" मला वाटतं आईचा आजार हा शारीरिक नसून मानसिक आहे. आपण मानसोपचार तज्ज्ञांना दाखवायचं का?" सुधाने सुमितला सुचवलं
" हो,मलाही तेच वाटतं. ती काहीतरी वेगळंच बोलते. आपल्याच धुंदीत असते."
" काल तर आजी बाथरूम मधली बादली उचलली व म्हणते मी ओढ्यावर जाते कपडे धुवायला . आई, हा ओढा म्हणजे काय ग..?" नीलने मनातली शंका व्यक्त केली.
" आई असं बोलली..?"
" हो बाबा, अजून बरंच काहीतरी बोलते.. माज घरातल्या कोनाड्यात डबी ठेव , मी पाणी शेंदून आणू का..? असं पण बोलत होती." नील बाबांना सांगत होता.
" अगं, आईला गावाची आठवण येते, म्हणून ती बैचेन आहे, हा तिचा डॉक्टरला दाखवण्याचा आजार नाही.."
" म्हणजे..?"
" तिला आपल्या गावाला जायची ओढ लागली आहे,हाच आजार आहे तिचा..." काहितरी गवसल्याचा आनंद सुमितच्या चेहऱ्यावर दिसत होता.
बाबा गेल्यानंतर गावात आईची काळजी घेणारं कोणीच नव्हतं म्हणून सुमितने आईला मुंबईला घेऊन यायचा निर्णय घेतला . मुलाच्या प्रेमापोटी आईने होकार दिला पण आयुष्यभर वावरलेल्या घरातून, अंगणातल्या विहिरीतून , गावाच्या ओढ्यातून जीव निघत नव्हता .
सामानाची बांधाबांध झाली त्यावेळी आई बराच वेळ माजघरात काहीतरी करत होती. बाहेर अंगणात येऊन तुळशीला पाणी टाकून डोळे बंद करून नमस्कार केला, जणू तुळशी सोबत हितगुज करत होती.
विहिरीजवळ जाऊन पोहरा पाण्यात सोडला व गरकन ओढला, पाणी आलंच नाही..रिकाम्या पोहऱ्यासोबत मनोमन काहीतरी बोलत होती.
आईचा चाललेला संवाद सुमित नजरेनी बघत होता.
" आई, चल उशीर होतोय.."
" हो, चल.." असं म्हणत घराचा निरोप घेतला.
गाडी गावच्या ओढ्यापर्यंत येताच आई ने गाडी थांबवायला सांगितली. गाडीतून उतरून ओढ्याच्या पाण्यात पाय धुतले, समोर उभ्या असलेल्या हिरव्यागार डोंगराला हात जोडून नमस्कार केला.
आईचं हे प्रेम बघून सुमितच मन गलबलून गेलं पण पर्याय नव्हता. आईच्या खांद्यावर हात ठेऊन ,आईला धीर दिला, असं वाटतं होतं जणू आईची पाठवणी करायला हे सगळे उभे आहेत आणि आई नववधू प्रमाणे प्रेमाने निरोप घेते.निरोप देताना डोळ्यात पाणी भरून आलं होतं.
मनात आपलं गावाचं घर, विहीर यांना सोबत घेऊन आली होती.
मागच्या दहा वर्षात आईने कधीच गावाची आठवण काढली नव्हती पण आता अचानक तिला काय झालं असेल बरं असा सुमित विचार करत होता.कधी मनाने उभारी घेतली की ओढ लागते तेच खरं आहे.
" आई आपण उद्या गावाला जाणार आहोत , चल तयारी कर.."
" खरचं..?" आई आनंदानी बोलली.
आईचा हात हातात घेत सुमितने होकार दिला.
आईची कळी खुलली, मागच्या पंधरा दिवसापासून न जेवणारी आई आज पोटभर जेवण केली.
सकाळी लवकर उठून गावाला जायला निघाले. गाव जवळ येताच आईने काचा खाली केल्या व बाहेरून येणाऱ्या थंड हवेची झुळूक अंगावर घेत डोंगरातल्या प्रत्येक झाडाची चौकशी करत होती, कुतूहलाने कुठे बघू व कुठे नको असं झालं होतं.
घरासमोर गाडी पोहचताच सोळा वर्षाच्या मुली प्रमाणे नाचायला लागली.
आईच्या चेहऱ्यावरचा हा आनंद पाहून सुमित समजून गेला माणसाचं प्रेमाचं नातं सजीव लोकांन प्रमाणे नकळत कितीतरी गोष्टी सोबत जुळून येत असतं.
आपल्या गावाच्या या प्रत्येक गोष्टीत आईचा जीव गुंतला आहे. आई शरीराने तिथे आहे पण मनाने ती कायम इथेच असेल.
गावातल्या या सर्व गोष्टी परत एकदा मनात साठवत पण या आनंदाने गावाचा निरोप घेतला..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment