लोखंडी कपाटामधली ती छोटी ब्रिफकेस काढताना सावित्रीच्या हाताला कंप फुटला,हात पुढे जातच नव्हता . कपाटाचा दरवाजा बंद केला व खुर्चीत जाऊन बसली. मागच्या महिन्यात कपाट उघडले त्यावेळी सहजच ती बॅग बाजूला ठेवली तर यशवंतराव प्रचंड भढकले होते, "तुला त्यातलं काही समजत नाही, महत्त्वाची कागदपत्रे आहेत त्यात, पैशाचा व्यवहार आहे तो, त्याला हात लावायचा नाही ."
त्यांच्या त्या आवाजानेच सावित्री दचकली.
" अहो, मी फक्त बाजूला ठेवत होते ,नकोय मला तुमचा पैसा .." असं म्हणत स्वंपकघरात गेली.
मनातून खूपच दुखावली गेली होती. आयुष्यभर या माणसाने मला कधी पैशाचा व्यवहार कळू दिला नाही. प्रत्येक वेळी बोलायचे "तुला काय करायचे आहे , तुला काही कमी पडत असेल तर सांग.."
लग्न झाल्यापासून ते अगदी सेवानिवृत्त होई पर्यंत पगार किती आहे ते कधी सांगितलं नाही.
चार वर्षांपूर्वी निवृत्ती नंतर भरपूर पैसे मिळाले, सहजच विचारलं," काय करणार हो येवढ्या पैशाचं?."
तर लगेच बोलले ," तुला काय समजत पैशातलं..
लाखाच्या पुढे किती शून्य लागतात ते तर माहीत आहे का..? असं म्हणत हसायला लागले.
खूप अपमान वाटला होता त्यावेळी म्हणून त्याच वेळी ठरवलं होतं, कधीच यांना पैशाबद्दल विचारायचं नाही व त्या बॅगला कधीचं हात लावायचा नाही पण आज परिस्थितीच अशी होती की, त्या बॅगला हात लावल्या शिवाय पर्यायच नव्हता.
चार दिवसांपूर्वी यशवंतराव चक्कर येऊन पडले त्यातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यामुळे त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं.घरात पैसे होते ते आता संपले , पुढचा खर्च कसा करायचा हा यक्ष प्रश्न पडला होता.
आपल्याला आता मन घट्ट करून ती बॅग काढलीच पाहिजे असं मनाशी ठरवून परत कपाटाकडे गेली व ती बॅग काढली.
यशवंतरावांच्या पुढच्या उपचारासाठी बॅगला हात लावावा लागलाच..
बॅग उघडली ,तीन चार बँकेचे पासबुक, चेकबुक होते. बाजूलाच एक एफ डी होती तर काही शेअर सर्टिफिकेट होते. सावित्री तशी चांगली शिकलेली होती. त्यामुळे सर्व कागदपत्र व्यवस्थित वाचून घेतली. सर्वात खाली आरोग्य विम्याची काही पेपर व कार्ड होतं ते काढलं, विमा कंपनीला फोन करून सगळी कल्पना दिली .
विमा कंपनीने सांगितल्या प्रमाणे सगळ्या औपचारिक बाबी पूर्ण केल्या व दहा दिवसांनंतर यशवंतराव सुखरूप घरी परतले.
घरी येताच त्यांनी कपाटातली बॅग काढून सगळे पासबुक तपासून घेतले , एकही पैसा न काढता आपल्याला डिस्चार्ज कसा मिळाला असा विचार करत होते एवढ्यात सावित्रीने त्यांच्या हातात विमा कंपनी कडून आलेलं पत्र व दवाखान्याच बिल दाखवलं .
आपण आयुष्यभर सावित्रीला पैशातलं तुला काय समजतं असं हिनवून बोलत होतो पण हिला तर पैशाचं सगळंच कळतं असं मनातल्या मनात बोलत अभिमानाने सवित्रीचा हात हातात घेत बोलले ," तुला पैशातलं काय समजत.. असं कधी म्हणणार नाही कारण तुला तर सगळंच समजतं.."
👍👍
उत्तर द्याहटवा