"आपल्या मंडळाची पिकनिक चालली आहे ..."
" हो मी पण वाचला मेसेज , पण कसं शक्य आहे , पिकनिक म्हणजे अख्खा दिवस बाहेर रहावं लागेल ..घराकडे कोण बघेल ...ही रिकामटेकड्यांची कामं आहेत आपल्या सारख्या बायकांना नाही जमत घर वाऱ्यावर सोडून भटकायला .."
दोघी मैत्रीणी नाक मुरडत घरी गेल्या . दोघीना पिकनिकला जायचा विचार मनात आला पण घरातली कामं कोण करेल ...माझ्याशिवाय घरातली काडी हलणार नाही असा दोघींचा समज होता.
घरी येताच घरभर पडलेला पसारा पाहून नेहमी प्रमाणे चिडचिड चालू झाली .
" आमच्या घरी एक तास बाहेर गेली तर घराचा असा अवतार करतात , अख्खा दिवस पिकनीकला बाहेर गेली तर काय करतील याचा विचारही करवत नाही .." असं बडबडत कामाला लागली .
" जा ना पिकनिकला , कधी जातेस .." नवरोबाने उत्सुकतेने विचारले .
" मी कसली जाते ... माझी पिकनिक म्हणजे रांधा वाडा, उष्टी काढा ...मला कुठे वेळ आहे भटकायला .." नकारघंटा वाजवत उत्तर दिलं.
" मी एक दिवस सुट्टी घेतो , तू जा मज्जा कर .." बायकोचा हात हातात घेत नवऱ्यानी संमती दिली .
हो - नाही करत अखेर दोघी मैत्रिणीने पिकनिकला नावं दिली .
आपल्या परिवारापुरताच विचार करणारी स्वतःला घरातच गुंतून घेणाऱ्या दोघी नवऱ्याच्या भरवश्यावर एक दिवस स्वतःसाठी वेळ देण्यास तयार झाल्या .
साधारण बारा तासासाठी बाहेर पडायचं होतं पण घरात अशी तयारी केली जणू एक महिन्यासाठी बाहेर जाणार आहेत .
पिकनिकची तयारी , घतरातली तयारी करून अखेर दोघी घराच्या बाहेर पडल्या .
मैत्रिणी सोबत गप्पा - गोष्टी , गाणी गाण्यात कसा वेळ गेला कळलंच नाही . मैत्रिणींचे बरेच कला गुण पाहायला मिळाले . कॉलेजच्या दिवसात केलेली मज्जा आठवली , सुंदर कपडे घालून काढलेली सेल्फी , बनवलेले रील आठवले . आज दोघीनी खूप मज्जा केली . खूप फोटो काढले, डान्स केला, व्हिडिओ बनवले.
पिकनिकचा दिवस खूप आनंदात गेला . परतीचा प्रवास चालू झाला तसा दोघींच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं, आज सारखी मज्जा आपण या आधी का केली नाही...??
संसारात पडले तरी माझ्या हातात भारीचा मोबाईल आहे , छान कपडे आहेत , घरात एवढे स्वातंत्र्य आहे मग ..हे का बंद झाले याचा विचार दोघी करू लागल्या ..
या सर्व आनंद देणाऱ्या गोष्टी बंद झाला नाहीत तर आम्ही स्वतः होऊन बंद केल्या प्रत्येक वेळी मी एक गृहकर्तव्यदक्ष गृहिणी आहे, माझं घरावरून थोडंही लक्ष विचलित झालं तर माझं घर बिघडेल , माझी मुलं बिघडतील , मी लक्ष दिलं तरच माझं घर नीट चालेल नाहीतर वाट लागेल घराची असाच समज करून दोघी वावरत होत्या पण आज पिकनिकला आल्यावर दोघीनीं विचार केला कि संसाराची जोखड म्हणून खांद्यावर न घेता स्वतः आयुष्याचा आनंद घेत संसार रुपी रथ पुढे ढकलला तर...
दोघींच्या आयुष्यात आनंदी आनंद निर्माण झाला. एका पिकनिक मुळे कितीतरी चिडचिड करणारी आयुष्य आनंदाने डोलू लागली.
बऱ्याच महिलांचा असा समज असतो कि , मैत्रिणी सोबत पिकनिक , पार्टी केली कि , बायकांचं घरात लक्ष नसतं .
कधी कधी साचे बद्ध जीवन सोडून , घरातलं शिस्त बद्ध वागणं सोडून एक दिवस स्वतःसाठी जगलं तर तो पुढील काही दिवसासाठी ऊर्जा मिळते व नित्याची कामे जोमानी होतात.
स्वतःही आनंदात जगा व घरातल्या लोकांसाठी एक दिवस मोकळा ठेवा व जीवनाचा आनंद घ्या .. .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment