"घर म्हणजे दोन अक्षरांचं शब्द असतं
चार भिंती त्यावरचं छत असतं
असं नव्हे तर
घर म्हणजे जगण्यासाठी विणलेलं एक सुंदर स्वप्न असतं
घर म्हणजे असते एक स्वप्न नगरी
जिथे असते प्रत्येकाच्या सुख दुःखाची हजेरी
घराला बिलगताना व सोडताना कळते घराची किंमत
घरा विषयी वाईट बोलण्याची नसते कोणातं हिम्मत.." कृत्तिका कुलकर्णी
घर म्हणजे नक्की काय असतं हे मी खऱ्या अर्थाने दोन वेळा अनुभवलं आहे . १९९३ साली किल्लारी येथे भूकंप झाला त्यावेळी म्हणजे २९ वर्षांपूर्वी . माझं गाव लातुर जिल्ह्यातलं त्यामुळे आम्हालाही भूकंपाची झळ पोहचली होती. भूकंप हा शब्द काढताच अजूनही पायाखालून जमीन सरकते , सर्व आठवणी बाहेर येतात व भीती वाटते .
भूकंप व कोरोना यामध्ये घर हा शब्द कॉमन आहे फरक इतकाच आहे कि भूकंपात घर सोडावं लागलं होतं तर कोरोना मध्ये घर पकडावं लागलं . घर सोडताना व घराला बिलगताना घराची खरी किंमत कळते . घरामध्ये एक अदभूत शक्ती असते बिलगताना व विलग होताना सतत आपल्या सोबत असते .
घर म्हणजे नेमकं काय ?
दोन अक्षरांचा शब्द का चार भिंती त्यावरचं छत असतं असं नव्हे तर घर म्हणजे जगण्यासाठी विणलेलं सुंदर स्वप्न असतं . जीवन जगताना अन्न , वस्त्र महत्वाचे आहे तेवढाच निवाराही महत्वाचा आहे .
हा आपला निवारा , आपलं घर कसं असावं
आचार विचार हि घराची आखणी असावी ,प्रेम हा घराचा पाया असावा ,थोर माणसे घराच्या भिंती असाव्यात . सुख हे घराचे छत असावे . जिव्हाळा हा घराचा कळस असावा ,माणुसकी हि घराची तिजोरी असावी ,शांतता हि घराची लक्ष्मी असावी ,पैसा हा घराचा पाहुणा असावा तेथे समाधान हे सुख असते व अशा घरातच ईश्वराची जागृत मूर्ती असते .
आपल्या घरातील ईश्वराची जागृत मूर्ती पाहायची असेल तर घरात बसून करमत नाही म्हणण्यापेक्षा या मूर्तीचा साक्षात्कार घेऊ घराच्या खूप जवळ येण्याची संधी मिळाली आहे तर या संधीचं सोन करू व घराला कोंडवाडा म्हणण्यापेक्षा घराला प्रेमाने जवळ करू या , घर रुपी ईश्वर आपला प्रेमाने सांभाळ करेल .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment