"अरे मोठ्या ने बोल ना..काय होणार आहे..ऐकायला येत नाही... परत बोल.." मालतीताईला ऐकायला आलं होतं पण कानावर विश्वासचं बसत नव्हता म्हणून उत्सुकतेने परत एकदा विचारत होत्या..
" अगं आई तू आजी होणार आहेस..आजी.."
" काय म्हणतोस, मी...मी आजी होणार.." आनंदाने मालतीताईने फोन ठेवून दिला व धावत धावत जाऊन विजयरावांच्या हातातला पेपर खेचत बोलल्या ," अहो, मी आजी होणार आहे आणि तुम्ही आजोबा...चला कामाला लागा.."
बातमी कानावर पडली व दोघांचं स्वप्न रंजन चालू झालं.
गोड बातमी सांगण्यासाठी मालतीताईने आपल्या मोठ्या बहिणीला फोन केला त्या वेळी ताईने सांगितलं ," तीन महिने कोणाला सांगू नको, चोरचोळी झाली की मग सगळ्यांना सांग." हे ऐकताच मालतीताईचा हिरमोड झाला.
मी आजी होणार ही बातमी कोणाला सांगू व कोणाला नको असं झालं होत पण एवढी मोठी बातमी कोणाला सांगायची नाही म्हणजे शिक्षाच आहे. काय करणार ..बिचारी मालतीताई!!
विजयराव तर आता मालतीताईना " आजीबाई" या नावानेच हाक मारत होते, आजी या नावानेच मालतीताई गालातल्या गालात हसत होत्या जणू काही मोठी पदवीचं मिळणार आहे.
आजी होणार म्हणजे आता आपल्याला तयारीला लागलं पाहिजे , आपली आजी आपल्यासाठी जे प्रेम भरभरून दिलं ते आपल्या नातवाला द्यायचं आहे, असा विचार करत आजीची गोधडी, तिने विणलेला स्वेटर, कुंची..अजून कितीतरी गोष्टी आठवून आपल्याला करायच्या आहेत असं मनाशी ठरवून टाकलं .
आपल्याला नात होईल की, नातू.. काहीही होऊ दे पण माझा एक तरी गुण किंवा रूप आपल्या नातवात येईल का..?? नाही,आलाच पाहिजे..मी आजी आहे ना त्याची..मनाशीच बोलत होत्या.
" अहो आजीबाई, स्वतःशीच काय बोलताय, तयारी करा आता..गोष्टी सांगाव्या लागतील नातवाला.. अंगाई गीत गावं लागेल तुम्हाला, नातवाच्या मागे धावायला गुढघे शाबूत ठेवावे लागतील.." चिडवण्याच्या स्वरात विजयराव बोलून गेले.
मालतीताईने वाचन चालू केलं, हल्लीच्या मुलाना काय आवडतं याचा विचार करून माहिती गोळा केली, गुढग्यांचे व्यायाम चालू केले सोबतच केलशियमची गोळी चालू केली.आधुनिक नातवाची आधुनिक आजी दिवसागणिक पोटातल्या बाळासोबत वाढतच चालली होती.
तीन महिने पूर्ण झाले व पोटात लपवून ठेवलेली बातमी अखेर बाहेर पडली. "मी आजी होणार" या वाक्याचा मालतीताई ने जपच चालू केला होता.
नातवंड म्हणजे आजी साठी दुधावरची साय असते या वाक्याचा अर्थ नातवंड होण्या आधीच
मालतीताई अनुभवत होत्या.
आपल्याला मुलगी , बहिण ,पत्नी, आई..अश्या कितीतरी नात्यांच्या उपाध्या मिळाल्या पण आजी या नावापुढे सगळे नाते ,सगळ्या उपाध्या फिक्या वाटायला लागल्या आहेत याची जाणीव झाली.
नऊ महिन्यांनंतर नातवा सोबत आजीने नव्याने जन्म घेतला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment