1
" तुम्ही कोणत्या गावचे?" , " तुमचं गाव कोणतं?"
माझ्या बाबांचा हा ठरलेला प्रश्न ऐकला की मला हसायला यायचं. बोलका स्वभाव होता त्यामुळे ओळख पटकन होत असे , या प्रश्नाने सुरुवात केली की, बाबांच्या गप्पां चालू होत असत.
आमच्या गावाचं नाव ते अगदी अभिमानाने सांगत असत. आपण पत्र लिहताना मुक्काम पोस्ट,तालुका,जिल्हा लिहितो इतकं ते सविस्तर असायचं.
आमच्या गावाचं वर्णन करताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक मी पाहिली होती. आपल्या गावाची ओळख सांगताना त्या ओळखीतून आपल्या गावचा कोणीतरी नक्की भेटेल असं त्यांना वाटायचं. मुंबईत येऊन त्यांनी अशी गावची माणसं शोधूनही काढली.
आयुष्याच्या शेवटच्या दहा वर्षात मुंबईत राहून गावच्या आठवणीत रमणाऱ्या माझ्या बाबांना मानाचा सलाम 🙏
2
" काय हो कुलकर्णीबाई, गावची सून केली का..?"
या वाक्यात गावची चा " ची " इतक्या खालच्या स्वरात उच्चारला जायचा की मला वाटायचं मी कुठल्या वेगळ्या धृवावरून अवतरले की काय..!
मला माझ्या गावचा खूप अभिमान आजही वाटतो व त्या वेळीही वाटायचा. लग्न करून प्रथमच शहरी वातावरणात आले त्यावेळी मला बऱ्याच लोकांच्या नजरेत माझ्याविषयी तुच्छता, एक प्रकारचा कमीपणा जाणवायचा.
कधी - कधी वाटायचं " ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला.."
माहेर , गावी जाताना आपली बोलीभाषा,पोशाख, ठराविक सवयी पहायला मिळाल्या की, माणसात आल्याचा भास होत असे.
"खरचं गाव म्हणजे गाव असतं..
तिथे काहीचं कमी नसतं...
ज्यांना गाव असतं ...
त्यांच्या सारखं नशीबवान कोणीच नसतं.."
3
" बाळा, हे चित्र कसं काढलंस, कुठे पाहिलंस हे?"
महेश आश्चर्याने थक्क होत विचारलं.
आजी मला नेहमी या गावाची गोष्ट सांगायची तेच हे गाव.
हातातल्या चित्राकडे बघत महेशला आपल्या गावाची आठवण झाली.आपल्या गावातील घराचे हुबेहूब चित्र चिन्मयने काढले होते.
गावाचे नाव काढले तरी चिडणारा महेश आज चित्र आनंदाने बघत होता.
वीस वर्षांपूर्वी जमिनीच्या वादावरून गाव सोडलं ते सोडलचं.
आज मुलाने रंगवलेलं गाव पाहून महेश सुखावून गेला .
हृदयात साठलेलं पण मनाने बंद केलेलं गावचं रूप मुलाने हुबेहूब काढून स्मृती जागृत केल्या,आपण नातं कितीही तोडायचं ठरवलं तरी आपलं गावाचं नातं आपण कधीच तोडू शकत नाही.
कधीही न पाहिलेल्या गावचं चित्र रेखाटनाऱ्या मुलाला पाहून चिन्मयमध्ये महेशला त्याचे बाबा दिसले..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment