आज मुलाचा परदेशातल्या एका कंपनीसोबत शेवटचा इंटरव्ह्यू होता. सकाळी मुलाने जाण्यापूर्वी पायापडून आशिर्वाद मागितले तश्या मालतीताईने नेहमी प्रमाणे आशीर्वाद दिला "यशस्वी हो" ...
तोंडातून शब्द निघून गेले पण मनापासून वाटत होते की , मुलाने आपल्याच देशात राहूनच नाव कमवावे. एकदा तिकडची ओढ लागली तर आपल्या माणसाबद्दल, देशाबद्दल प्रेम कमी होईल . मुलाचा उत्साह व पुढे जाण्यासाठी जी धडपड चालू होती ते बघून मालतीताईने आपल्या अपेक्षांना मुरड घातली.
संध्याकाळी मुलगा आनंदात पेढ्याचा पुढा घेऊन आला ," आई , तुझे आशिर्वाद कामी आले, मला तो जॉब मिळाला. पुढच्या आठवड्यात जॉईन करायला सांगितलं आहे."
मुलाच्या आनंदात आनंद मानत मालतीताई पुढील तयारीला लागल्या.
आज मुलाला परदेशात जाऊन दहा वर्ष झाली. मधल्या काळात मुलाचं लग्न झालं, मुलगी मात्र भारतीय आहे. लग्नाच्या वेळी भारतात आला त्यावेळी त्याला आपल्या माणसाबद्दल,देशाबद्दल खूप प्रेम दिसून आलं. संध्याकाळी बोलताना सहजच परदेशात स्थित झालेल्या भारतीय मुलांच्या पालकांबद्दल खंत व्यक्त केली. मुलाचे शब्द ऐकून मालतीताईना समाधान वाटले की आपल्या मुलाला अजून इथल्या लोकांबद्दल प्रेम आहे.
लहानपणापासून मालतीताईने मुलावर खूप छान संस्कार केले होते. परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी होण्याची सवय लावली. शिवाजीमहाराज, सावरकर यांच्या जीवनावर सतत त्याच्या सोबत चर्चा करत असत जेणे करून त्याला आपल्या देशाबद्दल ओढ वाटेल. आपल्या लोकांसाठी त्यांनी आपल्या ज्ञानाचा , पैशाचा वापर करावा असे मनापासून वाटतं होते पण याचा काहीच उपयोग झाला नाही याची खंत मालतीताईच्या मनात होती.
आज मालतीताईचा सत्तरावा वाढदिवस होता.
सकाळी उठल्यावर नेहमी प्रमाणे मोबाईल घेऊन व्हॉट्स ॲप उघडलं तर मुलाचा मेसेज होता रात्री बारा वाजता केलेला ...नेहमी प्रमाणे केक , बुकेचे फोटो नव्हते मोठा मराठीत टाईप केलेला मेसेज होता. डोळ्यावर चेश्मा लावून वाचू लागल्या..
प्रिय आईस सा. नमस्कार
सर्व प्रथम तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.
आज मी तुला जे गिफ्ट देणार आहे त्याचा तू प्रेमाने स्वीकार करशील याची मला खात्री आहे.
मी आपल्याच देशात राहून देशासाठी काहीतरी करावं असं तुला नेहमी वाटायचं,तू माझ्यावर कधी लादलं नाहीस हे मात्र इतकचं खरं आहे. तुझ्या संस्कारात वाढलेल्या तुझ्या मुलाला याची सतत जाणीव होती पण नेमकं काय करावं हे सुचत नव्हतं.
आज इथल्या भारतीय नागरिकांची विशेषतः जेष्ठ नागरिकांची गरज ओळखून मी एका मराठी मंडळाची स्थापना करणार आहे. आपल्या देशापासून दुरावलेल्या लोकांना आपल्या देशात असल्याची जाणीव करून देणार आहे. इथल्या लोकांचा पैसा एकत्र करून भारतीय आश्रमासाठी मदत करायचे ठरवले आहे. माझी याबद्दलची सर्व पूर्व तयारी झाली आहे. तुझ्या हस्ते मला या मंडळाची स्थापना करायची आहे. तू इथे येऊन आम्हाला मार्गदर्शन करावे ही विनंती.
तुझाच मुलगा
स्वप्निल.
मुलाचा हा विचार वाचून मालतीताईचे डोळे पाणावले, अपेक्षाच सोडलेल्या मुलाने इतकं सुंदर वास्तव समोर मांडलं याचा त्यांना मनोमन समाधान वाटत होतं. डोळे मिटून देवाला प्रार्थना केली " माझ्या बाळाला अशीच प्रेरणा दे."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment