तो तिच्या जवळ आला, तिच्या पायावर डोकं ठेवलं,मंदिरात गेल्यावर देवांच्या पादुकावर डोकं ठेवावं अगदी तसच..
आश्रमात प्रमुख पाहूणे म्हणून बोलावलेल्या अधिकाऱ्याने विद्याच्या पायावर डोकं का ठेवलंय हे कोणाला कळतच नव्हतं. विद्या कावरी बावरी झाली वाकून त्याला उभ केलं," अरे बाळा माणसाच्या पायावर डोकं कधी ठेवायचं नाही , मंदिरात देवाच्या पायावर डोकं ठेवायचं."
"बाई, तुम्हीच माझ्यासाठी देव आहात, तुमच्यासारखी देवी माझ्या आयुष्यात आली नसती तर मी आज कुठे असतो माहीत नाही."
डोळ्यावर निरागस भाव, हा काय बोलतोय ते तिला कळतच नव्हतं, त्याच्या पाठीवर थाप देऊन विद्या बाहेर निघाली.
" बाई तुम्ही मला ओळखलं नाही, मी अजय शिंदे 8 वी ड चा विद्यार्थी, मानकर चाळीत राहणारा.."
बाई काहीच बोलल्या नाही, निरविकार चेहऱ्याने फक्त बघत होत्या.
आश्रमातल्या मॅडमनी अजयला आतमध्ये येण्याची खूण केली.
" साहेब, या विद्या ताई मागच्या दोन वर्षापासून आमच्याकडे असतात. यजमानांच्या निधनामुळे धक्का बसला, तेंव्हापासून त्या खूप शांत असतात, हल्ली त्यांना विस्मृतीचा त्रास चालू झाला आहे. त्यांची दोन्ही मुलं परदेशात असतात दर महिन्याला पैसे पाठवतात मध्येच आठवण आली तर फोनही करतात."
ज्या बाईमुळे मी समाजात मानाने वावरतो आहे त्या आई समान बाई आश्रमात राहतात हे ऐकून अजयला मेल्याहून मेल्यासारखं झालं.
बाईचा आजचा चेहरा व पंचवीस वर्षांपूर्वीचा चेहरा किती साम्य आहे दोन्ही मध्ये अजयला तो काळ आठवला..
" या मुलाने चोरी केली, याला पोलिसांच्या ताब्यात द्या " अशी मागणी शाळेतून होत होती. हेडमास्तरबाईने खूप खूप बदडलं होतं, तश्या अवस्थेत पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेल्या. रीतसर कारवाई करून मला बालसुधार गृहात टाकण्याची तयारी चालू होती एवढ्यात बाई आल्या , चोरीच्या पर्स सारखी पर्स त्यांच्या हातात होती.पोलिसांना बोलल्या," सर, माझीच चूक झाली मी चुकून या पर्स मध्ये पैसे ठेवले होते.दोन्ही सारख्याच होत्या त्यामुळे माझा गैरसमज झाला मला माफ करा. हा मुलगा खूप प्रामाणिक आहे " असं म्हणत दिलगिरी व्यक्त केली. बाईनी सर्व गोष्टी शांतपणे व हुशारीने सांभाळल्या होत्या त्यामुळे पोलिसांचा व हेडमास्तर बाईचा नाईलाज झाला. त्या मला वाचवण्यासाठी खोटं बोलत आहेत याची शंकाही आली नाही.
पोलिस स्टेशनहून येताना बाईनी मला ज्या गोष्टी शांतपणे समजावून सांगितल्या त्याची शिदोरी मला अजूनही कामाला येत आहे.
त्या दिवशी बाईनी शांतपणे परिस्थिती हाताळली नसती तर आज मी कुठे असतो याची कल्पना न केलेलीच बरी.
माझ्या बालपणात, तरुणपणात केलेली मदत कधीच विसरू शकत नाही. आज मी आयपीएस अधिकारी आहे तो फक्त बाईमुळे..
हा त्यांचा तिसरा मुलगा जिवंत असताना आश्रमात राहावं लागतं याची मनोमन लाज वाटत होती व स्वतःचा खूप राग येत होता.
विस्मरणात गेलेल्या आपल्या खऱ्या आईला घेऊन अजय आनंदाने आपल्या घरी गेला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment