर .." सुधाने हात पकडून ओढतच मधुराला खोलीच्या बाहेर काढलं.
मधुराला नेहमी स्वतःचा खूप राग यायचा, मीच अशी कशी..ना रंग ना रूप, माझ्या सगळ्या बहिणी, मैत्रिणी दिसायला सुंदर जणू अप्सराच...! मलाच देवाने असे कसे बनवले..? नक्कीच मागच्या जन्मी मी रूपाचा गर्व केला असेल म्हणून देवाने मला शिक्षा दिली असेल असा अंदाज बांधून मनाला मुरड घालत असे.
आज दोघी मैत्रीणी कॉलेजच्या कॉन्फरन्ससाठी विद्यापीठात निघाल्या होत्या.
मधुरा नेहमी स्वतःची तुलना इतरांशी करत असे.
लोकलमध्ये बसल्यावर नेहमी प्रमाणे तिच्या डोक्यात निरीक्षण चालू झाले, बाजूला बसलेली मुलगी किती सुंदर आहे गोरा रंग,टपोरे डोळे, गोबरे गाल पण नाकाने घान केली.नाक थोडं सरळ असतं तर किती सुंदर दिसली असती . जगातल्या सगळ्या स्त्रिया किती सुंदर आहेत , एखादी दुसरी कमी असेल पण माझ्यापेक्षा नक्कीच सुंदर आहेत.
विचारांचं काहूर चालू होतं एवढ्यात सुधाने पाठीवर थाप मारली," चल लवकर स्टेशन आलं"
दोघींनी धावत धावत बस पकडली व विद्यापीठ गाठलं.
समोर बोर्डावर विषय लिहला होता," जगण्याचा नवीन मार्ग"
कार्यक्रमाला सुरुवात झाली पण नेमका नवीन मार्ग कोणता हे लक्षात येतं नव्हते. विविध महिला समोर येत होत्या त्यांच्या कार्याबद्दल, व्यवसायाबद्दल माहिती देत होत्या. नेहमी प्रमाणे मधुराचं त्या स्त्रियांचं सौंदर्य मापण्याचं गणित डोक्यात चालू होते.त्या काय बोलत आहेत त्या कडे विशेष लक्ष नव्हतंच.
हा काय कंटाळवाणा विषय आहे, उगीचच धावत पळत आलो असे दोघींना वाटतं होते. मध्यंतरानंतर त्यांची खरी ओळख अध्यक्षांनी करून दिली. या सर्व महिला शारीरिक व्याधींनी ग्रस्त होत्या, कॅन्सर, टिबी ,मोठ्या शस्त्रक्रिया करून कृत्रिम हात -पाय असलेल्या. कानात ऐकण्याचं मशीन लावलेल्या.
या सर्वांचे आजार ऐकून व त्या सध्या करत असलेल्या कार्याबद्दल ऐकून खूप कौतुक वाटलं सर्वांना.
मधुरा आज खरी आत मधून व बाहेरून ढवळून निघाली. आपण आपलच दुःख कवटाळून बसलो होतो, देवांनी सौंदर्य दिलं नाही पण सुदृढ शरीर दिलं आहे याकडे तर आपलं लक्षच नाही.
या जगात लोकांकडे खूप दुःख आहे, आपण तर फक्त आपलंच दुःख कवटाळून बसलो होतो असा प्रकाश मधुराच्या डोक्यात पडला व जगण्याचा नवीन मार्ग गवसला.
खूप छान.
उत्तर द्याहटवा