संध्याकाळी ऑफिस मधून येताना मेघाच्या कानावर ही कविता पडली, तिला असं वाटलं जणु ही कविता माझ्यावरच केली आहे.
"ऊन ऊन खिचडी साजुक तुप,
वेगळं रहायचं भारीच सुख.
एक नाही दोन नाही माणसं बारा,
घर कसलं मेलं ते बाजारच सारा.
सासुबाई-मामंजी, नणंदा नी दीर,
जावेच्या पोराची सदा पीर पीर.
पाहुणेरावळे सण नी वार,
रांधा वाढा जीव बेजार.
दहा मध्ये दिलं ही बाबांची चुक,
.
.
.
रडले पडले नी अबोला धरला,
तेव्हा कुठेआमच्या ह्यांनी वेगळा संसार मांडला."
स्टॉप आला म्हणून मेघा खाली उतरली व कविता अर्धीच झाली....
संध्याकाळी ऑफिस मधून आल्यानंतर घरातला गोंधळ, जोर जोरात हसण्याचा आवाज ऐकून मेघा जाम चिडली , डोकं दुखत असल्याचं कारण सांगून रूम मध्ये जाऊन पडली. एवढ्या मोठ्या घरात दिलं ही तर बाबांची चूक आहे ,मला तर राजा - राणीचा संसार हवा होता पण फसले या घरात येऊन असा विचार करत गाडीत ऐकलेल्या ऊन ऊन खिचडीची आठवण आली व त्यात सांगितलेला उपाय केलाच पाहिजे असा विचार करत वेगळं राहण्याची स्वप्न बघू लागली...
लग्न झाल्यापासून जी हौस - मौज केली नाही ती सर्व वेगळं राहिल्यावर करायची . दोघांनीच मस्त फिरायला जायचं, आठवड्याला नाटकं किंवा सिनेमा पाहायचा व महिन्याला साडी घ्यायची बाहेरून येताना भेळ - पाणीपुरी खायची व घरी आल्यावर मऊ मऊ डाळ खिचडी करायची व दोघांनी घरी आल्यावर गुलू गुलु बोलत तूप टाकून खिचडी खायची हे सुखाच्या संसाराचं सप्न घरातल्या आवाजाने भंगलं..पण आता हे स्वप्न पुर्ण करायचंच असा निश्चय करून घरात
रडली , पडली व अबोला धरला तेंव्हा कुठे मेघाच्या नवऱ्याने वेगळा संसार थाटला.
वेगळ्या संसाराची मांडणी झाली पण स्वप्नातला संसार काही प्रत्येक्षात येतच नव्हता . आता घरातली सगळी कामं एकटीनेच करायची कपडे, भांडी, स्वयंपाक, साफ - सफाई नवरा काही मदतच करत नाही ग्लासभर पाणी सुद्धा हातांनी घेत नव्हता. बाळ रडलेला चालत नाही, नुसती चीड चीड करत असे.
नाटक ,सिनेमा व साडीच स्वप्न हे स्वप्नच राहिले कारण महिन्याचा पगार पुरतच नव्हता. एकत्र असताना पैसे शिल्लक असायचे पण आता महिन्याच्या शेवटी खन खण गोपाळा अशी स्थिती होतं होती.
मेघाची चीड चीड वाढत होती पण सांगणार कोणाला.. काही दुखलं खुपल तर सासुबाई प्रेमाने जवळ घेऊन विचारायच्या, मामांजी बाळाला फिरवायचे, जाऊबाई स्वंयपाकात मदत करायच्या, दिर बाजारहाट करायचा. या सर्वांच्या जीवावर बाळाला सोडून ऑफिसला जायची आता ऑफिसला कायमची सुट्टी घेतली होती.
दिवसभर धावपळ करून स्वतःला आरशात पाहिला वेळच मिळत नव्हता.
मनापासून घरी परत जाण्याचे वेध लागले होते पण सांगणार कोणाला..!!
सहजच रेडिओ लावला तर परत तीच "ऊन ऊन खिचडी" कविता लागली होती पण आता शेवटचा राहून गेलेला भाग ऐकायला मिळाला.
"आत्ता काय कुठल्या हौशी नी आवडी,
बारा महिन्याला एकच साडी.
थंडगार खिचडी, संपलं तुप,
अन् वेगळं व्हायचं कळलं हो सुख!!!!!"
तिची आणि माझी व्यथा सारखीच होती.
हीच कविता त्यावेळी पूर्ण ऐकली असती तर आज अशी वेळ आलीच नसती असं म्हणत
ऊन ऊन खिचडी सरलं सारं तूप..वेगळं राहण्यात नसतं हो सुख.. असं म्हणत मेघाणे डोक्याला हात लावला..!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment