जन्मल्यापासून म्हातारपणापर्यंतच्या अनेक संस्कारातला अतिशय महत्त्वाचा संस्कार म्हणजे विवाह. लग्न हे दोन जीवांचे मीलन तर
असतेच, शिवाय दोन कुटुंबाचाही तो मिलापअसतो. कुटुंब, परिवार, समाज अशा तीन पायऱ्या त्या ऐक्याशी निगडित असतात. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये लग्नातील काही विधी रचले गेले आहेत. काहीना ते निरर्थक वाटतात, पण ते नीट समजून घेतले तर त्यांचं महत्त्व आपल्याला पटेल. सूनमुख हा त्यातीलच एक विधी.
सूनमुख पहाणे ह्या विधीत वरमाय मुलगा आणि सून यांच्या मध्ये बसते. तुम्ही दोघंही मला सारखीच हा भाव त्यात असतो.सुनेच्या तोंडात साखर घालून तिचा नि स्वतःचा चेहरा ती आरशात पहाते. आपण दोघी एकरुप
होऊन आनंदाने राहू असं आश्वासन त्यात आहे.
असाच एक सूनमुखाचा मजेशीर किस्सा शुभमच्या लग्न सोहळ्यात पहायला मिळाला.
शुभम त्याच्या पूर्ण घरातला एकुलता एक मुलगा जसा "होणार सून मी ह्या घरची" मध्ये श्री होता अगदी तसा. शुभमचं लग्नं ठरलं आणि त्याच्या काकी, मावशी, माम्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. लग्नात काय करू अन् काय नको असं झालं होतं सर्वांना. लग्नाची जोरदार खरेदी चालू होती. अक्षदा पडताना म्हणजे मुख्य विवाह प्रसंगी भारीची साडी नेसण्या पेक्षा सूनमुखाच्या वेळी या सर्वजणी 'ती ' साडी नेसण्याचा बेत आखत होते. इंस्टाग्राम व फेसबुक वरती प्रथमच सूनमुखाचा सूनेसोबत फोटो अपलोड करणार होत्या.
ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होत्या तो क्षण येऊन ठेपला. अक्षदा पडल्या,इतर विधी झाले आता आला तो सूनमुखाचा विधी.
शुभमच्या सगळ्या आया सज्ज होत्या. एकमेकींची साडी, मेकअप ठीक करून झाला. गुरुजींनी सांगितलं "चला आरसा घेऊन या, सुनेचं मुख आरश्यात बघायचं आहे."
प्रत्येक जनी एकमेकींकडे बघू लागली.."सीमा, तूच ठेवला होता ना आरसा..." सीमा ने रीमा कडे बोट दाखवलं, रीमा ने चंदा कडे, चंदा ने मंदा कडे व शेवटी मंदा ने गुरुजीकडे पाहिले. गुरुजींच्या लक्षात आलं की, यांनी आरसाच आणला नाही.गुरुजी बोलले ," आरसा आणल्या शिवाय तुम्हाला सूनमुख बघताच येणार नाही."
सर्वच सासूबाईंचा हिरमोड झाला. लग्न स्थळ घरापासून व बाजारापासून खूप दूर होतं त्यामुळे तो विचाराचं नव्हता.
आपल्या एवढ्या दिवसाच्या मेहनतीवर पाणी पडलं असच सर्वांना वाटतं होतं तेवढ्यात सून बाई उठली आपल्या सर्व सासूबाईना जवळ बोलावलं व एक छान पैकी सेल्फी घेतला. याच सेल्फी मध्ये सर्वांनी सूनमुख पाहिलं.आपण सर्वजण प्रेमाने व आनंदाने एकत्र राहू अशी कबुली सूनेनी या प्रसंगातून करून दिली.
वेळ मारून नेण्याची व प्रसंगावधान दाखवून आपल्या सर्व सासवांचे सूनेनी मन जिंकले व सून मुखाचा विधी आनंदाने पूर्ण झाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment