आज मामाला " बेस्ट प्रिन्सिपॉल " अवार्ड मिळाला असं कळलं व सोबत बक्षीस घेतानाच फोटो पाहिला. फोटो बघून मला खूप आनंद झाला.
आज हा अवार्ड घेतानाचा फोटो बघत मन सतरा - अठरा वर्ष मागे गेलं. मामाची नोकरी टिकेल की, नाही याची शाश्वती नव्हती पण आज हा सोन्याचा दिवस पाहून डोळ्यात आनंदाश्रू आले.मी पाच वर्ष शिक्षणानिमित्त मामाकडे होते . त्यावेळी मला आलेले अनुभव व त्या अनुभवाच्या शिदोरीतून मामी कडून मिळालेली मोलाची शिकवण मला नेहमीच प्रेरणा देते.
शहरातली माझी मामी लग्न होहून एका छोट्या गावात आली. सासर व माहेर यात जमीन आसमानचा फरक होता. सासरी पूजाअर्चा, देवधर्म होतं, तसं थोडं कर्मकांड चालायचं.
स्वतःच्या बुध्दीला पटेल अशी रूढी परंपराला मुरड घालून घरच्या लोकांना समजून घेणारी आधुनिक सून बनली.
मामाला माझ्या सरकारी शाळेत नोकरी होती.
सगळ कसं अगदी व्यवस्थित चालू होतं पण मामाला वाइट संगत लागली व दारूचे व्यसन जडले. हे व्यसन इतकं वाढलं की, मामा यातून बाहेर येईल की, नाही याची शंका होती पण माझ्या मामानी ते करून दाखवलं.
पाच वर्षात मी खूपच जवळून मामीला अनुभवलं आहे. मामाच्या व्यसनाला झुंज देणारी माझी मामी मी माझ्या डोळ्यांनी पाहिली आहे.
संध्याकाळी पाच वाजले की, मामीचे डोळे घड्याळाकडे लागलेले असायचे, सहा वाजता तोंड बारीक झालेलं असायचं, सात वाजता वाटे कडे डोळे लागलेले मामीचे डोळे आजही मला आठवतात . कसे येतील याचीच चिंता मनाला लागून असायची. घरात त्यांच्या स्वतः च्या दोन मुली, एक मुलगा, मी व आजी असे सात जण आम्ही रहायचो. सगळं कसं व्यवस्थित होतं.
मामा बुध्दीने तल्लख, स्वभावाने खूप प्रेमळ व सतत इतरांना मदत करणारा होता पण एका वाइट व्यसना मुळे सुखी संसाराची वाट लागली होती.
मामाच्या या सवयी मुळे शेजारची लोकं बोलत नसतं, बघताच तोंड फिरवत. कोणीच आमच्याशी संबंध ठेवत नसे. खूप आपमानस्पद वागणूक देत.
मामा दिवसभर बाहेर पण मामींनी आमच्यावर खूप छान संस्कार केले. आपण प्रयत्न करायचे ,देव कधीना कधी आपलं ऐकेलच. कधीच हरायचं नाही ,लढत राहायचं. कर्तव्यात कधीचं मागे पडायचं नाही. अशी शिकवण मामीने दिली.
मामाला यातून बाहेर काढण्यासाठी मामीने खूप प्रयत्न केले. कधी समजावून तर कधी रुसून - फुगून तर कधी अबोला पकडून. परिस्थितीला कंटाळून माहेरी कधी निघून गेली नाही किंवा जिवाचं बरं वाईट करून घेण्याचा विचार केला नाही.
मामाचा विरोध असताना मेडिकल ट्रीटमेंट देऊन, मामाला यातून बाहेर काढलं.
लिहत असताना हा काळ खूप झरकन निघून गेला पण हा काळ खूप मोठा होता.अश्या वाईट परिस्थितीतून अनुभवलेला काळ खूप काही शिकवून गेला.
परिस्थिती प्रतिकूल असली तरी अशक्य काहीच नसतं हा मोलाचा धडा मला पाच वर्षाच्या अनुभवात आला.
आज मामाला समाजात खूप मान पान आहे. मोठ्या लोकात ऊठबस आहे . सगळं कसं अगदी व्यवस्थित चालू आहे . आम्हाला असं वाटतं की तो काळ म्हणजे आम्हाला पडलेलं वाइट स्वप्न होतं.
आज मामाला मिळालेल्या यशात मामापेक्षा मामीचा सिंहाचा वाटा आहे. मामी नसती तर मामा या उच्च पदावर कधी गेलाच नसता .या अश्या माझ्या सतत प्रेरणा देणाऱ्या आई समान मामीला मानाचा मुजरा..
#आजचाविषय - अनुभव खूप काही शिकवून जातो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment