"तुम्ही काळजी करू नका... "
हे चार शब्द केवढा आनंद देऊन जातात ना, असं वाटतं कोणीतरी आपल्या मनावराती असलेलं ओझं अलगद उचलून घेतलं आहे.
आपल्या लहान पिल्लाला पाळणाघरात प्रथमच सोडताना, शाळेतला पहिला दिवस, पहिल्यांदा एकट्याने प्रवास करताना अशा कितीतरी प्रसंगी हे शब्द आधार बनतात.
या शब्दाचा खूप मोठा आधार झाला तो करोना काळात.
घरात आजोबांना करोना झाला , त्यांना विभक्त ठेवण्याची वेळ आली त्यावेळी मन दुःखाने दाटून आलं होतं. दिवसेंदिवस त्यांची खालावत चाललेली तब्येत बघून दवाखान्यात दाखल करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. प्रचंड खोकला, अंगात ताप,उठून उभा राहण्याची ताकद त्यांच्यात नव्हती अशा वेळी त्यांची काळजी कोण घेईल..? खोकल्याची ढास लागली तर त्यांचा पाठीवरून हात कोण फिरवेल...??
घशाला कोरड पडली तर गरम गरम सूप कोण देईल..??त्यांना काय हवं ,काय नको कोण पाहिलं..?? असे नानाविविध प्रश्न मनाला पोखरून खात होते. परिस्थिती अशी होती की आपली ईच्छा असताना, आपली धोका पत्करण्याची तयारी असतानाही आपण त्यांच्या जवळ राहू शकत नव्हतो.
अशा प्रसंगात डॉक्टर, नर्स व तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी खूप मोठा आधार दिला.घरातल्या व्यक्ती प्रमाणे त्यांची काळजी घेतली. श्रीमंत गरीब , उच्च नीच असा कुठलाच भेद न करता त्यांची उत्तम रित्या सुश्रुषा केली.
या काळात असे जेष्ठ नागरिक होते की, ज्यांना मोबाईल वापरता येत नव्हता. दवाखान्यातील कर्मचाऱ्यांनी नातेवाईकांचे नंबर शोधून घरातील लोकांशी संवाद साधून दिला.
आजोबा ज्यावेळी विलागिकरण कक्षात होते, त्यांच्याशी बोलून आठ दिवस होऊन गेले होते. दवाखान्यात रोज एक फोन असायचा . त्यांच्याकडून ते आता बरे आहेत असाच संदेश मिळायचा पण प्रत्येक्षात आजोबांशी बोलणं व्हायचं नाही.
मनात चांगल्या पेक्षा वाइट विचार जास्त येत असत . देवाला नवस केला, सुखरूप परत येण्यासाठी प्रार्थना केली.
अचानक संध्याकाळच्या वेळी फोन वाजला, माहिती नसलेला फोन होता ...त्यातच व्हिडिओ कॉल..घ्यावा की, नको अशा संभ्रमात असताना चुकून फोन रिसिव्ह झाला..समोर आजोबा...बोलण्यापेक्षा दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले..त्याच वेळी तिथल्या वार्ड बॉय नी सांगितलं.." आजोबा तुमची खूप काळजी करत होते ,म्हणून व्हिडिओ कॉल केला . तुम्ही दोघंही एकमेकांची काळजी करू नका...देव आहे ना ..."
त्याचे हे वाक्य ऐकून मन भरून आलं . हा आपल्या नात्यातला ना ओळखीतला पण एका क्षणातच स्वतः हे वाक्य बोलून देवाला श्रेय देऊन मोकळा झाला.
"तुम्ही काळजी करू नका... " या चार शब्दाने आपल्या खूप जवळचा वाटून गेला...
या देवमाणसाला शतशः प्रणाम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment