8 मे 2020 रोजी माझ्या सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. लॉक डाऊन चालू होतं. या वर्षी थोड्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा करायचा असा विचार करत मला एक भन्नाट कल्पना सुचली.करोनाचा काळ होता त्यामुळे कोणीच कोणाकडे जात नव्हतं व बोलावणं चुकीचं होतं. मी चार दिवस अगोदर त्यांच्या मित्रमंडळींना व नातेवाईकांना फोन करून सांगितले की, आई बाबाचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यामुळे या वर्षी तुम्ही त्यांना व्हिडिओ करुन त्याच्या माध्यमातून शुभेच्छा द्याल का? मी असं विचारताच सर्वजण तयार झाले.
सर्वांना फोन किंवा मेसेज करताना मला खबरदारी घ्यावी लागे , कारण हे माझं सरप्राइज गिफ्ट होतं. माझ्या मोबाईलवर फोन आला की, बाहेर जाणं, हळू आवाजात बोलणं हे सर्वांना संशयास्पद वाटतं होतं,बरेच वेळा मला त्यांनी टोकलं पण मी उडवाउडवीची उत्तरं दिली व वेळ मारून नेली.
माझ्या एका खास मैत्रिणीला व्हिडिओ एडिटिंग करायला दिलं. व्हिडिओ संदर्भात तिचे बरेच फोन यायचे त्या वेळी बाहेर जाऊन बोलणे व्हायचे, कधीच काहीच न लपवणारी सूनबाई काहीतरी लपवत आहे याची त्यांना जाणीव झाली व थोडं वाईट वाटलं.
करोना काळातला आमचा टाईमपास म्हणजे पत्ते खेळणे , सात मे रोजी मुद्दामच उशिरा पत्ते खेळायला बसलो , अकरा वाजता बत्ती गुल्ल होणारी सूनबाई बारा पर्यंत कशी जागी म्हणून शंका आली एवढ्यात मी लॅपटॉप काढला व व्हिडिओ चालू केला.
आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे हे दोघेही विसरले होते,सुनेला आपल्या लग्नाचा वाढदिवस लक्षात आहे हे बघून आनंद झाला. व्हिडिओ पुढे जातोय तसं बहिण ,भाऊ, भाचे,भाची, जिवलग मित्र व मैत्रीणी त्यांना आठवणीच्या रूपात वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा देत होते. एकामागून एक येणारे चेहरे व त्यांनी मनापासून साधलेला संवाद ऐकून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. दहा ते पंधरा मिनिटांचा व्हिडिओ होता. एवढ्या सर्वांनी मनापासून सहभाग घेतला व आमच्यासाठी हे सर्व केलं हा विचार करून त्याचं मन भरून आलं. हा सरप्राइज व्हिडिओ त्यांनी परत किती वेळा पाहिला असेल याचा विचार न केलेलाच बरा..!!
व्हिडिओ संपल्यानंतर सासुबाईनी मारलेली मिठी मी कधीच विसरू शकत नाही.
कोरोनाच्या काळात आपल्या लोकांची प्रत्येक्ष भेटणे अशक्य होती पण मी त्यांची अप्रतेक्ष्य भेट घडवली हे त्यांच्यासाठी लाख मोलाची भेट होती.
आपल्या कृतीतून सतत आनंद द्यायचा व मनाने नाते जपायचे हा त्यांचाच संस्कार मनात रुजला व त्यांच्या लग्नदिनी मी हे आगळी वेगळी सरप्राइज भेट देऊ शकले यातच मला धन्यता वाटते.
आजची मॉम्सप्रेसो वरची माझी शंभरावी पोस्ट त्यांच्या चरणी अर्पण करून आणखीन एक सरप्राइज आठवणीच्या गाभाऱ्यात सांभाळून ठेवते..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment