मी कधी पासुन वाचायला शिकले बरं... जेंव्हा पासून अक्षर ओळख झाली तेंव्हा पासून की, हातात पडेल ते वाचायचं अशी शिकवण मिळाली होती तेंव्हा पासून. वाचनामुळे ज्ञानामध्ये भर तर पडतेच पण नकळत संस्कार घडून जातात. असेच संस्कार घडवले ते "श्यामची आई " या पुस्तकाने.
श्यामच्या गोष्टी वाचून बरेच वेळा रडायला पण यायचं पण प्रत्येक प्रसंगाला धीराने कसे सामोरे जायचे याचे धडे जसे श्यामच्या आईने श्यामला दिले तसे ते मला पण दिले. अन्नाला नावे ठेवायचे नाही अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ही मोलाची शिकवण मिळाली. मागच्या इयत्तेत चोरी करू नये असे शिकवलं असताना पुढच्या इयत्तेत फी भरण्यासाठी केलेली चोरी हा प्रसंग तर किती तरी गोष्टी शिकवून गेल्या. पायाला घाण लागू नये म्हणून घेतलेली काळजी मनाला कधी घाण लागणार नाही याची सतत काळजी घेत राहिलं. फक्त स्वतः पुरता विचार न करता कुटुंबाचा,मित्र - मैत्रिणीचा विचार पण करायचा अशी सवयच जणू या पुस्तकाने लावली.
श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरुजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.
साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशारितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला.
श्यामवरती प्रसंगानुसार झालेले संस्कार साने गुरुजींनी खूप सुंदर शब्दात श्यामची आई या पुस्तकात लिहिले आहेत
आजच्या धावपळी च्या, स्पर्धेच्या युगात अश्या संस्काराची नितांत आवश्यकता आहे.
आज मी या अमूल्य ठेव्याबद्दल धन्यवाद मानते श्यामच्या आईचे व हे पुस्तकं लहानपणी माझ्या हातात देणाऱ्या बसमुंगे मॅडम चे..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment