![]() |
दीप ज्योती नमोस्तुते |
" मुलगा आणि मुलगी आम्ही कधीच भेद करत नाही. दोन्ही आम्हाला सारखेच आहेत. ज्योती आमच्यासाठी मुलगाच आहे. वंशाचा दिवा, कुलदीपक म्हणत असशील तर तिच आहे आमचा कुलदीपक." थोड्या परखड शब्दात पण समजावण्याचा सुरात सतीश आईला बोलत होता.
" अरे, मी पण काही बुरसटलेल्या विचारांची नाही . आज अंजू ची अवस्था बघ, चार महिने होऊन गेले..पोटात असणाऱ्या बाळाची हत्या तर होईलच पण अंजूच्या जीवाला धोका आहे. बाळंतपणापेक्षा अवघड दुखणं असतं हे." आई शांतपणे बोलत होत्या.
आईच्या बोलण्यावर दोघेही गंभीर झाले. काल डॉक्टरानी पण तेच सांगितलं होतं. दोन मुलांना सांभाळायचं म्हणजे आर्थिक गणित चुकणार होतं पण काही इलाजच नव्हता.
नाईलाजाने दिपकचा जन्म झाला.
दिसायला गोरापान, गुबगुबीत गालांचा,कोरीव डोळ्यांचा दीपक सर्वांचाच लाडका झाला.
दीपक म्हणजे ज्योतीच्या हातचं खेळणं. तासनतास ती दीपकला सांभाळायची.दोघे बहिण भाऊ खेळताना बघून सर्वांनाच खूप आनंद व्हायचा.
दीपक आता एक वर्षाचा झाला. आधाराने चालू लागला पण बरेच वेळा खाली पडायचा.
" अरे , नीट बघून चाल ना..भिंत आहे ना .. चल मीच उचलून घेते म्हणून ती हसत हसत उचलून घ्यायची."
दीपकला भरवताना, खेळताना, कपडे घालताना बरेच वेळा हे शब्द ऐकायला मिळायचे.
आई - बाबा, आजीच्या लक्षात ही गोष्ट आलीच नाही पण ज्योती बोलून गेली," आई, हा आंधळाच आहे , याला दिसत नाही...सारखा पडतो.."
दीपक जसा मोठा होत गेला तशी सर्वांना या गोष्टीची जाणीव झाली.
ज्योतीची शंका खरी निघाली..दीपकला दृष्टी दोष निघाला.
डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी वय लहान होते व पैशांची गरज होती.
सर्वांच्याच डोळ्यासमोर अंधार पडला काय करावं काही कळतं नव्हते पण सात वर्षाची ज्योती आपल्या दोन वर्षाच्या भावासोबत लपंडाव खेळत होती..डोळ्याला पट्टी न बांधता..
हसणाऱ्या त्या दोन बाळाकडे बघून मोठ्यांना धीर आला. लोकांची सहनभूती नको होती म्हणून ऑपरेशन होई पर्यंत बाहेरच्या लोकांना ही गोष्ट कळू द्यायची नव्हती.
आपल्या भावाला प्रत्येक कामात मदत करणारी त्याला आपल्याच नजरेनी शिकवणारी प्रशिक्षित शिक्षिका घरीच तयार झाली.
दिपकच्या बाबतीत आईला व आजीला न जमणाऱ्या कितीतरी गोष्टी ज्योती सहज करून देत असे. घरातल्या प्रत्येक ठिकाणचं अंतर आपल्या भावाला वितेनी मोजून सांगायची व त्याच्याकडून ते करून घ्यायची . बाहेर मित्रांसोबत खेळताना , फिरायला जाताना त्याचा आधार नाही तर त्याची दृष्टी ती बनत असे. स्पर्शाने प्रत्येक गोष्टींची जाणीव करून देत असे.
आज खेळता खेळता दीपक रस्त्यावरती आला, गाडी ठोकणार... एवढ्यात ज्योतीने धावत जाऊन त्याला उचलले.
देव प्रत्येक जीव जन्मास घालण्या अगोदर त्याची तजवीज अगोदरच करून ठेवतो. दीपकला प्रकाशित करणारी ज्योती अगोदर जन्मास घातली .
भावा बहिणीच्या प्रेमाबद्दल सर्वजण बोलायचे पण बाहेरच्या लोकांना कुठे माहीत होतं ही सामान्य बहिण नसून दिपकला प्रकाश देणारी ही खरी ज्योती आहे..
दीप आमवस्येच्या दिवशी प्रकाशित करणाऱ्या या खऱ्या दिव्याला..
" दीप ज्योती नमोस्तुते"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment