" बाई साहेब पेढा घ्या , आमच्या गौरीला सरकारी खात्यात नोकरी लागली." सरू आपल्या मालकीण बाईला अभिमानाने सांगत होती." सरू, तुझं पण अभिनंदन, कष्टाचं चीज केलं पोरीने...कुठे आहे गौरी..आली नाही भेटायला .."" आम्ही तुमच्याकडे यायला निघालो एवढ्यात कॉलेज मधून फोन आला. उद्या तिचा सत्कार करण्यात येणार आहे, त्याच्या तयारीसाठी बाहेर गेली आहे...पण बाई तुम्हाला उद्या बोलावलं आहे सत्करासाठी.."" माझं काय काम आहे तिथं, तुम्ही आई- बाबा जा ना.."" असं चालणार नाही..आम्हीं तुम्हाला घ्यायला सकाळी दहा वाजता येतो तयार रहा.."असं म्हणतं सरू कामाला लागली.गेली वीस वर्ष सरू विमलबाई कडे घरकाम करते. साधारण सरू व विमलबाई सारख्याच वयाच्या,पुढे दोघींच्या मुलीपण त्याच वयाच्या होत्या.सरू जेंव्हा कामाला लागली त्यावेळी गौरी चार वर्षाची होती. कामाला येताना सरू घेऊन यायची व गौरी एका कोपऱ्यात गुपचूप बसून असायची. शर्वरीला म्हणजे विमलबाईच्या मुलीला कॉन्व्हेन्ट शाळेत घातलं त्याच वेळी सरकारी शाळेत गौरीची रवानगी झाली होती. शाळा सुटली की, गौरी इथे येऊन अभ्यास करायची.
पोरगी इतकी पुढे जाईल असं कधी वाटलंच नाही.दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाने चौघे मिळून कॉलेज मध्ये गेले. गौरीचा सत्कार करण्यात आला. गौरीला हे यश कसं मिळालं, याबद्दल दोन शब्द बोलण्याची विनंती केली.सर्वांचा मान पान करून गौरी बोलली," माझ्या या यशामध्ये माझ्या आई - बाबाचा वाटा तर आहेच पण या विमलमॅडम आहेत त्यांचा पण मोलाचा वाटा आहे. मी लहानपणापासून त्यांच्या घरी जाते . त्यांनी अप्रत्यक्ष माझ्यावर संस्कर केले आहेत. मी त्यांच्या घरी जायचे त्यावेळी त्या शिक्षणाचं महत्त्व सांगायच्या. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आज मी इथे उभी आहे."विमलबाई अचंबित झाल्या, मी तर कधीचं हिला काही बोलली नाही, हिचा कधी अभ्यास घेतला नाही मग हिने माझं नाव का बरं घेतलं असेल...कार्यक्रम संपल्या नंतर गौरीला जवळ घेऊन खोटं का बोलली असं विचारलं तर गौरी बोलली," तुम्ही शर्वरीताईला हे सगळं सांगायचा ना, मला वाटलं तुम्ही मलाच हे मुद्दाम सांगत असाल म्हणून खूप अभ्यास केला. मी खोटं नाही बोलली.."विमलबाई मनाशीच बोलल्या हे तर लेकी बोले सूने लागे झालं..जे झालं ते चांगल्यासाठी झालं असं म्हणत विमलबाई नी तोंडात पेढा टाकला व तोंड गोड केलं.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment