" पियु, चल ना यार ..अजून झालं नाही तुझं काम..बंद कर तो पी सी ..." घाई घाईत पल्लविने प्रियाच्या कीबोर्ड वरती हात ठेवला.
" पल्ली, मला आज माझा खडूस बॉस सोडणार नाही ..जा तू..मला उशीर होईल.."
" मी एकटी कशी जाऊ.." काळजीच्या स्वरात पल्लवी बोलली.
" काय यार तु पण .. एवढी मोठी प्रोजेक्ट हेड आणि त्या म्हाताऱ्याला घाबरते.."चिडवन्याच्या स्वरात प्रिया बोलली.
" तुला माहित नाही तो म्हातारा, सारखा माझ्या मागे येतो..जाऊ दे मी जाते.." असं म्हणत पल्लविने ऑफिस सोडलं.
पल्लवी कम्प्युटर इंजिनिअर नुकतीच पुण्यातल्या एका नामांकित कंपनीत कामाला लागली होती. नाशिकची राहणारी पण पुण्यात फ्लॅट भाड्याने घेऊन एकटीच रहात होती. तिच्याच कंपनितली प्रिया बाजूच्याच बिल्डिंग मध्ये होती. दोघी मिळून ऑफिसला जायच्या पण येण्याचा वेळ नक्की नसे.
मागच्या पंधरा दिवसापासून साधारण साठ पासष्ट वर्षाचे गृहस्थ तिचा पाठलाग करायचे. तिच्या खिडकीकडे सारखे बघायचे. तिच्या येण्याच्या जाण्याच्या वेळा त्यांना पक्या माहिती झाल्या होत्या. सुरुवातीला तिला काही वाटलं नाही पण हल्ली तिला खूप अस्वस्थ वाटत होतं.
सारखा त्यांचाच विचार यायचा. बरेच वेळा ते खाली उभे आहेत का ,हे बघण्यासाठी खाली वाकून बघायची. बोलायचे काहीच नाहीत पण सारखे टक लावून बघायचे.
आज नेहमी प्रमाणे आवरून पल्लवी ऑफिसला निघाली. प्रिया ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेली होती त्यामुळे एकटीच निघाली. खाली येताच ते गृहस्थ समोर उभेच होते, त्यांच्या हातात फुल व चॉकलेट होतं. पल्लवीने दुर्लक्ष केलं व चालायला लागली. ती जेवढी जलद चालते तेवढेच ते पण तिच्या मागे चालायला लागले आता मात्र पल्लवीच डोकं फिरलं, मागे वळून बोलली," शोभतं का या वयात तुम्हाला, मुलींच्या मागे मागे यायला ."
त्यांच्या हातात असलेली फुलं व चॉकलेट हिसकून घेतले व पायांनी तुडवत त्यांच्याकडे न बघता झपाझप निघून गेली.
या प्रकारा नंतर ते गृहस्थ परत दिसलेच नाहीत पण हल्ली पल्लवीला त्यांच्या नसण्याची खूप जाणीव होत होती. आपण खूपच जोरात बोललो त्यांना याचं वाइट पण वाटतं होतं.
सुट्टीच्या दिवशी संध्याकाळी खाली बाकडावर बसली होती , तिच्याच बाजूला एक बाई येऊन बसल्या पाठी वरून प्रेमाने हात फिरवत बोलल्या." माझी राणी अगदी तुझ्यासारखी दिसायची. तुला पाहिलं की आम्हाला तिचीच आठवण येते. त्या दिवशी तिचा वाढदिवस म्हणून माझे मिस्टर फुलं व चॉकलेट घेऊन आले होते. त्या दिवशी पासून काय झालं माहित नाही पण हे नीखूप गप्प बसून असतात..तुला माहित आहे का , नेमकं काय झालं..?"
" तुमची मुलगी.."
" हो, पाच वर्षां पूर्वी अपघातात गेली..."
पल्लविच्या पायाखालची जमीन सरकली.
आपल्याला किती मोठा गैरसमज झाला आपण मुली प्रत्येकाला एकाच तराजूत तोलतो, काकांनी कधी अंगाला हात लावला नाही पण साधी त्यांची नजर आपल्याला कळली नाही याचं दुःख तिला वाटतं होतं. राहून राहून तिचेच शब्द तिला आठवत होते.किती घाणेरडे आरोप आपण केले याची खंत मनात लागून राहिली .
'शोभतं का या वयात तुम्हाला" हेच वाक्य कानात सतत घुमत होतं...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment