" अगं शुभदा , बाळ रडतंय....भूक लागली असेल त्याला.. चल बरं दूध पाज ..." शुभदाकडे बाळाला देत आई बोलली.
" प्रत्येक वेळी रडलं म्हणजे त्याला भूकच लागते का.. आत्ताचं पाजलं मी ..आता मी नाही घेणार ..तूच घे त्याला.. मी अगोदरच बोलली होती तुला , मी फक्त जन्म देणार बाकी सगळं तुलाच करावं लागेल..." चिडक्या स्वरात शुभदा बोलली.
" असं असतं तर बाळाला घेऊन कधीच गेली असती..तुझ्याजवळ दिलीच नसती.. तुझ्या दुधा मुळे अडकून पडली आहे मी. आईचं दूध अमृत असतं मुलासाठी.. चल पाज् लवकर.. " समजावण्याचा सुरात आई बोलली.
माय - लेकीचा हा संवाद रोजचाच झाला होता.
आईने जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली म्हणून नाहीतर बाळ होऊच द्यायचं नाही असं ठरवून टाकलं होतं दोघांनी.
बाळंतीण होऊन नुकतेच चार दिवस झाले होते. एकतर सीझरिंग त्यामुळे उठून बसता येत नव्हतं व त्यात दोन- दोन तासाला बाळाला पाजायचं म्हणजे शुभदाला शिक्षाच वाटायची. कधी कधी तर शुभदाला बाळाचा खूपच राग यायचा.
आज दवाखान्यातून सुट्टी मिळणार म्हणून शुभदा खूप खुश होती. घरी जाऊन पाचविची पूजा करायची असा बेत आई आखत होती एवढ्यात बालरोगतज्ज्ञांनी सांगितलं की, बाळाला कावीळ झाली आहे त्याच्यावर उपचार करणे गरजेचे आहे. बाळाला दुसऱ्या दवाखान्यात दाखल करणे गरजेचे आहे.
शुभदाचे टाके ओले होते व त्यातून पाणी येत होतं म्हणून तिचा ही दवाखान्याचा मुक्काम वाढला.
शुभदाला बघायचं की, बाळाला बघायचं हा मोठा पेच सर्वांसमोर येऊन ठेपला.
बाळावर उपचार होणे गरजेचे होते म्हणून बाळाला दुसऱ्या दवाखान्यात दाखल केले.
एका दवाखान्यात बाळ तर दुसऱ्या दवाखान्यात आई . बाळाची भूक भागवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. बाळाची आजी बाळा सोबत होती. इकडे शुभदावर उपचार चालू होते. बाळाला पाजण्याची कटकट नव्हती म्हणून शुभदाला शांती वाटतं होती . सतत असच कर तसच कर असं बोलणारी आई पण नव्हती त्यामुळे शुभदा निश्चिंत झाली. आराम करण्यासाठी झोपली पण शुभदाला अचानक थंडी वाजून ताप आला.
दूध साचल्या मुळे हा त्रास होतो हे डॉक्टराणी सांगितले, दूध काढण्याची प्रक्रिया चालू केली.
आतून मनाला कसली तरी ओढ लागली होती.
आपल्या शारीरिक त्रासापेक्षा मनाचा त्रास खूप वाढला आहे हे शुभादाच्या लक्षात आले.
रडणाऱ्या बाळाचा राग येणाऱ्या शुभदाला आता तो आवाज ऐकण्यासाठी कान आसुसले होते. बाळाच्या आठवणीने ऊर भरून आला, काय करावे ..कोणाला सांगावे काहीच कळत नव्हते.
बाळाला माझी गरज नसून मला बाळाची गरज जास्त आहे याची जाणीव झाली . बाळाच्या आठवणीने शुभदा केविलवाणी झाली व बाळाजळ घेऊन जाण्याचा हट्टच धरून बसली. शुभदाला बाळाच्या जवळ घेऊन गेले . तिथे पोहचताच शुभदाने बाळाला छातीशी पकडून बाळाची मनोमन माफी मागितली...
दूध पिणे ही तुझी गरज नसून माझी पण गरज आहे. दूध पाजणे माझी जबाबदारी तर आहेच पण तो तुझा तो हक्क आहे. मी चिडचिड केल्याबदाल मला माफ कर रे माझ्या बाळा असं म्हणतं शुभदाने बाळाचे गोड गोड पापे घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment