5 सप्टेंबर शिक्षक दिनाचे औचित्य साधून साने गुरुजी शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सर्वांना निमंत्रित करण्याची जबाबदारी माधवनी स्वतः होऊन स्वीकारली होती . एक महिना अगोदरच सर्वांना फोन , मेसेज करण्यात आले होते. व्हॉट्स ॲप ग्रुप मार्फत हे काम खूप सोपे झाले. सर्वांनी येण्याची उत्सुकता दाखवली. कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.
5 सप्टेंबरचा दिवस उजाडला सर्वजण बरोबर दहा वाजता शाळेसमोर भेटले. शाळेला बघून सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. असेम्ब्ली हॉल मध्ये कार्यक्रमाची तयारी करून ठेवली होती. हॉलमध्ये फळ्यावर लिहले होते " माजी कृतज्ञ व कृतघ्न विद्यार्थ्याचा मेळावा "
हे वाक्य वाचून सर्वांच्याच कपाळावर आठ्या पडल्या, हे असं का लिहलं असेल ? आपसात चर्चा चालू झाली.माधवला सुद्धा याबद्दल काहीच माहित नव्हते.
शाळेतील मुख्याध्यापक व इतर शिक्षक हजर झाले . यातले बरेचशे शिक्षक नवीन होते पण जोशी सरांकडे पाहून सर्वांना आनंद झाला, आपलेपणाचा भास झाला.
औपचारिक भाषण झाले ,सर्वात शेवटी जोशी सर बोलण्यासाठी उभे राहिले तसा सर्वांना आनंद झाला, शाळेत असताना सरांचे भाषण ऐकताना तल्लीन होऊन जात असतं ,आज काय शिकायला मिळेल म्हणून सर्वजण ताठ बसले,कान सरांच्या शब्दंकडे लागले होते.
" माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो आज तुम्हाला बघून मला खूप आनंद झाला. आज हे बोर्डवरचं वाक्य वाचून कदाचित तुम्हाला संभ्रम निर्माण झाला असेल. हे काय लिहलेले आहे "कृतज्ञ व कृतघ्न"
माझी मुलं चुकत असतील तर त्यांचे कान पकडणे व प्रगती करत असतील तर शाबासकी देणे हे मी माझे कर्तव्य समजतो. म्हणूनच हे मी लिहले आहे.
मागच्या दोन वर्षात कोरोना मुळे आम्ही चांगले- वाइट प्रसंग अनुभवले , शाळा बंद होती....मुलांचे होणारे नुकसान पाहवत नव्हते, काय करावे सुचत नव्हते त्यावेळीं या माधवनी एक कल्पना सुचवली. या शाळेतून शिकून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांची मदत घ्यायची असे आमचे ठरले. कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुलानी शाळेला सढळ हाताने मदत केली. ज्यांना आर्थिक मदत करणे शक्य नव्हते त्यांनी मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकवण्याचे काम केले.कमीत कमी किमतीत मुलांना मोबाईल घेऊन देण्याचे काम केले. काही मुलांनी तर आधुनिक पद्धतीने इंटरनेट वरून मुलांना कसे शिकवायचे याचे प्रशिक्षण दिले. आम्ही अश्या विद्यार्थ्यांचे आभार मानले त्यावेळी त्यांनी शाळे विषयी कृतज्ञता व्यक्त केली. आम्ही आज समाजात जे स्थान मिरवतो आहे त्याचे सर्व श्रेय त्यांनी शाळेला व शिक्षकांना दिले.
काही विद्यार्थ्यांना आम्ही फोन केला तर आमचे फोन उचलले नाही,काही जणांनी जाणून बुजून कट केले.काही मुलांनी आम्हाला स्पष्ट शब्दात सांगून टाकले की, सरकार मदत करेल तुम्हाला मग आमच्याकडून कश्याला अपेक्षा करता.
असे एक ना अनेक वाइट अनुभव आले त्यावेळी आपसूकच तोंडातून वाक्य बाहेर आलं, " किती कृतघ्न आहेत ही मुलं ... माणसाने नेहमी कृतज्ञ असावे,कृतघ्न नसावे ."
तुम्ही त्यावेळी केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद. तुमच्यामुळे या शाळेला चालना मिळाली. ज्ञान दानाच खूप मोठं काम तुम्ही केले आहे.
आज आपण सर्वजण या संकटातून बाहेर आलो आहोत पण मुलांनो तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा व तुम्हीचं ठरवा तुम्ही शाळेबद्दल कृतज्ञ आहात की कृतघ्न.??
सरांचे हे वाक्य ऐकून सर्वांच्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment