आज खूप दिवसानंतर मीनाला आई बाबांचं एक वाक्य आठवलं " मुलीच्या घरी कसं रहायचं? "
ज्या वेळी बाबा हे वाक्य बोलायचे त्यावेळी मीनाला खूप राग यायचा ती नेहमीचं बोलायची
," तुम्ही कधीच मुलगा किंवा मुलगी असा भेद केला नाही, प्रत्येक वेळी दादापेक्षा काकणभर जास्तच मला दिलंत .आज माझी वेळ आली तुम्हाला काही द्यायची तर तुम्ही असं काही बोलून व रीती रिवाजाचं नाव सांगून माझं तोंड बंद करता..."
" अगं बाई, रीती रिवाज आपल्यासाठी बनलेले आहेत, प्रत्येक नात्यातला गोडवा टिकवायचा असेल तर आपल्याला ते पाळावेच लागतात." बाबा समजुतीच्या सुरात बोलायचे.
आधुनिक विचारसरणीच्या मीनाला हे कधीचं पटलं नाही पण आज ज्या काही घडामोडी घडल्या त्यावरून मनोमन आई बाबांना नमस्कार केला.
शर्वरी मीनाची एकुलती एक मुलगी . जे आमचं आहे ते तुझं असं म्हणून सगळंच तिच्या स्वाधीन करून टाकणार होते. आम्हाला तुझ्याशिवाय या जगात कोणीच नाही तर आपण एकत्रच राहू असा मीनाने व तिच्या नवऱ्याने निर्णय घेतला. दोन घरात वेगळा खर्च करण्यापेक्षा आपण दोघे व मुलगी - जावई मिळून राहू म्हणजे त्यांनाही आपली मदत होईल व आपल्यालाही एकटेपणा वाटणार नाही .
एक महिना खूप मजेत गेला. चौघे मिळून मिसळून रहायचे . मीनाला आपल्या निर्णयाचा खूप अभिमान वाटत होता. प्रत्येक एकुलत्या एक मुलीच्या आई - वडिलांनी असाच निर्णय घ्यायला हवा असं वाटतं होतं.
काही दिवसांनंतर शर्वरीला असं वाटायला लागलं की, आई बाबा आपल्या प्रत्येक गोष्टीत लुडबुड करत आहेत. जावयाला ही गोष्ट लक्षात आली व त्यांनी शर्वरीला समजावून सांगितले पण माझे आई - बाबा आहेत मी बघून घेईन तू नको मध्ये पडूस असं सांगून नवऱ्याचे तोंड बंद केले.
लहान- लहान गोष्टी वरून मतभेद होत होते आज तर शर्वरी रागातच बोलली," आई -बाबा, वाइट नका वाटून घेऊ पण हा माझा संसार आहे मला आमचे निर्णय घेऊ देत. एवढे वर्ष मी तुमचं ऐकलं पण आता माझ्या घरात माझ्याप्रमाणे वागू दे ना..तुम्ही आराम करा ..."
मुलीच्या या बोलण्यावर सुरुवातीला मीनाला खूप राग आला पण आज बाबांची आठवण आली.
आपण गरजेपेक्षा जास्तच मुलीच्या संसारामध्ये लुडबुड केली , थोडक्यात गोडी असते .आपण आता " मुलीच्या घरी कसं रहायचं? " हाच रीवाज पाळू व आनंदाने नात्यात गोडी निर्माण करू असं म्हणत दोघांनी मुलीच्या घरातून आनंदाने पाय काढला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment