"खूप खूप अभिनंदन साक्षी, तू खरी या सन्मानाची मानकरी आहेस. किती छान शिकवतेस सईला , खरंच तू बेस्ट आई आहेस ..''
सर्वांकडून तोंडभरून कौतुक ऐकून साक्षी हरखून गेली होती. आज आपल्या मनापासून केलेल्या कष्टाचं चीझ झालं याचं समाधान वाटलं.
दिवसभराच्या शुभेच्छाच्या वर्षावा नंतर आनंदात झोप कधी लागली कळलच नाही. रात्री दचकून जागी झाली...वाइट स्वप्न पडलं.. एक दहा वर्षाचा मुलगा हुंदके देत रडत होता.रडत रडत बोलत होता.." तू माझी आई नाहीस..तू स्वार्थी आहेस.. सेल्फीश..."
साक्षी जागी झाली त्यावेळी तिला घाम फुटला होता. बाजूला ठेवलेलं तंब्यातलं पाणी गटागट प्यायली. कपाळाचा घाम पुसला, शांत झाली पण आतून आग लागली होती . दोन वर्षाचा तो जीव केविलवाण्या नजरेनी पहात होता. आजी कडून माझ्याकडे झेप घेत होता पण माझ्यातली बायको व सून प्रबळ झाली व आईला मारून टाकली. मनापेक्षा बुद्धीचं ऐकलं व मुलाकडे पाठ करून कायमची निघून आली.
साक्षी स्वतःला ठणकावून सांगत होती,"मी एक स्त्री म्हणून चुकली नाही. अन्याय मी किती दिवस सहन करणार होती. माझं उभं आयुष्य माझ्यासमोर होतं. लग्नाला वर्षही पूर्ण झाले नाही की, गूड न्यूज आली . घरातल्या लोकांची वागण्याची तऱ्हाचं वेगळी होती. पैशाला हापालेली लोकं होती. नवरा व्यसनी, रोज दारू पिऊन धिंगाणा घालायचा. घरातल्या लोकांना, नवऱ्याला सुधारण्याचा खूप प्रयत्न केला पण निष्फळ ठरला. नवव्या महिन्यात नवऱ्याने दारूच्या नशेत ढकलून दिलं त्यामुळे ऑपरेशन करून डीलेवरी करावी लागली. मरणाच्या दारातून वाचली.
सर्व अपमान सहन करून बाळासोबत जीवन
कंठत होती . ज्यावेळी अगदीच असह्य झालं त्यावेळी मात्र दुर्गेचा अवतार घेतला . अन्याया विरुद्ध पेटून उठली. स्वतः कमावती होती त्यामुळे बाळाला घेऊन माहेरी आली. कोर्टात जाऊन घटस्फोटाची मागणी केली.
सुनेला पोटगी देण्यापेक्षा मुलाला आपल्याकडे घेण्याची मागणी सासरच्या लोकांनी केली. प्रकरण खूप दिवस चिघळत होतं.
त्याचवेळी साक्षीला रोहितचं स्थळ सांगून आलं. घरात सगळे सुशिक्षित होते . रोहित निर्व्यसनी व खूप प्रेमळ होता पण त्याची एक अट होती, त्याला फक्त साक्षी हवी होती..तिचं मूल नको होतं..
साक्षीने हा प्रस्ताव धुडकावून लावला पण सर्व परिस्थिती, तिचं स्वतःचं भविष्य, आजूबाजूची परिस्थिती विचार करता शेवटी नाईलाजाने रोहितच्या स्थळाला होकार दिला.
इकडे मुलाचा ताबा त्याच्या बाबांनी घेतला. साक्षी व रोहितचं लग्न झालं. राजा राणीचा संसार चालू झाला. त्यांना सई सारखी गोड व हुशार मुलगी झाली . या अगोदरच आयुष्य वाईट स्वप्न म्हणून साक्षी विसरून गेली होती.
आज आठ वर्षानंतर अचानक माझ्याच पोटातला गोळा मला म्हणतो आई तू स्वार्थी आहेस , तू फक्त तुझाच विचार केलास . मला खाईत सोडून आलीस . माझा एकदा विचार केला असता तर मी ही आज सई सारखा झालो असतो ...
आठ वर्षां नंतर आज साक्षीने स्वतःला व आपल्या बाळाला मनोमन कबुली दिली. आज तू माझ्या सोबत असता तर तू ही सई सारखा झाला असता.खरंच मी फक्त माझाच विचार केला , आई म्हणून मी चुकले रे बाळा ..मला माफ कर..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment