मनात माझ्या - मराठी कथा

स्वागत आहे ! लेख , कथा ,योग, स्तोत्र आणि कवितांसाठीचा मराठी ब्लॉग . येथे तुम्हाला मराठीमध्ये विविध विषयावरील प्रेरणादायक लेख , मनोरंजक कथा , योगाच्या टिप्स ,पवित्र स्तोत्र आणि हृदयस्पर्शी कवितांचा संग्रह वाचायला मिळेल . तुमच्या मनाला स्पर्श करणारे साहित्य शोधण्यासाठी आमच्या ब्लॉगला अवश्य भेट द्या

हा ब्लॉग शोधा

तुम्हाला काय वाचायला आवडेल

बुधवार, २६ एप्रिल, २०२३

मातृ स्पर्शातली  शाळेची नवलाई

 उद्या १३  जून या विचारानेच सुषमाला टेंशन आलं.   उद्यापासून  शाळा चालू होणार .. चेतनला घेऊन शाळेत जायचे आहे , लवकर उठावे लागेल...  माझी तयारी ... त्याची तयारी ...  त्याचा डब्बा कितीतरी  कामं  आहेत  उद्यापासून आपल्याला..  असा विचार करत   सुषमाने डोक्याला हात लावला . 

चेतनला शाळेत घालायचा हा सर्वस्वी माझा निर्णय होता त्यामुळे आपल्याला खचून चालणार नाही असा विचार करत रात्रीच सकाळची तयारी करून ठेवली. सर्व कामं आटोपून आपल्या मुलाच्या ,चेतनच्या बाजूला जाऊन पडली . चेतनच्या डोक्यावरून  हात फिरवत बोलली ,'बाळा , उद्या लवकर उठायचं आहे हं, शाळेत जायचं आहे आपल्याला . '

आपण याच्याशी बोलतोय पण याला बिचाऱ्याला काय माहित शाळा म्हणजे काय..या विचाराने सुषमाच्या डोळ्यात पाणी आलं , डोळ्यातल्या पाण्यासोबत मन आठ वर्षांपूर्वी घडलेल्या घटनांचा मागोवा घेऊ लागलं..

पहिला मुलगा झाला म्हणून सासर - माहेरची दोन्ही घरं आनंदाने न्हाऊन निघाली होती . अक्षयचा म्हणजे त्याच्या बाबाचा आनंद गगनात मावत नव्हता . चेतन म्हणजे अक्षयची कार्बन कॉपी ..अगदी त्याच्यासारखा हुबेहूब .. " ज्युनिअर अक्षय " बोलत होते सर्वजण .  याच गोष्टीचा त्याला खूप  अभिमान वाटला होता .

 बाळ खूप सुंदर गोंडस होतं  पण कधी कधी खूप झोपत तर काही वेळा  भलतंच रडत  होतं  . सुरुवातीला वाटलं काही दुखत - खुपत असेल म्हणून रडत असेल पण त्याचं  रडणं थांबतच नव्हतं म्हणून डॉक्टर कडे घेऊन गेलो . डॉक्टरकडे गेल्या नंतर काही टेस्ट झाल्या त्यावेळी कळलं चेतन " मतिमंद " आहे . आकाशातून वीज कडकडावी व त्याच्या आवाजाने छातीत धडकी भरावी अशी सुषमाची  अवस्था झाली होती . घरात निराशेची छाया दाटली , कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. बाळाच्या भोवती पिंगा घालणारी लोकं  ,बाळाच्या भोवती फिरकतही नव्हती  .

बाळाच्या मतिमंद असण्यापेक्षा या लोकांच्या वागण्याचा सुषमाला खूप राग येत होता . अक्षयने सुषमाला मुलाच्या प्रेमातून बाहेर येऊन प्रॅक्टिकल विचार करण्याचा सल्ला दिला . हा लहान आहे तोपर्यंत ठीक आहे पण हा मोठा झाल्या नंतर याचं कोण करेल ?  याचं भविष्य आणि आपलं भविष्य चांगलं करायचं असेल तर कठोर निर्णय  आपल्याला घ्यावाच लागेल असं जीव तोडून सांगत होता.सर्वांचं सर्व ऐकून सुषमा शांत बसली  होती.  

 काल पर्यंत बाळाला घेऊन फिरणारा बाबा  असं काही बोलू शकतो याचं सुषमाला नवल वाटलं .सुषमांनी स्पष्ट  शब्दात  सर्वांना सांगून टाकलं ," माझ्या बाळाचं करायला मी समर्थ आहे ." त्या दिवसापासून तिची व बाळाची लढाई चालू झाली ..

माझं  बाळ मतिमंद असलं  म्हणून काय झालं , माझ्या स्पर्शातून बाळाला मी हे जग दाखवेन . प्रत्येक  वस्तूची जाणीव करून देईन म्हणून त्याचा नाव ठेवलं

 " चेतन " .

चेतन आता आठ वर्षाचा झाला आहे , त्याला  शाळेत  घातलं पाहिजे  असा विचार तिच्या डोक्यात  आला. अशा खास  मुलांसाठी शाळा असते हे तिने वाचलं होतं. तिने शाळा शोधून काढली .   शाळा छान होती पण घरापासून बरीच दूर होती व  शाळेत बसची सोय  नव्हती . प्रत्येक अडचणीतून मार्ग काढणं सुषमाला येत होतं म्हणूनच  संकटाची मालिकाच तिच्या समोर येत होती .

शाळेचं नाव काढताच घरातल्यानी असहकार आंदोलन चालू केलं . या सर्व गोष्टी सुषमाने गृहीत धरल्याचं होत्या . चेतनची शाळा पण सुषमाचाच उत्साह ओसंडून वाहत होता . मी  शाळेत जाताना ज्या गोष्टींचा अनुभव घेतला त्या प्रत्येक लहान लहान गोष्टीचा आनंद मी माझ्या बाळाला करून देईन. सुषमाला तिच्या लहानपणीची आठवण आली .. 

आपली पहिलीच शाळा होती . बाबानी दुकानात  घेऊन जाऊन आवडीची बॅग घेतली होती . खाऊचा डबा..   किती आवडला होता आपल्याला , घरी असतानाही त्याच डब्यात जेवणार असा हट्ट केला होता आईकडे .. शाळेच्या गणवेशातली मी , अजूनही फोटो जपून ठेवला आहे . प्रत्येक वर्षी नवीन पुस्तकं घ्यायची व त्याचा तो वास अजूनही नाकात रेंगाळतो आहे . शाळेत जाताना छत्री घेऊनही मुद्दाम पावसात भिजायचा आनंद आजही ओलेपणाचा भास करून जातो ..  

चेतनच्या  आवाजाने सुषमा भानावर आली . आपण शाळेत असताना ज्या गोष्टी अनुभवल्या त्याची जाणीव आपल्या बाळाला करून द्याची असा मनात निश्चय केला . 

बाजारात जाऊन नवीन बॅग , शाळेचा ड्रेस , वाटर बॅग , रेनकोट, पुस्तकं  आणली पण सोबत चेतनला घेऊन  जाता आलं नाही  याचं वाईट वाटलं.  घरी पोहचताच त्याच्यासमोर हे सर्व साहित्य काढून ठेवलं . प्रत्येक वस्तू हातात ठेऊन आपल्याच स्पर्शाने त्याला त्याची जाणीव करून देत होती . नवी कोरी पुस्तकं त्याच्या समोर उघडली व नाकासमोर नेली व एक दीर्घ श्वास घेतला . असाच श्वास त्याच्याकडून घेण्याची अपेक्षा केली . तिच्या मातृ हृदयातून आलेली हाक त्या बाळाने ऐकली . एक दीर्घ श्वास घेतला . त्याच्या त्या उष्ण श्वासानी सुषमाचं हृदय प्रफुल्लीत झालं . 

सकाळी  लवकर उठून हात जोडून देवासमोर उभी राहिली , डोळे बंद करून प्रार्थना केली,' देवा माझ्या स्पर्शातून माझ्या बाळाला  प्रत्येक गोष्टीची जाणीव करून द्याची आहे . मला शक्ती दे देवा." 

चेतनला उटणं लावून अंघोळ घातली , नवीन  कोरा शाळेचा ड्रेस घातला पायात पांढरे मोजे ,काळे बूट चढवले ,

पाटीला  दप्तर अडकावलं , गळ्यात वॉटर बॅग लटकावली . चेतनच्या हातात ओळख पत्र देत हातानी , डोळ्यांनी त्याला सांगत होती ,' बाळा, या  जगात तू प्रथमच बाहेर पडतोय , या नावाने तुला सर्वजण  ओळखतील सांभाळून ठेव . "   असं म्हणताच चेतननी सुषमाचा हात  पकडला . या स्पर्शातून तो सांगून गेला ,' आई, तू काळजी करू नको मी सांभाळून ठेवेन .'

मुलाला शाळेत घेऊन जाण्यासाठी गाडीची चावी घेतली व काल  माप  घेऊन शिवलेला पट्टा घेतला  . चेतनच्या पाठीला   पट्टा  बांधला,त्याचं दुसरं टोक आपल्या पोटाला बांधलं व   गाडी चालू केली  एवढ्यात पाऊस आला . सुषमा चेतनला घेऊन आडोश्याला उभी राहिली . पत्र्याच्या सांधीतून येणाऱ्या पावसाचे थेंब चेतननी हातावर घेऊन स्वतःच्या  व हळूच सुषमाच्या अंगावर शिंपडले . चेतनच्या या कृती मुळे  सुषमा मनोमन खुश झाली व आपली प्रार्थना देवांनी ऐकली याबद्दल देवाचे आभार मानले . पाऊस थांबताच  झाशीची राणी आपल्या बाळाला पाटीला बांधून लढाई लढायला निघाली... 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

comment

नक्की वाचा

पाठीचा कणा

“ पाठीचा कणा ताठ, मान सरळ “ या वाक्याने माझा  योग क्लास चालू होतो.  माझा सहा वर्षाचा भाचा मला विचारतो, “ मावशी , तू क्लास घेताना  पाठीचा कणा...

Post Top Ad

Your Ad Spot

Pages

SoraTemplates

Best Free and Premium Blogger Templates Provider.

Buy This Template