हिच ती वेळ , हाच तो क्षण
दिवसभरातला एक क्षण असा असतो कि,त्या वेळी आपण जे बोलतो ते खरं होतं.
गोविंदराव एक वाक्य असं बोलून गेले की पांडुरंगापुढे व यमदेवापुढे खूप मोठा पेच निर्माण झाला . या पेचातून ते कसा मार्ग काढतात तो बघू ...
" या घरात माझं कोणी ऐकतच नाही , जिथे किंमत नाही तिथे राहूच नये असं वाटतं ..देवा पांडूरंगा, उचल रे बाबा मला ." गोविंदराव रागारागात बोलून गेले ...
हल्ली त्यांची खूप चिडचिड होतं होती . दिवसभरातून हे वाक्य बरेच वेळा त्यांच्या तोंडून जायचं पण नेमकी आजच " हीच ती वेळ व हाच तो क्षण " जुळून आला
गोविंदरावांनी पांडुरंगापुढे हे मागणं मागितलं होतं म्हणून देव यमदेवाकडे गेले व गोविंदरावांना घेऊन येण्याची विनंती केली . यम देवांनी पांडुरंगाना सांगितलं कि, अजून त्यांची वर येण्याची वेळ आली नाही अजून ते पंधरा वर्ष तरी पृथ्वीवरच राहणार आहेत त्यामुळे माफ करा मी त्यांना घेऊन येऊ शकत नाही . आता काय करायचं असां पेच देवासमोर पडला . नेहमी प्रमाणे नारदमुनी तिथे आले व त्यांनी छान कल्पना सुचवली .
"गोविंदरावांचा शब्दश: अर्थ घ्यायचा म्हणाला तर आपण त्यांना उचलू शकतो व त्याची समस्या ऐकून त्यातून मार्ग काढू शकतो नारायण....नारायण...." नारदमुनीने आपली कल्पना पांडुरंगाना सांगितली व ते निघून गेले ..
गोविंदराव रागारागाने रस्त्यावर चालत होते , एवढ्यात त्यांना रिक्षेवाल्यानी ठोकलं व ते रस्त्यावर पडले .. त्याच वेळी पांडुरंगानी त्यांच्या मित्राचं रूप घेतलं व गोविंदरावाना उचलून रिक्षात ठेवलं व आपल्या घरी घेऊन आले.मित्राचा म्हणजे सुधाकरचा छान बंगाल होता . घरी बायको ,दोन मुलं, सुना व नातवंड असा छान परिवार होता. घरी जाताच समोर कोणीच नव्हतं , गोविंदरावांनी चौकशी केली त्यावेळी कळलं सगळे आपापल्या कामात व्यस्त आहेत . आमच्या घरी आम्ही कोणीही एकमेकांच्या कामात कधीच ढवळाढवळ करत नाही . ज्या दिवशी मी सेवानिवृत्त झालो त्याच दिवशी मी व माझ्या पत्नीने ठरवलं आपण संसारातून काढता पाय घ्यायचा . कोणीही विचारल्याशिवाय सल्ले द्यायचे नाहीत. आमच्या घरी कधीच वाद होत नाहीत पण कधी आमचे मतभेद झाले तर आम्ही चर्चा करून मार्ग काढतो.
आज मित्राच्या घरी येऊन त्याच्या घरातलं वातावरण बघून गोविंदराव हरखून गेले. माझं घरही यांच्यासारखच आहे पण आपण तरी का कंटाळतो..का चीड चीड करतो याचं ते आत्मपरीक्षण करू लागले.
सेवानिवृत्त झाल्यापासून वेळच वेळ होता त्यामुळे सर्वांनी मला वेळ द्यावा, घरातला सर्वात ज्येष्ठ मी त्यामुळे प्रत्येक निर्णय मला विचारून घेतले पाहिजेत असा अटाहास होता. प्रत्येक पिढीची मानसिकता वेगळी असते हा विचार मनात कधी आलाच नाही. प्रत्येकाने माझ्या प्रमाणे वागले पाहिजे असंचं नेहमी वाटायचं, कधी मनाविरुद्ध घडलं की, अपमान वाटायचा, या घरात राहूच नये असं वाटायचं व त्याची परिणीती म्हणजे भांडणं, वाद चालू असायचे.
गोविंदरावांनी आत्मपरीक्षण करून स्वतःची चूक स्वतःच मान्य केली व चांगली बुध्दी दिल्याबद्दल पांडुरंगाचे मनोमन आभार मानले.
" देवा .. पांडुरंगा मला अशीच चांगली बुध्दी दे, हे सुखी समृद्ध आयुष्य मला दिल्या बद्दल तुझे खूप उपकार आहेत रे बाबा.."
गोविंदरावांचे हे वाक्य ऐकून पांडुरंग व यमदेव मनोमन हसले व नारदमुनींच्या कल्पनेवर त्यांना शाबासकी दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
comment